‘मी सन’ व्हिएतनाममधील प्राचीन तीर्थक्षेत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anand Kanitkar writes Mi Sun an ancient pilgrimage site Vietnam

व्हिएतनाममधील प्राचीन चंपा राज्याची ओळख आपण मागील लेखात करून घेतली. या लेखात आपण तेथील प्राचीन तीर्थक्षेत्र असलेल्या ‘मी सन’ नावाच्या प्रसिद्ध स्थळाची माहिती घेणार आहोत.

‘मी सन’ व्हिएतनाममधील प्राचीन तीर्थक्षेत्र

- आनंद कानिटकर

व्हिएतनाममधील प्राचीन चंपा राज्याची ओळख आपण मागील लेखात करून घेतली. या लेखात आपण तेथील प्राचीन तीर्थक्षेत्र असलेल्या ‘मी सन’ नावाच्या प्रसिद्ध स्थळाची माहिती घेणार आहोत.

मी सन व्हिएतनाममधील प्राचीन चंपा राज्यात अमरावती नावाचा प्रदेश होता हे आपण मागील लेखात पाहिलं. अमरावती प्रदेशात सध्याचं ‘होई आन’ हे प्राचीन बंदर होतं. या अमरावती प्रदेशाची सिंहपूर (म्हणजे सध्याचं ‘त्रा क्यू’) ही राजधानी होती. या सिंहपुराजवळ मी सन हे महत्त्वाचं धार्मिक स्थळ होतं.

व्हिएतनाममधील प्रसिद्ध ‘थू बॉन’ नदीच्या खोऱ्यात मी सन हे ठिकाण आहे. सध्याच्या थू बॉन या नदीचं प्राचीन नाव ‘महानदी’ होतं आणि मी सनच्या दक्षिणेला असणाऱ्या पर्वताचं प्राचीन नाव ‘महापर्वत’ होतं, असं तेथील शिलालेखांतून समजतं. प्राचीन भारतीय संस्कृतीतील मेरूपर्वत किंवा कैलासपर्वतासमान हा महापर्वत असल्याचं मानलं जात असे. या महापर्वतामुळे आणि गंगेप्रमाणे पवित्र मानल्या जाणाऱ्या महानदीमुळे मी सन या स्थानाला शैव तीर्थस्थानाचं महत्त्व प्राप्त झालं असल्यास नवल नाही. चंपा राज्यातील अनेक चामवंशीय राजांनी मी सन येथे मंदिरं उभारल्यामुळे या राजांसाठी ते अत्यंत महत्त्वाचं तीर्थक्षेत्र होतं हे नक्की. सन १८९८ मध्ये मी सन येथील मंदिरांचा पुनर्शोध लागल्यावर एन्री पारमोन्तिए नावाच्या फ्रेंच अभ्यासकांनी १८९९ पासून या मंदिरांचा अभ्यास सुरू केला. त्यांनी पहिल्यांदा नोंद केल्यानुसार, मी सन येथे तेव्हा उभी असलेली लहान-मोठी मंदिरं, गोपुरं, मंडप मिळून अंदाजे ७० वास्तू होत्या.

संस्कृत शिलालेख

मी सन येथे लहान-मोठे अंदाजे ३३ शिलालेख सापडले आहेत. हे शिलालेख संस्कृत भाषेत लिहिलेले असून इसवीसनाच्या आठव्या शतकानंतरचे शिलालेख संस्कृतबरोबरच स्थानिक चाम भाषेतही लिहिलेले आहेत. संस्कृत शिलालेखांत शार्दूलविक्रीडित, वसंततिलका, आर्या, शिखरिणी, मालिनी इत्यादी वृत्तांचा वापर करण्यात आला आहे. अर्थात्, यातील अनेक शिलालेख आता खंडित झाले आहेत. येथील सर्वात जुना शिलालेख इसवीसनाच्या अंदाजे चौथ्या/पाचव्या शतकातील असून सर्वात शेवटचा शिलालेख इसवीसनाच्या तेराव्या शतकातील आहे. म्हणजे, पंधराशे वर्षांपूर्वीपासून ते किमान सातशे वर्षांपूर्वीपर्यंत मी सन हे प्राचीन चंपा राज्यातील एक महत्त्वाचं धार्मिक स्थळ होतं. भद्रवर्मन, प्रकाशधर्म, जयइंद्रवर्मन इत्यादी चामवंशीय राजांनी मी सन येथे मंदिरं उभारल्याचे, शिवलिंगांची स्थापना केल्याचे किंवा मंदिरांची पुनर्बांधणी केल्याचे उल्लेख येथील शिलालेखांतून येतात. या शिवमंदिरांची भद्रेश्वरस्वामी, हरिवर्मेश्वर, ईशानभद्रेश्वर अशी नावंही या शिलालेखांतून येतात. या चाम राजांनी मुकुट, दागिने, पूजेसाठीची विविध भांडी, सोनं, चांदी, रत्नं, हत्ती, बैल यांचं दान मंदिरांना दिल्याचे उल्लेख या शिलालेखांतून आढळतात.

