क्रिकेटमधली काळी बाजू

क्रिकेट हा खेळ 'जंटलमन लोकांचा खेळ' समजला जातो. पण या आपल्या गैरसमजुतीला दोन दशकांपूर्वी अनिरुद्ध बहल आणि तरुण तेजपाल या पत्रकारांनी (तेहेलका नावाच्या न्यूज वेबसाइटचे पत्रकार) सुरुंग लावला.
Cricket
Cricketsakal

क्रिकेट हा खेळ 'जंटलमन लोकांचा खेळ' समजला जातो. पण या आपल्या गैरसमजुतीला दोन दशकांपूर्वी अनिरुद्ध बहल आणि तरुण तेजपाल या पत्रकारांनी (तेहेलका नावाच्या न्यूज वेबसाइटचे पत्रकार) सुरुंग लावला. क्रिकेटमध्ये चालणाऱ्या अनैतिक प्रकारांवर त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं.

त्यांनी केलेल्या या स्टिंग ऑपरेशनमुळं भारतीय क्रिकेट संघातील मोहम्मद अझहरुद्दीन, मनोज प्रभाकर, अजय जडेजा, अजय शर्मा त्याचप्रमाणं आफ्रिकन संघातील निकी बोए, हर्शेल गिब्ज या खेळाडूंचाही मॅच फिक्सिंगमध्ये समावेश असल्याचं पोलिस तपासात स्पष्ट झालं. या मॅच फिक्सिंग प्रकरणामुळं संपूर्ण क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली.

या मॅच फिक्सिंग प्रकरणात भारतीय खेळाडूंचाही समावेश झाल्यानं क्रिकेट जगतात भारतीय क्रिकेट संघाची प्रतिमा मलिन झाली. त्या वेळी भल्या भल्या क्रिकेटपटूंच्या मागे चौकशीचं शुक्लकाष्ठ लागलं होतं. अनेकांना घरी जावं लागलं, तर अनेकांना बदनामीला सामोरं जावं लागलं. त्या घटनेनंतर जगभरातील क्रिकेट विश्वानं अंग झटकलं होतं आणि पुन्हा ती गोष्ट होणार नाही याची खबरदारी घेतली होती.

पण त्यानंतरही पाकिस्तानी खेळाडूंचं (सलमान बट, मोहम्मद आसिफ, मोहम्मद आमिर) स्पॉट फिक्सिंगचं प्रकरण असो की आयपीएल मधील स्पॉट फिक्सिंग (श्रीशांत, अजित चंदीला, अंकित चव्हाण) प्रकरण असो, मॅच फिक्सिंग ही गोष्ट पुन्हा पुन्हा डोकं वर काढत आली आहे. अशा घटनांमुळे क्रिकेट विश्व नेहमी हादरत असतं. त्यामुळं क्रिकेट जगताच्या मानगुटीवर मॅच फिक्सिंगचं भूत घट्ट कवटाळून बसलं आहे, हे नाकारता येणार नाही.

'मैदानाबाहेरचा डाव' या सदरात आजवर माझा आवडता खेळ 'क्रिकेट'च्या विविध अंगांविषयी लिहिल्यावर, आज शेवटच्या लेखात मात्र क्रिकेटच्या मॅच फिक्सिंग या कटू वास्तवाबद्दल जड अंतःकरणानं का होईना, पण लिहिणं मला गरजेचं वाटतं.

एखाद्या सांघिक खेळात नेमका एक संघ पराभूत व्हावा किंवा विजयी व्हावा, यासाठी संघातील काही खेळाडूंना काही अपप्रवृत्तींकडून पैशांचं आमिष दाखवून विरुद्ध वर्तन करण्यास भाग पाडलं जातं. यालाच मॅच फिक्सिंग म्हणतात. या अपप्रवृत्ती म्हणजे सट्टेबाज. ही सट्टेबाजी कोटींच्या घरात असते. या सट्टेबाजीला लागणारी रक्कम ही सट्टेबाजांचं स्वतःचं भांडवल नसतं. यात अनेकांनी लावलेल्या १ हजार, १० हजार, १ लाख इ. अशा छोट्या छोट्या रकमांमधूनच कोट्यवधींची रक्कम उभी होते.

अशा या कोट्यवधींच्या रकमेच्या जोरावरच हे सट्टेबाज त्या त्या खेळाची रंगत, सभ्यता, पावित्र्य घालवतात. सट्टा लावणाऱ्यांची संख्या ही हजारोंच्या घरात असते आणि यात एकाच निर्णयावर अनेकांचं ठाम मत असतं. परंतु या मताविरुद्ध एखादी गोष्ट घडली, तर त्याचा फायदा बुकींनाच होतो.

