प्राचीन ‘भारत-रोम व्यापार’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Ivory Idols
प्राचीन ‘भारत-रोम व्यापार’

प्राचीन ‘भारत-रोम व्यापार’

- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com

रोमन साम्राज्य आणि चीन यांच्या दरम्यान खुष्कीच्या रेशीममार्गानं सुरू असलेल्या व्यापाराबरोबरच भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून समुद्रमार्गानं इजिप्तमधून रोमन साम्राज्याशीही व्यापार सुरू होता. याला ‘भारत-रोम व्यापार’ असं म्हटलं जातं. या व्यापाराबद्दल आणि या व्यापारातील महाराष्ट्राशी संबंधित काही रंजक नोंदी पाहू.

दोन हजार वर्षांपूर्वी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून इजिप्तकडे समुद्रमार्गानं प्रवासाचा मार्ग पुन्हा खुला झाला. अर्थात्, चार हजार वर्षांपूर्वी हडप्पा संस्कृतीतील भारतीय व्यापारी समुद्रीमार्गानं इराण, इराकपर्यंत जात होतेच; परंतु त्यानंतरच्या काळात हा समुद्री मार्ग विशेष वापरला गेला नसावा. रोमन साम्राज्यात भारतीय आणि चिनी वस्तूंना असलेल्या मोठ्या मागणीमुळे ग्रीक, रोमन, अरब आणि भारतीय व्यापारी आणि खलाशी यांनी दोन हजार वर्षांपूर्वी हा समुद्री मार्ग पुन्हा एकदा वापरण्यास सुरुवात केली.

भारताच्या पश्चिम आणि दक्षिण सागरी किनाऱ्यावरील हा व्यापार इतका वाढला की या व्यापारासाठी माहितीपुस्तिकाही लिहिण्यात आली होती. अंदाजे १९५० वर्षांपूर्वी परदेशी खलाशी आणि व्यापारी यांच्यासाठी लिहिलेली ‘पेरिप्लस ऑफ द एरिथ्रिअन सी’ (म्हणजे, एरिथ्रिअन समुद्रातील भ्रमण) या नावाची एक छोटेखानी माहितीपुस्तिका उपलब्ध आहे.

तीत अरबस्तान, आफ्रिका आणि भारत या प्रदेशांतील विविध भागांतून मिळणारा व्यापारीमाल, मौल्यवान वस्तू, त्यांची व्यापारीकेंद्रं इत्यादी माहिती दिलेली आहे. या पुस्तिकेच्या लेखकाचं नाव माहीत नाही; मात्र, ग्रीक भाषेत लिहिलेली ही पुस्तिका एखाद्या परदेशी खलाशानं लिहिलेली आहे.

या पुस्तिकेत उल्लेख केल्यानुसार, गुजरातमधील भडोच हे एक महत्त्वाचं बंदर होतं. त्या वेळी नहपान नावाचा शक राजा तिथं राज्य करत होता. भडोच या बंदरात तांबं, जस्त, शिसं यांची आयात केली जात असे, तर तिथल्या राजासाठी परदेशातून चांदीची भांडी, वाईन, वादक आणि उंची वस्त्रं आयात केली जात होती.

भडोचमधून समुद्री मार्गानं नीळ, लापिज लाझुली आणि इतर मौल्यवान दगड, हस्तिदंत, सुती कापड, सुती वस्त्रं, चिनी रेशीम, मिरे इत्यादी वस्तू रोमन साम्राज्यात निर्यात केल्या जात असत. चिनी रेशमाचे धागे, रेशमी कापडाचे तागे इत्यादी चीनमधून खुष्कीच्या मार्गानं अफगाणिस्तानातून सध्याच्या पाकिस्तानमध्ये आणले जात. तिथून ते भडोच इथं नेले जात असे. भडोचमधून रोमन साम्राज्यात जहाजानं इतर वस्तूंबरोबरच हे चिनी रेशीम पाठवले जात असे, अशी माहितीही या पुस्तिकेतून मिळते, तर उज्जैनमधून सुती कापड आणून तेदेखील भडोचमधून निर्यात केलं जात होतं.