फ्रेंच अभ्यासकांनी अभ्यासाच्या दृष्टिकोनातून नोंद करण्याकरता मी सन येथील मंदिरसमूहांना ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच इत्यादी समूहांत विभागलेलं आहे, तर एका समूहातील मंदिरांना, अवशेषांना ए१, ए२, ए३... असे क्रमांक दिलेले आहेत. हेच क्रमांक अजूनही संदर्भासाठी वापरले जातात. मी सन येथील ‘ए’ समूहातील मंदिरामध्ये सापडलेला भद्रवर्मन राजाचा शिलालेख हा मी सन येथील सर्वात प्राचीन शिलालेख आहे. भद्रवर्मन हा राजा इसवीसनाच्या चौथ्या शतकाच्या शेवटी, म्हणजे आजपासून सोळाशे वर्षांपूर्वी, चंपा येथे राज्य करत असावा असा संशोधकांचा अंदाज आहे. त्यानं येथे ‘भद्रेश्वरस्वामी’ या नावानं शिवलिंगाची स्थापना केली होती. भद्रवर्मन राजानं लाकूड आणि विटा वापरून उभारलेलं शिवमंदिर पुढं काही वर्षांत आगीत भस्मसात झालं. त्याच ठिकाणी नंतर शंभुवर्मन राजानं शंभुभद्रेश्वर नावाचं नवीन मंदिर बांधलं. येथील ‘बी’ मंदिरसमूहातील ‘बी१’ हे मंदिर मी सन येथे दान मिळालेल्या मंदिरातील शेवटचं मंदिर असावं. इसवीसनाच्या तेराव्या शतकात लिहिलेल्या एका शिलालेखानुसार, हे ‘श्रीशानभद्रेश्वर’ या नावानं ओळखलं जाणारं शिवमंदिर होतं. अर्थात्, येथे सर्व शिवमंदिरं असली तरी या मंदिरांच्या शिलालेखांत कुबेर, ब्रह्मा, विष्णू इत्यादी देवांची नावंही आढळतात. मी सन येथे सापडलेली तेराशे वर्षांपूर्वीची शेषशायी विष्णूची मूर्ती अतिशय सुंदर आहे.

विटांची मंदिरं

मी सन येथील मंदिरसमूहाची रचना साधारणपणे पुढीलप्रमाणे आहे. मध्यभागी मुख्य शिवमंदिर, त्याभोवती पार्वती, कार्तिकेय, गणेश यांची छोटी मंदिरं, काही ठिकाणी अष्टदिक्पाल, म्हणजे आठ दिशांच्या रक्षकदेवता, नवग्रह यांची छोटेखानी मंदिरं मिळून मी सन येथील एक मंदिरसमूह तयार झालेला आहे. याशिवाय, येथे एक कोशगृह आहे. कोशगृह म्हणजे मंदिरात पूजेसाठी वापरली जाणारी उपकरणं, वस्तू ठेवण्यासाठीची वेगळी वास्तू. या सर्व मंदिरसमूहाभोवती एक भिंत उभारलेली असे. मंदिराच्या आवारात प्रवेश करण्यासाठी गोपुर होतं. गोपुरासमोर वेगळा आयताकार मंडप असे. शिवाय, या भिंतीच्या बाहेर गोपुराच्या एका बाजूला मंदिर-उभारणीचा शिलालेखही स्वतंत्र छोटेखानी चौकोनी मंडपात ठेवलेला असे.

मी सन येथील उभ्या असलेल्या या मंदिरांचे चौकोनी गाभारा आणि त्यावरील शिखर असं स्वरूप सुरुवातीच्या काळापासून ते शेवटपर्यंत बऱ्यापैकी एकसारखं राहिलं आहे. फक्त त्यावरील नक्षीकाम, चिन्हं, काही स्थापत्यघटक यांच्यात फरक पडलेला असावा असं अभ्यासकांचं मत आहे. मी सन येथील ही मंदिरं जरी भाजलेल्या विटांनी बांधलेली असली तरी त्यावरील दाराची चौकट, खांब, काही मूर्ती या वालुकाश्मात (सँडस्टोन) घडवलेल्या असत.

सद्यःस्थिती

सन १८९९ मधील नोंदींनुसार मी सन येथे ७० इमारतींचे अवशेष होते. व्हिएतनामच्या युद्धात १९६९ मध्ये अमेरिकेनं केलेल्या हवाईहल्ल्यात मी सन येथील अनेक मंदिरं, गोपुरं, भिंती जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे इथं आता केवळ १५ मंदिरे पूर्णपणे उभी असलेली दिसतात. इथल्या अनेक मूर्ती, तसंच नक्षीदार खांब व्हिएतनामच्या युद्धाआधीच विविध संग्रहालयांत हलवले गेले असल्यानं ते सुदैवानं सुरक्षित राहिले. त्यानंतरची अनेक दशकं व्हिएतनाम सरकार मी सन हे स्थळ आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या सहकार्यानं जपण्याचा प्रयत्न करत आहे. मी सन येथील या मंदिरसमूहांवरून भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील शेकडो वर्षांचे सांस्कृतिक संबंध लक्षात येतात. भारतीय संस्कृतीचा, हिंदू कलास्थापत्याचा व्हिएतनाममधील तत्कालीन स्थानिक समाजावर पडलेला प्रभाव अधोरेखित होतो. या विविध कारणांनी ‘युनेस्को’नंदेखील १९९९ मध्ये मी सन येथील मंदिरांना ‘जागतिक वारसास्थळ’ म्हणून घोषित केलं आहे.