हडप्पा-संस्कृतीमधील आंतरराष्ट्रीय व्यापार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lapis lazuli
हडप्पा-संस्कृतीमधील आंतरराष्ट्रीय व्यापार

हडप्पा-संस्कृतीमधील आंतरराष्ट्रीय व्यापार

- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com

शंभर वर्षांपूर्वी १९२०-२१ मध्ये शोध लागलेल्या हडप्पा आणि मोहेंजोदारो या पुरातत्त्वीय स्थळांच्या उत्खननानं भारताचा इतिहास हजारो वर्षं मागं गेला. या स्थळांच्या उत्खननातून भारतीय इतिहासातील पहिल्या नागरीकरणाचे पुरावे समोर आले. पुरातत्त्वीय पद्धतीला अनुसरून त्या पुरातत्त्वीय संस्कृतीच्या सापडलेल्या हडप्पा या पहिल्या स्थळाच्या नावानं या संस्कृतीला ‘हडप्पा-संस्कृती’ म्हणून संबोधणं योग्य ठरत असल्यानं या लेखात हडप्पा-संस्कृती असा उल्लेख केला आहे.

हडप्पा-संस्कृती: ठिकाणं आणि काळ

हडप्पा-संस्कृती साधारणपणे इसवीसनपूर्व ५००० वर्षं (म्हणजे आजपासून ७००० वर्षांपूर्वी उदयाला आली). इसवीसनपूर्व १८०० वर्षांपासून (आजपासून ३८०० वर्षांपूर्वी) ती संस्कृती लयाला जाऊ लागली होती. या संस्कृतीतील हडप्पा आणि मोहेंजोदारो ही स्थळं आता जरी पाकिस्तानात गेली असली तरी भारतात धोलाविरा, लोथल, कालिबंगन, राखीगढी यांसारखी महत्त्वाची नगरं आणि इतरही अनेक स्थळं सापडली आहेत.

अंतर्गत व्यापार आणि संबंध

हडप्पा-संस्कृतीची शहरं आणि गावं आजच्या उत्तर पाकिस्तानापासून ते दक्षिण पाकिस्तानपर्यंत आणि भारतात राजस्थान, हरियाना, गुजरात इत्यादी राज्यांतून वसली होती. हडप्पा, मोहेंजोदारो, धोलाविरा यांसारख्या शहरांतून वापरलेले दगड, मणी, काही धातू हे उत्तर अफगाणिस्तान, जम्मू, गुजरात, पाकिस्तान, बलुचिस्तान इत्यादी प्रदेशांतून आणले जात होते हे संशोधनाअंती स्पष्ट झालं आहे. त्यामुळे जम्मू ते गुजरात, संपूर्ण पाकिस्तान, उत्तर अफगाणिस्तान अशा विस्तृत प्रदेशांत हडप्पा-संस्कृतीतील व्यापाराचं जाळं निर्माण झालं होतं.

उत्तर अफगाणिस्तानातील ‘शोर्तूगाय’ या ठिकाणी पुरातत्त्वीय उत्खननात एका प्राचीन, छोटेखानी वसाहतीचे अवशेष आढळून आले होते. शोर्तूगाय हे ठिकाण अफगाणिस्तानातील ‘लापिझ लाझुली’ या प्रसिद्ध अशा निळ्या दगडांच्या खाणीपासून जवळ आहे.

इसवीसनपूर्व २२०० ते १६०० वर्षं म्हणजे साधारण ४००० वर्षांपूर्वीच्या कालखंडात ही वसाहत वापरात होती. या प्राचीन वसाहतीच्या उत्खननादरम्यान तिथं हडप्पा-संस्कृतीतील खापरांचे तुकडे आणि हडप्पा-संस्कृतीतील एका गेंड्याची आकृती असलेली चौकोनी मृण्मुद्रादेखील सापडली होती. यावरून इथं हडप्पा-संस्कृतीतील लोकांची वस्ती होती असा अंदाज पुरातत्त्ववेत्त्यांनी केला. हडप्पा-संस्कृतीतील अनेक पुरातत्त्वीय स्थानांमध्ये ‘लापिझ लाझुली’ या दगडांपासून तयार केलेले दागिने आढळून आले आहेत.

