
चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार
- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com
सुमारे २२०० वर्षांपूर्वी (सध्याच्या) उत्तर पाकिस्तानातून, अफगाणिस्तानात आणि तिथून मध्य आशियाच्या प्रदेशात हळूहळू बौद्ध धर्माचा प्रसार होत होता. यामुळे अफगाणिस्तान आणि मध्य आशियातून चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला असं लक्षात येतं. अर्थात्, चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार होण्यात काश्मीरमधून मध्य आशियात जाणाऱ्या भारतीय बौद्ध आचार्यांचा आणि भिक्षूंचाही सहभाग होता. चिनी इतिहासग्रंथांमधील नोंदींवरून हा प्रसार थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू या.
दोन हजार वर्षांपूर्वी अफगाणिस्तान, मध्य आशिया आणि पश्चिम चीन या भागांत इराणी, शक, युचि (कुषाण), सोग्डियन या वंशाचे रहिवासी होते. त्यांच्यातील काही जण बौद्ध धर्माचे अनुयायी होते. यातील पार्थियन (इराणी) वंशाचे आचार्य आन शिकाव यांचं इसवीसन १४८ मध्ये चीनमधील लोयांग या नगरात आगमन झालं. चिनी भाषेतील ‘आन’ हा शब्द पार्थियन (इराणी) लोकांसाठी वापरला आहे. यावरून आचार्य आन शिकाव हे इराणी वंशाचे होते असं अनेक पाश्चात्य संशोधकांचं मत आहे. अठराशे वर्षांपूर्वी लोयांगमधील बौद्ध विहारामध्ये आचार्य आन शिकाव यांच्या प्रयत्नांनी भारतीय बौद्ध ग्रंथांच्या चिनी भाषेतील भाषांतरानं जोर धरला.
इसवीसनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकात साधारणपणे दहा आचार्यांच्या देखरेखीखाली अंदाजे ५१ बौद्ध ग्रंथांचं चिनी भाषेत भाषांतर केलं गेलं. चिनी ग्रंथांमध्ये नोंद झालेल्या या आचार्यांमध्ये आणि भिक्षूंमध्ये दोन पार्थियन (इराणी), तीन युचि (कुषाण), दोन सोग्डियन (मध्य आशियाई) आणि तीन भारतीय होते. यातील काही ग्रंथांच्या सुरुवातीला केलेल्या उल्लेखावरून ग्रंथांच्या भाषांतराची प्रक्रिया लक्षात येते.
या आचार्यांच्या जवळ बौद्ध ग्रंथ उपलब्ध असे किंवा मौखिक परंपरेनं आत्मसात केलेला ग्रंथ आचार्य म्हणून दाखवत असत. जर आचार्यांना चिनी भाषेचं ज्ञान असेल तर ते त्याचं भाषांतर सांगत असत. किंवा दुभाषी त्याचं चिनी भाषेत भाषांतर करत असे. या वेळी चिनी भिक्षू हे चिनी भाषांतर लिहून घेत असत. त्यानंतर हे चिनी भाषांतर पुन्हा एकदा तपासून घेऊन मगच ते ग्राह्य धरलं जात असे.
आन शिकाव यांच्यानंतर २० वर्षांनी लोयांग इथं आलेले आचार्य लोकक्षेम यांचं महत्त्वाचं योगदान आहे. आचार्य लोकक्षेम हे युचि (म्हणजे, ज्यांना आपण कुषाण म्हणून ओळखतो) नावाच्या मध्य आशियातील भटक्या टोळीच्या वंशातील लोकांपैकी होते. त्यांच्या भाषांतराच्या कामात एका भारतीय आणि तीन चिनी भाषांतरकारांनी मदत केली असल्याचं चिनी इतिहासग्रंथांत नमूद आहे.
