निपाणीचा मेन्यू पुण्यात लोकप्रिय

सुनील ई. पाटील  
शनिवार, 30 जून 2018

पाणी परिसरातील हिटणी (मसोबा) येथील दोन तरुण अभियंत्यांसह चौघांनी पुण्यात हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून निपाणी भागातील खाद्यसंस्कृती लोकप्रिय केली आहे. त्यांतील एक जण पुण्यातील नामांकित कंपनीत उच्चपदावर कार्यरत आहे, तर दुसरा प्रख्यात सॉफ्टवेअर कंपनीत टीम लिडर आहे.

पाणी परिसरातील हिटणी (मसोबा) येथील दोन तरुण अभियंत्यांसह चौघांनी पुण्यात हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून निपाणी भागातील खाद्यसंस्कृती लोकप्रिय केली आहे. त्यांतील एक जण पुण्यातील नामांकित कंपनीत उच्चपदावर कार्यरत आहे, तर दुसरा प्रख्यात सॉफ्टवेअर कंपनीत टीम लिडर आहे.

आनंदा मारुती पाटील व हर्षल सुधाकर पाटील अशी त्यांची नावे आहेत. तर त्यांचे दोन सहकारी अंमलझरीतील सागर कोंदाडे व उदय रेपे यांनी त्याचे व्यवस्थापन संभाळले आहे. विशेष म्हणजे आपली नोकरी संभाळत वेळेचा उपयोग करत त्यांनी ही सेवा सुरू केली आहे. त्यातून सुमारे ६० जणांना रोजगारही मिळाला आहे. हिटणी येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील आनंदा पाटील यांनी मोठ्या कष्टातून निडसोशी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून १५ वर्षांपूर्वी मेकॅनिकलमधून पदवी घेतली. केवळ गुणवत्तेवर त्यांची पुण्यात एका परदेशी कंपनीत निवड झाली. 

हर्षल पाटील हा हिटणीतील निवृत्त लष्करी अधिकारी सुधाकर पाटील यांचा मुलगा. त्याने सॉफ्टवेअर इंजिनियरिंगमधील पदव्यत्तुर शिक्षणानंतर पुण्यात एका प्रख्यात कंपनीत करिअरला सुरवात केली. वास्तविक आपल्या करिअरमध्ये स्थिरता आल्यानंतर कोणी सहसा वेगळा विचार करत नाही, पण पहिल्यापासून कष्टाची सवय असलेल्या या दोघांनी पुण्यात निपाणी परिसरातील ‘खासियत’ रुजविण्यासाठी हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचे नियोजन केले. याची सुरवात पहिल्यांदा १ सप्टेंबर २०१३ ला नवी सांगवी येथे झाली. आपल्या भागातील संकेश्‍वरी चटणी, मसाला, कोल्हापुरी जेवणातील मेन्यू पुण्यातील खवय्यांना देण्यासाठी ‘आधी पोटोबा’ नावांचे रेस्टॉरंट चालविले. या हॉटेलच्या नावापासूनच त्यांनी आपले वेगळेपण दाखवले. त्याला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. 

नंतर वाकड येथील प्रशस्त जागेत दुसरे हॉटेल १ जानेवारी २०१६ रोजी सुरू केले. सकाळच्या सत्रात एकाने देखरेख करायचे, संध्याकाळी दुसऱ्याने रात्री उशिरापर्यंत थांबून ग्राहक होईपर्यंत थांबायचे असे नियोजन केले. विशेष म्हणजे दोघांच्याही पत्नी नोकरी करतात. त्यांच्या या व्यावसायिक सेवेत गावाकडील जास्तीत जास्त तरुणांना संधी दिली आहे.

गावाची आठवण
पुण्यात नोकरी, व्यवसायात त्यांनी यश मिळविले असले तरी त्यांना आपल्या गावची ओढ कायम आहे. पुण्यात शिक्षणासाठी, नोकरीसाठी येणाऱ्या तरुणांना त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला आहे. पुण्यातील आपल्या मित्रांच्या साहाय्याने सहा महिन्यांपूर्वीच गावातील शिकलेल्या मराठी शाळेत व तिथल्या विद्यार्थ्याच्या संगणक शिक्षणासाठी डिजिटल लॅब उभारली आहे.

Web Title: Anand and Harshal Patil Nipani flavour Hotel success story