म्हणजेच अफगाणिस्तानातील या दगडांच्या खाणीजवळ असलेल्या शोर्तूगाय या गावी हे दगड विकत घेऊन त्यांचा इतरत्र व्यापार करण्यासाठी हडप्पा-संस्कृतीच्या व्यापाऱ्यांनी आपलं व्यापारीकेंद्र शोर्तूगाय इथं स्थापन केलं असावं.

प्राचीन मेसोपोटेमियाशी व्यापार

हडप्पा-संस्कृतीत केवळ वर नमूद केलेला अंतर्गत व्यापार सुरू होता असं नव्हे. हडप्पा-संस्कृतीतील व्यापारी आजपासून ४६०० ते ३८०० वर्षांपूर्वी या ८०० वर्षांच्या काळात सध्याच्या इराकच्या प्रदेशात असलेल्या प्राचीन मेसोपोटेमियातही व्यापारासाठी जात असत. त्या वेळी मेसोपोटेमियामध्ये हडप्पा-संस्कृतीचा सध्याच्या भारत आणि पाकिस्तानातील प्रदेश ‘मेलुहा’ या नावानं ओळखला जात असे.

प्राचीन मेसोपोटेमियामध्ये सुमेर, अक्कड, हिट्टाइट इत्यादी राज्ये होऊन गेली. मेसोपोटेमियामध्ये ४२०० वर्षांपूर्वी ‘अक्कड’ या नावानं ओळखलं जाणारं राज्य होतं. त्यांची तटबंदी असलेली शहरं होती. या शहरांतून घरांबरोबरच तिथल्या स्थानिक देवतांची मंदिरं होती.

या अक्कड राज्याचा सार्गोन (राज्यकाळ : इसवीसनपूर्व २३३४-२२७९ वर्षं) नावाचा राजा त्याच्या एका लेखात उल्लेख करतो की, ‘मेलुहा, मगन आणि दिलमुन या प्रदेशांतून आलेली जहाजं माझ्या राज्याच्या बंदरात उभी आहेत’. यातील ‘मगन’ म्हणजे सध्याच्या ओमान देशाच्या आसपासचा प्रदेश, ‘दिलमुन’ म्हणजे सध्याच्या बहारीन आणि कतार या देशांच्या आसपासचा प्रदेश, तर ‘मेलुहा’ म्हणजे सध्याच्या भारत आणि पाकिस्तानातील हडप्पा-संस्कृतीचा प्रदेश. म्हणजे या प्रदेशांतून जहाजानं प्राचीन मेसोपोटेमियापर्यंत, म्हणजे सध्याच्या इराकपर्यंत, व्यापार होत होता.

त्या वेळी भारतातील गुजरात, सिंधच्या किनाऱ्यांवरील बंदरांतून हडप्पा-संस्कृतीतील व्यापाऱ्यांची जहाजं इराणच्या आखातातून इराकमधील बंदरांपर्यंत जात होती. याशिवाय, कदाचित सध्याच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणमधून जाणारे जमिनीवरील व्यापारीमार्ग इराकपर्यंत जोडलेले असावेत.