म्हणून सट्टेबाज क्रिकेटमधील खेळाडूंशी थेट संपर्क करून पैशांचं आमिष दाखवून, त्यांना विशिष्ट पद्धतीनंच खेळण्यास भाग पाडतात. यात सट्टेबाज जितके दोषी असतात, तेवढेच दोषी यात पैसे लावणारे देखील असतात. त्यामुळे मॅचच्या निकालावर ‘गंमत’ म्हणून किंवा ‘टाइम-पास’ म्हणून जे जे कोणी पैसे लावतात, त्या सगळ्यांचे हात सट्टेबाजीच्या रक्तानं माखलेलं आहेत, हे मात्र नक्की.

मॅच फिक्सिंगचा इतिहास

क्रिकेटला मॅच फिक्सिंगची लागलेली ही कीड काही नवीन नाही. फिक्सिंगची सुरवात साधारण दोनशे वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये झाली होती. विलियम लॅम्बर्ट हा फर्स्ट क्लास क्रिकेटमधील एक नामचीन क्रिकेटर होता. प्रथम श्रेणी सामन्याच्या दोन्ही इनिंग्समध्ये शतक करणारा तो पहिला खेळाडू होता. पण १८१७ मध्ये त्याला फिक्सिंगच्या आरोपाखाली लाइफ टाइम बॅन करण्यात आलं होतं.

१९७९-८० च्या भारत विरुद्ध पाकिस्तान मालिकेत कोलकाता येथील सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार आसिफ इक्बालनं सामन्यापूर्वी टॉसच्या वेळी कॉइन जमिनीवर स्थिरावण्यापूर्वीच भारताचा कर्णधार गुंडप्पा विश्वनाथ यांनी टॉस जिंकला, असं घोषित केलं होतं. त्या सामन्यात पाकिस्तानच्या हातात सहा विकेट्स असतानाही त्यांचा संघ भारतापेक्षा ५४ धावांनी मागं असताना त्यानं पहिली इनिंग डिक्लेअर केली होती. त्यानंतर दोन दशकांनी सरफराज नवाझ यांनी आसिफ इक्बालवर मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता.

१९८१ मध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू डेनिस लिली आणि रॉडनी मार्श यांनी आपल्याच टीमविरुद्धच सट्टा लावला होता. पण प्रकरण उघड झाल्यानंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. दिवंगत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डिन जोन्सनं सांगितलं, की १९९२-९३ च्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान कोण्या एका भारतीयाने त्यांना फिक्सिंग ५० हजार डॉलर्सची ऑफर दिली होती.

ऑस्ट्रेलियन खेळाडू ॲलन बॉर्डर यांनी सांगितलं होतं, की इंग्लंडविरुद्ध मॅच हारण्याकरिता मुश्ताक मोहम्मदनं त्यांना ५ लाख पाउंड्सची ऑफर केली होती. त्यानंतर १९९५ साली ऑस्ट्रेलियाच्या मार्क वाॅ, शेन वाॅर्न आणि गोलंदाज टिम मे या तीन क्रिकेट खेळाडूंनी आरोप केला होता, की जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानमध्ये खेळत होता, तेव्हा पाकिस्तानचा एक प्रमुख खेळाडू सलीम मलिक यानं त्यांना पैसे घेऊन मॅच हारण्याची विनंती केली होती. १९९८ मध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू मार्क वॉ आणि शेन वॉर्न यांना हवामानची माहिती बुकीला सांगितल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला होता.

१९९० च्या दशकात एकदिवसीय क्रिकेटमध्ये मॅच-फिक्सिंगची सुरवात झाली होती. विशेषत: संयुक्त अरब अमिरातीमधील शारजाह येथे आयोजित केलेल्या एकदिवसीय स्पर्धा या संशयाचं केंद्र बनल्या होत्या. अखेरीस वर्ष दोन हजारमध्ये क्रिकेटला मोठा हादरा बसला. तेव्हा तीन आंतरराष्ट्रीय कर्णधार हॅन्स क्रोनिए (दक्षिण आफ्रिका), सलीम मलिक (पाकिस्तान) आणि मोहम्मद अझहरुद्दीन (भारत) यांना सामन्यांच्या निकालांवर प्रभाव पाडण्यास मदत केल्याबद्दल आजीवन बंदी घालण्यात आली.