आचार्य लोकक्षेम यांनी ‘अष्टसाहस्रिकाप्रज्ञापारमितासूत्र’, ‘शुरंगम समाधीसूत्र’ इत्यादी महत्त्वाच्या बौद्ध ग्रंथांचं इसवीसनाच्या दुसऱ्या शतकाच्या शेवटी भाषांतर केलं होतं. आचार्य लोकक्षेम यांना मदत करणाऱ्या (कदाचित काश्मीरमधील किंवा गांधार प्रदेशातील) भारतीय भिक्षूनं ‘अष्टसाहस्रिकाप्रज्ञापारमितासूत्र’ व इतर काही ग्रंथांची हस्तलिखितं आपल्यासोबत आणली होती. त्यावरून या संस्कृत किंवा संस्कृतमिश्रित प्राकृत भाषेत लिहिलेल्या ग्रंथांचं चिनी भाषेत भाषांतर करण्यात आलं होतं, असं चिनी परंपरा सांगते. हे ग्रंथ बौद्ध महायानपरंपरेतील अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ मानले जातात.
आचार्य धर्मरक्ष
आचार्य धर्मरक्ष यांचा जन्म इसवीसन २३० मध्ये सध्याच्या पश्चिम चीनमधील दुनहुआंग नावाच्या ओअसिस प्रदेशातील नगरात झाला होता. मागील लेखात बघितलेल्या पश्चिम चीनमधील रेशीममार्गावर हे ठिकाण येतं. युचि (कुषाण) वंशातील धर्मरक्ष यांचा जन्म श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी झालेला होता. त्यांनी चिनी पद्धतीनं पारंपरिक शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर धर्मरक्ष यांनी दुनहुआंग इथल्या बौद्ध विहारातील भारतीय आचार्यांकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. धर्मरक्ष यांनी मूळ बौद्ध ग्रंथ आणण्यासाठी मध्य आशियात आणि कदाचित गांधार प्रांतात प्रवास केला होता. त्यांना ‘दुनहुआंग इथले बोधिसत्त्व’ या उपाधीनं ओळखलं जात असे. बौद्ध धर्माच्या त्यांच्या प्रसारानं उत्तर चीनमध्ये बौद्ध धर्माचा पाया घातला गेला.
धर्मरक्ष यांनी ‘सद्धर्मपुंडरिकसूत्र’ या संस्कृत किंवा संस्कृतमिश्रित प्राकृत भाषेत लिहिलेल्या बौद्ध ग्रंथाचं काही आठवड्यात भाषांतर केलं होतं. धर्मरक्ष हातात त्या हस्तलिखिताचं एक पान घेऊन त्याचं तोंडी चिनी भाषेत भाषांतर करत असत. त्यांचे चिनी मदतनीस ते भाषांत’र लिहून काढत असत. यावरून त्यांचं संस्कृत व चिनी भाषांवरील प्रभुत्व लक्षात येतं.
धर्मरक्ष यांच्या आधीच्या काळात महायान परंपरेतील ‘प्रज्ञापारमिता’, ‘शुरंगम समाधीसूत्र’, ‘विमलकीर्तिनिर्देश,’ ‘सुखावतिव्यूह’ या चार बौद्ध ग्रंथांचं चिनी भाषेत भाषांतर झालं होतं. त्यात धर्मरक्ष यांनी केलेल्या ‘सद्धर्मपुंडरिकसूत्र’ या ग्रंथाच्या चिनी भाषांतराची भर पडली. महायान परंपरेतील या पाचही ग्रंथांचा मोठा प्रभाव चीनमधील सुरुवातीच्या काळातील बौद्ध धर्मावर पडला होता.
इसवी सनाच्या चौथ्या शतकात (आजपासून सोळाशे वर्षांपूर्वी) हळूहळू चिनी राजे, सरदार, श्रीमंत वर्गातील लोक बौद्ध धर्माचे उपासक होऊ लागले होते. पुढील शंभर वर्षांत चिनी नागरिकांत बौद्ध धर्माबद्दल आवड वाढू लागली. अनेक चिनी गृहस्थ गृहस्थाश्रमाचं पालन करून बौद्ध धर्माचे उपासक बौद्ध संघ यांना दान देत असत. यातून चीनमध्ये बौद्ध विहार, मंदिरं, लेणी यांची निर्मिती होऊ लागली. बौद्ध संघाला धान्य, वस्त्र, पैसे, बांधकामाचं साहित्य, मूर्ती, हस्तलिखित या स्वरूपातील दान मिळू लागलं.
