आग्नेय आशियातील महिषासुरमर्दिनी!

प्रागैतिहासिक काळापासून मानव विविध रूपांतील देवतांची आराधना करत आला आहे. स्त्रीच्या सृजनशक्तीचा आदर करण्यासाठी म्हणूनच त्याने शक्तीची पूजा करायला सुरुवात केली असावी.
mahishasura mardini idols
mahishasura mardini idolssakal
Summary

प्रागैतिहासिक काळापासून मानव विविध रूपांतील देवतांची आराधना करत आला आहे. स्त्रीच्या सृजनशक्तीचा आदर करण्यासाठी म्हणूनच त्याने शक्तीची पूजा करायला सुरुवात केली असावी.

- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com

प्रागैतिहासिक काळापासून मानव विविध रूपांतील देवतांची आराधना करत आला आहे. स्त्रीच्या सृजनशक्तीचा आदर करण्यासाठी म्हणूनच त्याने शक्तीची पूजा करायला सुरुवात केली असावी. जगभर मिळणाऱ्या प्रागैतिहासिक काळातील मातृदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या मूर्ती याची साक्ष देतात. भारत व पाकिस्तानातील सिंधू संस्कृतीच्या स्थळांमध्येदेखील मातृदेवतांच्या मातीच्या भाजलेल्या मूर्ती उत्खननात सापडल्या आहेत.

उत्तर भारतात कुशाण राजवंशाच्या काळातील, म्हणजे आजपासून साधारणपणे अठराशे वर्षांपूर्वीच्या महिषासुरमर्दिनीच्या काही मूर्ती मिळाल्या आहेत. या मूर्ती म्हणजे भारतातील आतापर्यंत सापडलेल्या महिषासुरमर्दिनीच्या सर्वांत प्राचीन मूर्ती आहेत. या मूर्तींमध्ये देवी चतुर्भुजा दाखवलेली असून, ती कोणत्याही शस्त्राशिवाय केवळ तिच्या पुढील दोन हातांनी एका महिषाला पकडून मारते आहे, अशा स्वरूपातील आहे. मथुरेच्या आसपास सापडणाऱ्या लाल वालुकाश्मात (सँडस्टोन) घडवलेल्या कुशाणकाळातील या मूर्ती साधारणपणे नऊ इंच उंचीच्या आहेत. मूर्तींच्या लहान स्वरूपावरून या मूर्ती खासगी पूजेत वापरल्या जात असाव्यात, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

कुशाण राजवटीनंतर उत्तर भारतात राज्य करणाऱ्या गुप्त राजवंशाच्या काळात, म्हणजे इसवी सनाच्या चौथ्या आणि पाचव्या शतकात अनेक देवी-देवतांच्या मूर्तींची मानकं बनली. तशीच मानकं दुर्गा महिषासुरमर्दिनीच्या मूर्तींचीही बनली. मध्य प्रदेशातील उदयगिरी येथील लेण्यांमध्ये गुप्तकाळातील एक सुंदर द्वादश भुजांची महिषासुरमर्दिनी कोरलेली आहे. तिने हातामध्ये वज्र, खड्ग, त्रिशूळ, भाला, घंटा इत्यादी घेतलं आहे. तिचा डावा पाय महिषासुराच्या डोक्यावर ठेवलेला आहे, तर हातातील त्रिशुळाने त्याचा वध करते आहे.

शैवपंथासोबत पार्वती किंवा दुर्गेची उपासना सध्याच्या भारताच्या सीमा ओलांडून भारताबाहेरही पोचली. अफगाणिस्तानात गझनी येथील ‘टेपे सरदार’ येथे एक महिषासुरमर्दिनीची भग्न मूर्ती उत्खननात मिळाली होती. तसंच पाकिस्तानात सापडलेली एक महिषासुरमर्दिनीची मूर्ती तेथील संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहे. भारताशेजारील नेपाळ, बांगलादेश इत्यादी देशांमध्येही महिषासुरमर्दिनीच्या अनेक मूर्ती सापडल्या आहेत. नेपाळमध्ये आजही विजयादशमीच्या दिवशी महिषासुरमर्दिनीच्या मंदिरांतून देवीची पूजा होते.

दक्षिण आशियाप्रमाणेच आग्नेय आशियातदेखील इंडोनेशिया, कंबोडिया इत्यादी देशांमध्येदेखील महिषासुरमर्दिनीच्या अनेक मूर्ती सापडल्या आहेत. व्हिएतनाममधील भगवतीदेवीच्या मूर्तीबद्दल आपण यापूर्वी या सदरातील स्वतंत्र लेखात माहिती घेतली आहे. व्हिएतनाममधील प्राचीन शैवमंदिरांत आपल्याला पार्वतीच्या मूर्ती आढळून येतात. मात्र, तिथं तिचं महिषासुरमर्दिनी हे रुद्र रूप दिसत नाही.