त्यानंतर कठोर तपासणी आणि सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवल्यामुळं सामने निश्चित करणं कठीण झालं होतं. परंतु ‘ मॅच-फिक्सिंग हा परिवर्तन करणारा (म्युटेट होणारा) व्हायरस आहे.’ संपूर्ण सामन्याचा निर्णय बदलल्यावर शंकेला खूप वाव असतो, म्हणून स्पॉट फिक्सिंग किंवा फॅन्सी फिक्सिंग ही संकल्पना पाय पसरवू लागली.

स्पॉट फिक्सिंग / फॅन्सी फिक्सिंग

फिक्सर संपूर्ण सामन्यात फेरफार करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी खेळाच्या छोट्या भागावर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळं सामन्याच्या एका विभागातील लहान बदल शोधणं किंवा त्यावर शंका घेणं कठीण आहे. यामध्ये सामन्याच्या निर्णयाऐवजी इतर गोष्टींवर सट्टेबाजी केली जाते.

ज्यात नाणेफेक कोण जिंकेल, नाणेफेक जिंकून एखादा कर्णधार काय निर्णय घेईल, कोणता पंच विकेटच्या कोणत्या टोकाला उभा राहील, अंतिम अकरा खेळाडू कोण असतील, मैदानात किती खेळाडूंनी सनग्लासेस लावलेले असतील, यष्टिरक्षक एका डावात किती वेळा बेल्स पाडेल, कोणता गोलंदाज पहिला चेंज म्हणून गोलंदाजीला येईल, कसोटी सामन्यात नवीन चेंडू कितव्या ओव्हरला घेतला जाईल, कोणता फलंदाज कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला येईल, कोणत्या ओव्हर मध्ये कितव्या चेंडूवर गोलंदाज नो-बॉल किंवा वाइड टाकेल इ.

अनेक विषयांवर सट्टेबाजी केली जाते. स्पॉट-फिक्सिंगसाठी सट्टेबाज आणि त्यांचे पंटर हे नेहमीच आतल्या माहितीच्या शोधात असतात. ज्यात विशेषत: ड्रेसिंग रूममधून बाहेर पडणारी माहिती, खेळपट्टीची स्थिती, संघाची रचना, फलंदाजी कोण ओपन करेल, दुखापतीची माहिती, सामन्याच्या विशिष्ट सत्रावर किंवा आतल्या घडामोडींवर परिणाम करणारी कोणतीही गोष्ट इ. चा समावेश होतो.

खेळाडू त्यांच्या निर्दोषतेनं, नकळतपणानं किंवा अज्ञानानं किंवा संगनमतानं अशी अंतर्गत माहिती शेअर करू शकतात. सट्टेबाज खेळाडूशी थेट संपर्क करून त्याला विशिष्ट ओव्हरमध्ये विशिष्ट बॉलवर काय करायचं, हे सांगून स्पॉट फिक्सिंग करू शकतात. २०१० मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेलेले पाकिस्तानचे तीन खेळाडू व २०१३ च्या आयपीएलमध्ये भारतीय खेळाडू याच स्पॉट फिक्सिंगचा शिकार झाले होते.

सत्र बेटिंग (सेशन बेटिंग)

क्रिकेट सट्टेबाजीमध्ये, सत्र (सेशन) म्हणजे खेळाच्या विशिष्ट कालावधीत निकालांचा अंदाज वर्तवून त्यावर सट्टा लावला जातो. पॉवर प्ले मध्ये किती धावा निघतील, एखादा फलंदाज किती धावा करेल, पुढची विकेट किती धावसंख्येवर पडेल, पुढच्या षटकात किती धावा निघतील अशा अनेक पद्धतीने सेशन बेटिंग केली जाते. हा बेटिंग मधील सहज व सर्वांत जास्त प्रमाणात खेळला जाणारा प्रकार आहे.

आयसीसीने सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांवर लक्ष ठेवण्यासाठी भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा युनिट (ACSU) ची स्थापना केली. त्यावर बराच पैसाही खर्च होतो. आयसीसी आपल्या परीनं रस्त्यातील फिक्सिंगसारखे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करते, पण म्युटेट होणारा हा फिक्सिंगचा विषाणू खेळाच्या आत्म्यालाच चावण्याचे नवीन व अधिक अनुकूल मार्ग शोधून काढतो.

उदाहरणार्थ तंत्रज्ञान घ्या. तंत्रज्ञान जसे तपासकर्त्यांना मदत करते, तसेच सट्टेबाजी करणाऱ्या वेबसाइट्स आणि स्मार्टफोनच्या मदतीने सट्टेबाजांना भरभराट करण्यास मदत करते. भारतात फक्त ट्रॅकसाइडवर घोड्यांच्या शर्यतीवर सट्टेबाजीला परवानगी आहे, परंतु व्यवहारात अब्जावधी डॉलर्सची बेकायदेशीर बेटिंग क्रिकेटवर चालते. इंडिया चेंज फोरमच्या अहवालानुसार निर्बंध असूनही भारताच्या सट्टेबाजी आणि जुगार बाजाराने उल्लेखनीय वाढ दर्शविली आहे.