दुनहुआंग येथील मोगाव लेणी
दुनहुआंगजवळील मोगाव नावाच्या डोंगरात इसवीसनाच्या चौथ्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत बौद्ध लेणी कोरली जात होती. ४९२ लेणी असलेला हा समूह मोगाव लेणी या नावानं प्रसिद्ध आहे.
इथल्या लेण्यांमध्ये बौद्ध मंदिरं आणि भिक्षूंना ध्यानधारणा करण्यासाठीच्या खोल्या अशी रचना आढळतं. या लेण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे, इथल्या अनेक लेण्यांमधील भिंतींवरील आणि छतावरील चित्रण अजूनही शिल्लक आहे. या संपूर्ण लेणीसमूहात अंदाजे २००० मूर्ती असून त्यातील अनेक मूर्तींवर मातीचं लिंपण करून त्या रंगवल्या आहेत.
मोगाव इथल्या लेण्यांमधील शिलालेखानुसार, इथं इसवीसन ३६६ मध्ये (आजपासून अंदाजे १६०० वर्षांपूर्वी) लेणी कोरण्याचे काम सुरू झालं; परंतु त्यानंतरच्या शंभर वर्षांत इथं लेणी खोदण्याच्या प्रक्रियेला चालना मिळाली. अंदाजे २२० वर्षांपूर्वी, सन १८९९ मध्ये या मोगाव लेणीसमूहातील एका खोलीच्या, मातीनं लिंपलेल्या भिंतीमागं, दरवाजा आढळून आला. त्या दरवाज्यातून आत गेल्यावर दुसरे लेणे होते, त्यात रेशमी कापडामध्ये गुंडाळून ठेवलेली संस्कृत, तिबेटी, खोतानी, सोग्डियन, चिनी भाषेतील अनेक हस्तलिखितं व्यवस्थित रचून ठेवलेली होती. इसवीसन १००६ किंवा १०३५ च्या दरम्यान म्हणजे, अंदाजे हजार वर्षांपूर्वी, परचक्राच्या भीतीनं या लेण्याचे दार बंद करण्यात आलं होतं असा संशोधकांचा अंदाज आहे.
सन १९०७ मध्ये सर ओरेल स्टाईन यांना मोगाव लेण्याची आणि तिथल्या हस्तलिखितांची माहिती मिळाली आणि त्यांनी या लेण्यांना भेट दिली. इथली अनेक हस्तलिखितं आणि त्याभोवतीच्या रेशमी कापडाच्या गुंडाळ्या, इथल्या वस्तू ओरेल स्टाईन यांनी मोगावमधून बाहेर नेल्या. ओरेल स्टाईन यांच्या या मोहिमेला ब्रिटिश इंडिया सरकारचं आर्थिक साह्य असल्यानं या वस्तू लंडनला पाठवण्यात आल्या. यातील अनेक हस्तलिखितं ब्रिटिश लायब्ररीमध्ये जमा केली गेली, तर काही हस्तलिखितं आणि वस्तू आता दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहेत.
ज्या वस्तू आणि काही हस्तलिखितं ओरेल स्टाईन यांनी मोगाव लेण्यांमधून बाहेर नेलेली नव्हती त्यांपैकी ६००० हस्तलिखितं, २०० हून जास्त चित्रं, काही लाकडी मूर्ती वगैरे वस्तू फ्रेंच संशोधक पेलिओ यांनी फ्रान्सला नेली. काही हस्तलिखितं १९१४-१५ मध्ये रशियन संग्राहक ओल्डेनबर्ग यांनी आणि ओरेल स्टाईन यांनी विकत घेतली. यातून उरलेला हस्तलिखितसंग्रह बीजिंगच्या राष्ट्रीय ग्रंथालयात ठेवण्यात आलेला आहे. अशा रीतीनं मोगाव लेण्यात हजार वर्षं बंद दाराआड राहिलेला हा हस्तलिखितसंग्रह विविध देशांतील विविध संस्थांमध्ये विभागला गेला.
(सदराचे लेखक हे सांस्कृतिक वारसा-अभ्यासक आहेत.)
Web Title: Anand Kanitkar Writes Chin Buddha Religion
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..