कंबोडिया

कंबोडियावरील लेखांमध्ये आपण तेथील शैवमंदिरांबद्दल ओळख करून घेतली आहे. या मंदिरांतून अनेकदा आपल्याला उमामहेश्वराच्या मूर्ती आढळतात. कंबोडियातील ‘बांते श्राय’ या अकराशे वर्षांपूर्वीच्या मंदिरातील एका प्रवेशद्वाराच्या वरील भागात आपल्याला महिषासुरमर्दिनीची मूर्ती दिसते. या मूर्तीत देवी महिषासुराशी युद्ध करताना दाखवलेली आहे. कंबोडियात महिषासुरमर्दिनीच्या पाषाणातील स्वतंत्र मूर्तीदेखील आढळतात. म्हणजे तेथील मंदिरांतून या मूर्तींची पूजा होत होती. या महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीच्या पीठावर महिषमुखाचं रेखाचित्र कोरलेलं असतं, त्यावरून या प्रतिमेची ओळख आपल्याला पटते. कंबोडिया येथील महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीत अशा पद्धतीने महिषाचं अंकन करण्याचा प्रभाव दक्षिण भारतातील मंदिरांतील देवीच्या मूर्तींवरून पडलेला असावा.

कंबोडियातील महिषासुरमर्दिनीच्या ब्राँझमध्ये केलेल्या एका मूर्तीचा उल्लेख केला पाहिजे. साधारणपणे एक हजार वर्षांपूर्वी निर्माण केलेली दीड फूट उंचीची ही महिषासुरमर्दिनीची मूर्ती अद्वितीय अशीच आहे. या मूर्तीत देवीने मस्तकावर किरीट घातलेला असून, कंबोडियातील स्थानिक पद्धतीचं वस्त्र नेसलेलं आहे. या मूर्तीच्या अंगावर दागिने दाखवलेले नाहीत, त्यामुळे कदाचित सोन्या-चांदीचे वेगळे दागिने या मूर्तीवर घातले जात असावेत असं लक्षात येतं. कंबोडियात देवतांच्या मूर्तींना घातले जाणारे कुंडल, मुकुट, कंठा इत्यादी सोन्याचे दागिने सापडले आहेत.

कंबोडियातील या मूर्तीमध्ये देवी चतुर्भुजा दाखवलेली असून, ती उभ्या असलेल्या पीठावर दाखवलेल्या महिषमुखावरून आपल्याला ती महिषासुरमर्दिनीची मूर्ती असल्याचं समजतं. दक्षिण भारतातील काही मंदिरांतील महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती अशाच पद्धतीने केवळ पादपीठावर महिषमुख दाखवलेल्या आहेत.

इंडोनेशिया

इंडोनेशियात महिषासुरमर्दिनीच्या अत्यंत सुंदर मूर्ती आढळून येतात. इंडोनेशियातील प्रंबानन येथील शिवमंदिराबद्दलच्या लेखात आपण येथील एका महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीबद्दलची स्थानिक आख्यायिका बघितली होती. इंडोनेशियातील जावा बेटावर सापडलेल्या एका मूर्तीत अष्टभुजा देवी हातात विविध शस्त्रं घेऊन दाखवली आहे. अकराशे वर्षांपूर्वी निर्माण केलेली ही देवीची मूर्ती जवळजवळ तीन फूट उंच आहे. या शिल्पामध्ये दुर्गा भयंकर रूपात न दाखवता शांत आणि सुंदर रूपात दाखवली आहे. या मूर्तीत देवी महिषाला मारताना दाखवली नसून, ती केवळ त्यावर उभी असल्याचं दाखवलं आहे. अभ्यासकांच्या मते, जावा बेटावरील भातशेतीमध्ये नांगरणीसाठी रेड्याचा वापर होत असल्याने तेथील महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीत देवी महिषाला मारताना दाखवलेली नसावी. या मूर्तीत महिषासुर मानवरूपात बाहेर येऊन देवीच्या कोपापासून आपलं रक्षण करण्यासाठी हात वर घेतलेला दाखवला आहे.

भारतातील आणि भारताबाहेरील दुर्गा महिषासुरमर्दिनीच्या विविध प्रतिमांचा, तिच्या संदर्भातील शिलालेखांचा, तिच्या पूजनाचा अभ्यास करताना लक्षात येणारी महत्त्वाची बाब म्हणजे संकटांवर मात करण्यासाठी व शत्रूवर विजय मिळवण्यासाठी तिची वीरांकडून केली जाणारी आराधना. प्राचीन काळापासून देवीच्या इतर रूपांपेक्षा दुर्गा महिषासुरमर्दिनी रूपात देवीची आराधना विशेषतः वीरपुरुषांनी का केली असावी, याचा बोध कदाचित दुर्गा सप्तशतीमध्ये दिलेल्या ‘महिषान्तकरी येन पूजिता स जगत्प्रभुः’ (ज्याने महिषासुरमर्दिनीला पूजिले, तो जगाचा स्वामी होतो) या वाक्यावरून होऊ शकतो.

(सदराचे लेखक सांस्कृतिक वारसा अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com