भारतीय सट्टेबाजी बाजार हा २०१८ मध्ये १३० अब्ज युएस डॉलर इतका मोठा होता. भारतीय सट्टेबाजारात क्रिकेट सट्टेबाजीचे वर्चस्व आहे. भारताच्या प्रत्येक एक दिवसीय सामन्यावर अंदाजे २०० दशलक्ष युएस डॉलर (१६६३ कोटी रुपये) एवढी सट्टेबाजी केली जाते. जागतिक स्तरावर क्रीडा सट्टेबाजीच्या बाजाराची भरभराट होत आहे. डिजिटल पायाभूत सुविधांची वाढ, स्मार्टफोनचा वापर यांसारखे घटक ऑनलाइन बेटिंग वाढीला हातभार लावतात.

क्रिकेट विश्वात फिक्सिंगच्या घटना एवढ्या सहज आणि वेगाने घडतात, पण तरीही बऱ्याचदा त्या आपल्या कानावर येत नाही. अलीकडं बुकी दीपक आगरवालनं २०१८ मध्ये बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला संपर्क केला होता. शाकिबनं ही माहिती आयसीसी पासून लपवली. म्हणून आयसीसीनं त्याला ठरावीक कालावधीपर्यंत सामने खेळण्यावर बंदी घातली होती.

२०२० मध्ये, अफगाणिस्तानच्या शफीकुल्लाह शफाक या खेळाडूला बांगलादेश प्रीमियर लीग आणि अफगाणिस्तान प्रीमियर लीगमधील सामने फिक्स करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सहा वर्षांची बंदी घालण्यात आली. २०२१ मध्ये, युएईचे शैमन अन्वर, मोहम्मद नावेद या खेळाडूंना २०१९ टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत सामना फिक्स करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल बंदी घालण्यात आली होती.

बीपीएल, टी-१० लीग, आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषक असो की स्थानिक घरगुती मालिका, क्रिकेटला कोणत्याच स्वरूपात मॅच फिक्सिंगपासून पूर्णपणे सुरक्षित ठेवणे अशक्य आहे. पण बहुतेक खेळाडू खेळाविषयीच्या या वेदनादायक वास्तवापासून दूर राहतात, त्यांचं नेहमी कौतुक वाटतं. मॅच फिक्सिंग आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आपण सर्वांनी खेळाचं आणि व्यापक क्रीडा समुदायाच्या हिताचं रक्षण केलं पाहिजे.

प्रत्येक खेळाडूनं व क्रिकेट रसिकानं (बेटिंग न करून) देशाच्या प्रतिमेचा आणि क्रिकेटच्या सभ्यतेचा विचार केलाच पाहिजे. नवीन क्रिकेट खेळाडूंनी यातून बोध घेऊन आपल्या कारकीर्दीला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू न देता चांगलं व स्वच्छ क्रिकेट खेळणं आवश्यक आहे, जेणेकरून क्रिकेटचा दर्जा, सभ्यता ही पूर्वी इतकीच टिकून राहील.

भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा युनिटही (ACSU) यासाठी खूप पैसा खर्च करत आहे, परंतु त्याचा हवा तसा निकाल दिसत नाही. तुम्ही खेळाडू आणि सट्टेबाज यांच्यातील संपर्क एका पातळीवर थांबवू शकता, पण सामना आणि दौर्‍याच्या वातावरणाच्या बाहेर, तुम्ही ते कसे रोखू शकता?

प्रत्येक खेळाडूला आपलं भविष्य सुरक्षित करायचं असतं, कारण संघात दीर्घकालीन स्थान मिळण्याची खात्री देता येत नाही. म्हणून त्याला पुढील पाच वर्षांच्या कमाईच्या बरोबरीनं एका सामन्यातील स्पॉट फिक्सिंग साठी पैसे देऊ केलं जातात. जर एखादा खेळाडू स्वार्थी असेल, तर तो त्या मोहात अडकतो आणि दुर्दैवानं इतिहास असे सांगतो, की अव्वल खेळाडू हा प्रतिभा नसलेल्यांपेक्षा जास्त स्वार्थी असतो.

(लेखक क्रीडाक्षेत्रातल्या घडामोडींचे अभ्यासक आणि एका माध्यमसंस्थेचे संचालक आहेत.)

(हे पाक्षिक सदर आता समाप्त होत आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com