विद्यार्थ्यांनो, शिकायला शिका!

आनंद देशपांडे saptrang@esakal.com
Sunday, 10 January 2021

विशेष
येत्या काळात विविध प्रकारची कौशल्यं कशी आत्मसात केली पाहिजेत व आधीच आहेत ती कौशल्यं अधिकाधिक विकसित कशी करत नेली पाहिजेत, त्यासाठी कसं ‘शिकायला शिकलं’ पाहिजे हे सांगणारा लेख...

शिक्षणात आमूलाग्र बदल करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान सज्ज होत आहे. कोरोनाच्या जागतिक साथीनं या आमूलाग्र बदलाला आणखी चालना दिली आहे. मी यासंदर्भात काही सांगू इच्छितो आणि मला जे काही सांगायचं आहे त्याची पार्श्वभूमी विशद करू इच्छितो.

आपण पदवीपूर्व तंत्रशिक्षणाचा संदर्भ देतो तेव्हाही १७ ते २२ या वयोगटातल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींचा विचार करतो. विज्ञान आणि उत्तम आरोग्यसेवांचा लाभ या वयोगटातल्या व्यक्तींना होणार आहे, असं आपल्याला लोकसंख्येचा कल सांगतो. हा लाभ शंभराहून अधिक वर्षं होणार आहे. साधी आकडेमोड सांगते की आपल्याकडे या गटातल्या प्रत्येक वयाच्या सर्वसाधारणतः अडीच कोटी व्यक्ती आहेत. अशी एवढी मोठी, सदृढ लोकसंख्या दीर्घ काळ कार्यरत राहणार आहे. तिचं निवृत्तीचं वय पंचाहत्तरीच्या पुढं जाणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आपण आज प्रशिक्षण देणार आहोत त्यांचं करिअर सन २०२१ पासून सुरू होऊन सन २०८० पर्यंत किंवा त्याहीनंतर चालणार आहे.

गेल्या वीस वर्षांतल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आणि पुढील काळात येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाचा विचार मी करतो तेव्हा येत्या काळातही तंत्रज्ञानात विलक्षण झपाट्यानं बदल होत राहतील असं दिसतं. त्यामुळे, आमच्यासारख्या नियोजनकाराचं काम अवघड होत जातं! येत्या साठ वर्षांत सतत बदलत जाणाऱ्या जगात काम करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण द्यायचं? अत्यंत कठीण काम आहे हे!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हे काही एवढ्यावरच थांबत नाही, तेव्हा भविष्यकाळातल्या कामासंदर्भातही आणखी महत्त्वाचे असे तीन मुद्दे मला सांगावेसे वाटतात.

कंपन्यांचं आयुर्मान कमी होत आहे. बदलतं तंत्रज्ञान आणि व्यवसायिक वातावरणामुळे कंपन्यांना सतत उत्क्रांत व्हावं लागत आहे. कंपन्यांमध्ये आमूलाग्र बदल होत असून, पूर्वीपेक्षा अधिक वेगानं त्या व्यवसायातून बाहेर फेकल्या जात आहेत.‘मॅकेन्झी’चा अभ्यास सांगतो की सन १९५८ मध्ये स्टँडर्ड अँड पुअरच्या यादीतल्या ५०० कंपन्यांचं सरासरी आयुर्मान त्या वर्षी ६१ वर्षं होतं. सन २०१५ मध्ये ते १८ वर्षांपर्यंत खाली आलं आहे. सन २०१५ मध्ये केलेल्या नव्या यादीतल्या ७५ टक्के कंपन्या सन २०२७ पर्यंत गायब झालेल्या असतील. त्यामुळे, आज कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुला-मुलींना करिअरसाठी त्यांच्या वयापेक्षा कमी वय असलेल्या कंपन्या मिळतील! आणि ‘आयुष्यभर नोकरी’ हे आश्वासन वास्तवाशी विसंगत ठरेल!