महाराष्ट्रातील व्यापारीकेंद्र

भडोचच्या दक्षिणेला ‘दक्षिणापथ’ नावाचा प्रदेश असल्याची माहिती या पुस्तिकेत आहे. दक्षिणापथ म्हणजे सध्याच्या महाराष्ट्र. मात्र, त्याबरोबरच यात कदाचित उत्तर कर्नाटक, उत्तर आंध्र प्रदेश, तेलंगण इत्यादी राज्यांचा प्रदेश असावा. जुन्नरजवळील नाणेघाट इथल्या लेण्यातील २००० वर्षांपूर्वीच्या शिलालेखात सातवाहन कुळातील श्रीसातकर्णी राजाला ‘दक्षिणापथपती’ म्हणून संबोधलेलं आहे.

या दक्षिणापथावरील पैठण आणि तेर या दोन महत्त्वाच्या व्यापारीकेंद्रांचा उल्लेख या पुस्तिकेत असून, तो महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. भडोचपासून १२ दिवसांच्या प्रवासाच्या अंतरावर पैठण हे नगर आणि पैठणच्या पूर्वेला १० दिवसांच्या प्रवासानंतर तगर (तेर) नावाचं मोठं नगर येतं. प्राचीन तगर म्हणजे सध्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या नगरातून मोठ्या प्रमाणात साधं सुती कापड, विविध प्रकारची सुती वस्त्रं निर्यात करण्यासाठी भडोच इथं नेली जात असत. महाराष्ट्रातील सोपारा, कल्याण, चौल इत्यादी बंदरांत ग्रीकांची जहाजं येत असल्याचा उल्लेख या पुस्तिकेत आहे.

कोल्हापूर इथल्या ब्रह्मपुरी या भागात उत्खननादरम्यान काही सातवाहनकालीन धातूची शिल्पं आणि वस्तू सापडल्या होत्या. साधारणपणे १८०० वर्षांपूर्वीच्या या वस्तूंबरोबरच इथं पोसायडॉन नावाच्या ग्रीक समुद्रदेवतेची धातूची छोटेखानी मूर्ती सापडली होती. म्हणजे १८०० वर्षांपूर्वी कोल्हापूर इथल्या ब्रह्मपुरी इथं काही ग्रीक व्यापारी राहत होते किंवा त्यांची इथं थोड्या कालावधीसाठी वस्ती होती. समुद्री मार्गानं प्रवास करणारे हे ग्रीक व्यापारी अर्थातच पोसायडॉन या समुद्रदेवतेची पूजा करत असावेत.

पोम्पेई इथली हस्तिदंती मूर्ती

भारत आणि रोम साम्राज्याच्या व्यापाराचा अजून एक पुरावा रोमन साम्राज्याच्या प्रदेशात सध्याच्या इटलीत सापडतो. इटलीमधील नेपल्स शहराच्या जवळ पोम्पेई हे रोमन नगर होतं. इसवीसन ७९ मध्ये २४ ऑगस्ट रोजी (आजपासून १९४२ वर्षांपूर्वी) शेजारील ज्वालामुखीच्या उद्रेकात पोम्पेई आणि एर्कुलानम नावाची ही रोमन शहरं ज्वालामुखीच्या गरम राखेखाली गाडली गेली. या तप्त राखेमुळे या शहरांभोवती आवरण पडलं आणि शहरातील घरं, वस्तू, भिंतींवरील चित्रं...सर्व काही राखेखाली दबलं गेलं. मात्र, तीनशे वर्षांपूर्वी उत्खननादरम्यान इथलं एकेक घर, तिथल्या वस्तू संशोधकांच्या समोर आल्या.

सन १९३८ मध्ये इटालियन पुरातत्त्वज्ञ अमादेव माइयुरी यांना उत्खननादरम्यान पोम्पेईमधील एका घरात एका हस्तिदंती मूर्तीचे अवशेष सापडले. ही हस्तिदंती प्रतिमा एका स्त्रीची असून ही लक्ष्मीची मूर्ती असावी असा संशोधकांचा अंदाज आहे. काही संशोधकांच्या मतानुसार, ही केवळ एका यक्षीची मूर्ती असावी.

भारतीय केशभूषा आणि वेशभूषा या हस्तिदंती मूर्तीत पूर्णपणे दिसून येते. भारतातील १९०० वर्षांपूर्वीच्या सातवाहनकालीन स्त्रीमूर्ती आणि पोम्पेई इथं सापडलेल्या हस्तिदंती मूर्तीच्या केशभूषेत, वेशभूषेत आणि दागिन्यांत साम्य आहे. म्हणजेच भारतात तयार केली गेलेली ही मूर्ती इसवीसन ७९ मध्ये, म्हणजे आजपासून अंदाजे १९४२ वर्षांपूर्वी - पोम्पेई हे नगर ज्वालामुखीच्या राखेखाली गाडले जाण्यापूर्वीच - रोमन साम्राज्यातील पोम्पेई इथं नेण्यात आली होती.

ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. म. के. ढवळीकर यांच्या मतानुसार, पोम्पेई इथं सापडलेली ही हस्तिदंती मूर्ती महाराष्ट्रात तयार करण्यात आली असावी. महाराष्ट्रातील भोकरदन इथंदेखील पोम्पेई इथल्या मूर्तीशी काहीसं साम्य असणारी मूर्ती सापडली आहे. त्यावरून त्याकाळी महाराष्ट्रात हस्तिदंती मूर्ती तयार केल्या जात असाव्यात. पोम्पेई इथं सापडलेली मूर्ती महाराष्ट्रात तयार करून कदाचित भडोचमार्गे रोमन साम्राज्यात समुद्री मार्गानं निर्यात केली गेली असावी. त्यामुळे, १९०० वर्षांपूर्वी केवळ सुती वस्त्रंच नव्हेत तर, अशा प्रकारच्या हस्तिदंती वस्तूदेखील महाराष्ट्रातून रोमन साम्राज्यात निर्यात होत असाव्यात हे लक्षात येतं.

भारताशी आणि चीनशी सुरू असलेला रोमन साम्राज्याचा व्यापार हा जीवनावश्यक वस्तूंचा नव्हता तर नीळ, रेशमी आणि सुती वस्त्रं, मौल्यवान रत्नं, हस्तिदंती वस्तू, मसाल्याचे पदार्थ इत्यादी चैनीच्या वस्तूंचा होता. त्यामुळे १९०० वर्षांपूर्वी प्लिनी नावाच्या रोमन इतिहासकारानं यावर टीका केली होती. ‘रोमन स्त्रियांच्या चैनीखातर रोमन साम्राज्याला हा व्यापार सुरू ठेवावा लागत आहे आणि या व्यापारामुळे रोमन सोन्याचा ओघ भारताकडे वाहत आहे, अशी तक्रारही तो करतो. यावरून भारत आणि रोम यांच्यात सुरू असलेल्या या व्यापाराच्या प्रमाणाचा काहीसा अंदाज येतो.

महाराष्ट्रात अंदाजे २००० ते १७०० वर्षांपूर्वीच्या दरम्यान हा आंतरराष्ट्रीय व्यापार मोठ्या प्रमाणात होत होता. याच काळात महाराष्ट्रातील शेतकरी, व्यापारी, मध्यस्थ, राजे यांना या व्यापारापासून मोठा आर्थिक फायदा होत होता. त्यांनी तत्कालीन बौद्ध लेण्यांना, विहारांना दाने दिल्यामुळे या काळात महाराष्ट्रातील बौद्धलेणीनिर्मिती मोठ्या प्रमाणात वाढली. भाजे, कार्ले, बेडसे, जुन्नर, कान्हेरी, अजंठा, कऱ्हाड, कुडा, महाड इत्यादी ठिकाणी व्यापारीमार्गांवर बौद्धलेणीसमूह निर्माण झाले. कार्ले इथल्या १९०० वर्षांपूर्वीच्या चैत्यगृहात यवन (म्हणजे, आयोनियन-ग्रीक) व्यापाऱ्यांचे, व्यक्तींचे लेखही आढळून येतात ते या व्यापारामुळेच.

सतराशे वर्षांपूर्वी रोमन साम्राज्य, चीनमधील हान घराण्याचं साम्राज्य लयाला गेल्यावर या व्यापाराला काहीसा फटका बसला; परंतु लवकरच हा आंतरराष्ट्रीय व्यापार पुन्हा सुरू झाला. अगदी मध्ययुगातही राष्ट्रकूट आणि शिलाहार राजांच्या काळात महाराष्ट्रातील बंदरांमधून आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू राहिला. मध्ययुगातील या व्यापाराबद्दलची माहिती नंतरच्या लेखांमधून ओघानं येईलच.

(सदराचे लेखक हे सांस्कृतिक वारसा-अभ्यासक आहेत.)

टॅग्स :IndiaBusinesssaptarang