प्राचीन इराकमधील ४१०० वर्षांपूर्वीचा ‘लगाश’ नावाच्या छोटेखानी राज्याचा गुडेया नावाचा राजा त्याच्या एका लेखात ‘मेलुहा इथले लोक (म्हणजेच हडप्पा-संस्कृतीतील व्यापारी ) येऊन त्याच्या राज्यात सोनं आणि कार्नेलिअन नावाचं रत्न विकतात’ असं सांगतो. इराकमधील ‘उर’या ठिकाणी असणाऱ्या ४४०० वर्षांपूर्वीच्या शाही दफनांमधून कार्नेलिअन आणि लापिज लाझुली यांचे मणी वापरून केलेले दागिने सापडले आहेत. हे मणी अर्थातच हडप्पा-संस्कृतीतील शहरांतून पाठवले गेले होते. याखेरीज हडप्पाकालीन चौकोनी मुद्रादेखील इराकमध्ये सापडल्या आहेत. त्या काळी हडप्पा-संस्कृतीच्या प्रदेशातून कार्नेलिअन आणि लापिझ लाझुली या मौल्यवान दगडांचे मणी, सोनं, शिसवीचं लाकूड इराकमध्ये निर्यात केलं जात असे.

भारतापासून अंदाजे ३००० किलोमीटर दूर असणाऱ्या प्राचीन इराकमध्ये हडप्पा-संस्कृतीतील व्यापारी अर्थातच मध्यस्थाकरवी काम करवून घेत असावेत. केवळ मध्यस्थच नव्हे तर, इराकमधील स्थानिक भाषेच्या अडचणीमुळे त्यांच्यासाठी दुभाषेदेखील काम करत होते. ‘शु-इलिशु, मेलुहाच्या भाषेचा दुभाषी’ असा लेख असलेली एक दंडगोलाकार मुद्रा संशोधकांना सापडली आहे. इराकमधील प्राचीन भाषेत आणि तिथल्या क्युनिफॉर्म नावाच्या लिपीत लिहिलेली ही मुद्रा वाचता येते. या लेखात उल्लेख केलेला ‘शु-इलिशु’ नावाचा माणूस इराकमधील स्थानिक भाषेत आणि मेलुहाच्या, म्हणजे अर्थातच हडप्पा-संस्कृतीच्या भाषेत, दुभाषाचं काम करत असे. ही मुद्रा म्हणजे त्याचा शिक्का होता.

याशिवाय, इराकमधील चार हजार वर्षांपूर्वीच्या काही मातीच्या मुद्रांवरील लेखांमध्ये प्राचीन मेसोपोटेमियात मेलुहातील लोकांचं (म्हणजेच हडप्पा-संस्कृतीतील लोकांचे) गाव असल्याची माहिती मिळते.

इराकमधील मुद्रांवरील लेखांतून आजपासून साधारणपणे ४३०० ते ३८०० वर्षांपूर्वीपर्यंत मेलुहा या प्रदेशाचे उल्लेख येतात. त्यानंतर ते येत नाहीत. अर्थात्, ३८०० वर्षांपूर्वी हडप्पा-संस्कृतीतील शहरांना हळूहळू उतरती कळा लागली होती. त्यामुळे हा आंतरराष्ट्रीय व्यापार हळूहळू बंद पडला.

४२०० वर्षांपूर्वी हडप्पा-संस्कृतीतील व्यापारी व्यापारानिमित्त जवळजवळ ३००० किलोमीटरवर असणाऱ्या इराकमध्ये समुद्रमार्गानं जात असत. इतकंच नव्हे तर, ८०० वर्षं इराकमधील वेगवेगळ्या राज्यांशी व्यापार करत असत, तिथं राहत असत. व्यापारासाठी उत्तर अफगाणिस्तानमध्ये जाऊन आपलं छोटं गाव वसवत असत... हे पाहून थक्क व्हायला होतं!

हडप्पा-संस्कृतीनंतरच्या काळातील अशा भारतीय संस्कृतीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधांच्या खुणा युरोप, आफ्रिका आणि आशियातील विविध देशांतून सापडल्या आहेत. त्यांची कालक्रमानुसार ओळख आपण यापुढील लेखांतूनही करून घेणार आहोत.

(सदराचे लेखक हे सांस्कृतिक वारसा-अभ्यासक आहेत.)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Businessculture
loading image
go to top