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गिग इकॉनॉमी (अल्पकालीन, कामापुरती निर्माण केलेली व्यवस्था) कायम राहील. येत्या काही वर्षांत दीर्घकालीन अथवा पूर्ण वेळ नोकरी हा अपवाद असेल. येत्या काळातलं जग ‘माझा व्यवसाय’ या संकल्पनेकडे वळेल. आपण सारे उद्योजक (आंत्रप्रेन्युअर) असू. आपल्याला नोकरी देणारा आपला ग्राहक असेल आणि आपल्याला एकापाठोपाठ अनेक ठिकाणी नोकऱ्या कराव्या लागतील. ख्रिस गेलचं उदाहरण पाहा... तो ‘आयपीएल’मध्ये आहे. त्यानंतर पाकिस्तानी लीग, त्यानंतर श्रीलंका लीग, बांगलादेश लीग, ऑस्ट्रेलियन बिग बॅश, कॅरेबियन लीग आणि मग नंतर कधीतरी तो वेस्ट इंडिज क्रिकेट टीमकडून खेळतो! चित्रपट-उद्योगात हा प्रकार चालतो. चित्रपटासाठी ‘क्रू’ जमवला जातो आणि त्यानंतर तो बरखास्तही होतो. यात प्रत्येक व्यक्ती आपापल्या करिअरसाठी जबाबदार असते; इतर कुणाचीही ती जबाबदारी नसते. करिअरमध्ये अग्रेसर राहण्यासाठी त्या त्या व्यक्तीला आपली कौशल्यं अद्ययावत ठेवावी लागतील. येणारं जग आपल्या आजच्या जगापेक्षा खूप वेगळं आहे.

गेली काही वर्षं मला माजी विद्यार्थ्यांच्या मेळांव्यांना उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं. हे मेळावे पदवीला २५ ते ३० वर्षं झाल्यानिमित्त आयोजित केलेले होते. आमच्यापैकी बहुतेक जण ज्या क्षेत्रातलं प्रशिक्षण घेतले त्यात क्षेत्रात कामाला आहेत आणि बहुतेकांनी आपल्या कारकीर्दीत किमान सहा नोकऱ्या बदलल्या आहेत. विशेष म्हणजे, हे माजी विद्यार्थी आपण कॉलेजमध्ये काय शिकलो व काय अधिक फायद्याचं ठरलं याबद्दल बोलताना कॉलेजमधल्या अभ्यासक्रमांचा खूप कमी वेळा उल्लेख करतात. 

माझ्या निरीक्षणानुसार, आपण ज्यांच्याबरोबर वेळ वाया घालवला त्यांची आठवण अधिक काढतो, ३० वर्षांनंतर आपल्याला रात्रीच्या वेळी उनाडक्या करणाऱ्या ‘अड्ड्या’चा भाग असलेलेच मित्र आठवतात. या वेगानं बदलणाऱ्या जगात शिक्षणसंस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांना चार ‘सीं’वर लक्ष केंद्रित करायला सांगितलं पाहिजे.  ते चार ‘सी’ म्हणजे १) कन्टिन्युअस लर्निंग, २) कोलॅबोरेशन, ३) कम्युनिकेशन, ४) कॉमर्स.

धोरणकर्त्यांनी व शिक्षणातल्या धुरिणांनी आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ५० वर्षांच्या करिअरसाठी किती तयार केलं आहे, हाच विचार मनात बाळगून मी पुढील प्रस्ताव मांडतो. 

आपण विद्यार्थांना स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे व त्यांना शिकायला शिकवलं (लर्न टू लर्न) पाहिजे. आपण स्वतः एखादी गोष्ट केल्यास ती अधिक चांगल्या पद्धतीनं समजते हे सिद्ध करणारे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. आपण नुसतीच लेक्चर्स देण्यापेक्षा अभ्यासकम्रातल्या टिप्स, स्वयंअध्ययन व ‘स्वतः करून पाहणं’ यांचा समतोल साधला पाहिजे. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांचं या उपक्रमांच्या आधारे मूल्यांकन करण्यासाठी अधिक चांगली मूल्यांकनपद्धती विकसित करावी लागेल. मी ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’शी संबंधित असल्याचा मला अभिमान आहे. हे विद्यार्थ्यांना गोष्टी स्वतः विकसित करण्यासाठी प्रेरित करणारं यशस्वी मॉडेल आहे.

आयुष्याचे चार आश्रम सांगणारी आपली जीवनपद्धती आता योग्य आहे असं मला वाटत नाही. त्यात सुरुवातीची २५ वर्षं ब्रह्मचर्य, त्यानंतरची २५ वर्षं गृहस्थाश्रम व त्यानंतरची २५ वर्षं समाजाचं दान त्याला परत देणं आणि शेवटचा वानप्रस्थाश्रम सांगितला आहे. आपण वयाच्या २५ ते ७५ या कालावधीत शिकण्याची, पैसा कमावण्याची व समाजाला परत देण्याची क्रिया एकत्रच आणि सतत करायला पाहिजे. तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांसाठी व त्याच क्षेत्रात करिअर करणाऱ्यांसाठी हे अधिक महत्त्वाचं आहे. माझा प्रस्ताव आहे, की धोरणकर्त्यांनी पूर्ण वेळ नोकरी करणाऱ्यांसाठी कॉलेजमधल्या २५ टक्के जागा राखीव ठेवण्याच्या मॉडेलचा विचार करावा. या मॉडेलचे अनेक फायदे आहेत. कंपनीत काम करणाऱ्यांना आपली कौशल्यं अद्ययावत ठेवता येतील व शैक्षणिक संस्थांना आपल्या प्रशिक्षणगरजा लक्षात येतील. व्यावसायिक कामगारांना तरुण व जिज्ञासू मुलांच्या वर्गात बसल्यानं ऊर्जावान व समृद्ध करणारा अनुभव मिळेल. वर्गात विद्यार्थ्यांच्या जोडीली कंपनीत काम करणारे कर्मचारीही असल्यानं शिक्षणाचा दर्जा वाढेल व त्याचबरोबर विद्यार्थ्यांची कंपनीतल्या कर्मचाऱ्यांशी ओळख होईल.  

आपण शिक्षणाचे अभियांत्रिकी, वैद्यकीय, वाणिज्य, विधी असे विभाग पाडून स्वतःचं खूप नुकसान करून घेतलं आहे. आपण विद्यार्थांना एकाच वेळी विविध विषय शिकण्याची परवानगी देण्याची हीच योग्य वेळ आहे. आपण तंत्रविषयक संस्थांना वैद्यकीय महाविद्यालयं, विधी महाविद्यालयं, विज्ञानसंस्था, कृषी महाविद्यालयं किंवा कला महाविद्यालयांशी भागीदारी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आता तंत्रज्ञान आयुष्याच्या प्रत्येकच भागाशी जोडलं गेलं आहे व त्याला इतर विषयांपासून दूर केल्यानं आपलं नुकसानच झालं आहे. आपण वैद्यकीय उपकरणांवरचा अभ्यासक्रम शिकवत असताना वर्गात शल्यविशारद किंवा विधीतज्ज्ञ असल्यास शिक्षण्याच्या दर्जात नक्कीच मोठी वाढ होईल. 

महाविद्यालयांना त्यांचं क्षितिज विस्तारण्याची ही नामी संधी आहे. त्यांनी विद्यार्थांना महाविद्यालयाच्या आवारात अडकवून ठेवू नये. व्यावसायिक कर्मचाऱ्यांबरोबर शिकण्याची संधी देऊन त्यांचं प्रभावक्षेत्र वाढवावं व आपल्यापैकी प्रत्येकानं शिकण्याची प्रक्रिया अविरत सुरू ठेवावी. यासाठी महाविद्यालयं विद्यार्थ्यांना आयुष्यभरासाठी फी भरण्याचा पर्यायही देऊ शकतील. 

सारांश -
अ) सतत शिकत राहा व शिकायला शिका.
ब) विविध क्षेत्रांतल्या सहकाऱ्यांबरोबर कसं काम करायचं हे शिकून एकत्र कामाचा नव्या अध्याय घडवा. आपण विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांची टीम तयार करून काम करू. विद्यार्थ्यांनी समाजातल्या इतर घटकांबरोबर आपलं नेटवर्क तयार करायला शिकलंच पाहिजे. विद्यार्थी व विविध क्षेत्रांतल्या कामगारांनी एकत्र काम केल्यास ही प्रक्रिया अधिक सोपी होईल. 
क) संज्ञापनाची कौशल्यं अत्यंत महत्त्वाची असल्यानं त्यांवर लक्ष केंद्रित करा. प्रत्येकानं सेल्समन व्हायला शिकलं पाहिजे.
ड) वाणिज्य कौशल्यं (कॉमर्स स्किल) आत्मसात करा. आपल्यातला प्रत्येक जण उद्योजक असला पाहिजे व प्रत्येकाला टिकून राहण्यासाठी रोकड कशी वळवावी, वस्तूंच्या किमती कशा ठरवाव्यात व कॅश फ्लो कसा सांभाळावा, हे जमलंच पाहिजे...

(सदराचे लेखक ‘पर्सिस्टंट’चे संस्थापक-संचालक आहेत)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anand Deshpande Writes about Student Learning Education