अनुभवांची आस हेच उत्क्रांतीचे इंजिन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनुभवांची आस हेच उत्क्रांतीचे इंजिन!

जन्म होतो त्या क्षणापासून आपला अनुभवांचा प्रवास सुरू होतो. अनुभव घेण्यासाठी म्हणूनच सर्व सजीव घटक जन्म घेतात.

अनुभवांची आस हेच उत्क्रांतीचे इंजिन!

- अनिल के. राजवंशी anilrajvanshi50@gmail.com

जन्म होतो त्या क्षणापासून आपला अनुभवांचा प्रवास सुरू होतो. अनुभव घेण्यासाठी म्हणूनच सर्व सजीव घटक जन्म घेतात. त्यांचा समग्र अनुभव आणि जाण विश्वातील उत्क्रांतीच्या प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरतात. ज्ञानाचे, अनुभवाच्या वैशिष्ट्यांचे पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमण आणि ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ हेच डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताचे मूळ आहे. त्यातून ज्ञान सदैव प्रवाही राहणे साधते. ज्ञानाची शिदोरी जमा होते ती अनुभवांतूनच.

आपल्या पृथ्वी ग्रहावर अस्तित्वात असलेल्या जीवनात सर्वोच्च आहे तो मनुष्यप्राणी. त्याच्या आयुष्यातील अनुभवाचा अध्याय सुरू होतो तो मेंदूची निर्मिती होते त्या क्षणापासून आणि जन्मापूर्वीच, गर्भाशयातच ह्याला सुरुवात होते. मेंदू ही स्वायत्त मज्जासंस्था आहे. त्यातील चेतापेशींची पक्की जोडणी (न्यूरॉन्स) सक्रिय होणे आवश्यक आहे. ती सक्रिय झाल्यावरच ज्ञानतंतू जाल आकाराला येते. त्यातून विचार करण्याची आणि स्मरणशक्तीची प्रक्रिया सुरू होते. अशा रीतीने त्यांच्या अस्तित्वासाठी विद्युत लहरी आणि रासायनिक अभिक्रिया सतत सुरू राहिल्या पाहिजेत. संदेशवहन झाले पाहिजे. तसे न झाल्यास न्यूरॉन्स खराब होतील आणि नाश पावतील. ज्ञानेंद्रियाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार ह्या विद्युत लहरी सुरू होतात.

ज्ञानतंतूंच्या मार्गामुळे आठवणी तयार होतात. वेळेनुरूप आणि सततच्या पुनरावृत्तीमुळे या स्मृती तल्लख होतात. आठवणींच्या साठ्याची उत्पत्ती अशा प्रकारे होते. त्याला मानसिक गुंतागुंत म्हणता येईल. अशी मानसिक गुंतागुंत मेंदूची प्रक्रिया शक्ती कमी करते. परिणामी आठवणी कमी असतील, तर चेतापेशी अधिक प्रमाणात उपलब्ध होतात आणि त्यामुळे माहितीचा अर्थ लावण्याची प्रक्रिया अधिक वेगवान व व्यापक होते.

सतत माहितीचा पुरवठा होण्याच्या चेतापेशींच्या गरजेतून कुतुहल, अनुभव घेणे आणि ज्ञान मिळविणे याची उत्कंठा वाढते. अनुभव घेण्याची आस असेल तरच प्रगती, उत्क्रांती होईल. ज्ञानेंद्रियांकडून माहिती मिळवून आपण ज्ञानात भर घालत असतो. जीवनानुभवात आणि म्हणूनच उत्क्रांतीमध्ये ज्ञानेंद्रियांचे प्राधान्य सर्वोच्च आहे.

ज्ञानात भर टाकत राहिल्याने विकास-प्रगती होते. त्यामुळेच ते व्यापकपणे व मुक्तपणे उपलब्ध असल्याचे आपण सर्वांनी आवर्जून पाहिले पाहिजे. नेमके सत्य काय याचा उलगडा झाला की, तो अनुभव आपण मनमोकळेपणाने जगाला सांगायला हवा. ज्ञानाचा नियम आहे - आपण जेवढे अधिक वाटतो, तेवढे ते आपल्याला अधिक प्रमाणात मिळते. हेच ज्ञान आपल्याला कृतिप्रवण करते आणि जगणे अधिक सुखद, सोयीचे करण्यासाठी शोध लावण्यासाठी प्रवृत्त करते.

आपले वय वाढते, तसतशा आठवणी आणि स्मृतिगाठी वाढतात. त्यामुळे स्वाभाविकपणे मेंदूची आकलनाची प्रक्रिया मंदावते. त्याशिवाय ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमताही घटते. या दोहोंच्या परिणामी मेंदूला मिळणाऱ्या माहितीची गुणवत्ता उणावते. त्यामुळे कुतुहलक्षमता कमी होते, नवीन अनुभव घेण्याची इच्छा मंदावते आणि त्यामुळे वृद्धावस्थेत मानसिक सुस्ती येते, अनुत्साह जाणवतो. मेंदूची प्रक्रिया शक्ती कमी झाल्याने, आतल्या आत होणारी आठवणींची घुसळण थांबते. नव्याने आकलन होत नाही. त्यामुळे त्यातून होणारा आनंद आणि समाधान मिळत नाही. शिकण्याची आस मावळल्यामुळे जगण्याची इच्छाही कमी होते. वृद्धपणातील ही सारी अवस्था म्हणजे औदासीन्य आणि मतिभ्रमाची लक्षणे आहेत. असं असलं तरी ज्ञानेंद्रियांना मिळणाऱ्या ताज्या माहितीचा उपयोग करून जगण्यातला रस वाढविता येतो. सुखाच्या क्षणांच्या आठवणींची उजळणी, वेगवेगळ्या परिसरात फिरणे यामुळे मेंदू झटपट सक्रिय होतो.

अशा परिस्थितीत काय करायला हवं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिक कार्यक्षम राहाण्यासाठी मेंदूची आठवणींच्या जंजाळातून (मेमरी नॉट्स) सुटका करायला हवी. हे कसं करता येईल? मनात आलेल्या कोणत्याही गोष्टीवर दीर्घ काळ व सखोल विचार करावा. महर्षी पतंजली यांनी योगसूत्रात सांगितलेल्या संयम या ध्यानपद्धतीची सवय लावून घ्यावी. (‘संयम’ म्हणजे मनावर ताबा ठेवणे. योगसूत्रानुसार चित्ताचे योग्य रीतीने केलेले नियंत्रण म्हणजे संयम होय.) अगदी तरुण वयात आणि स्मृतिकोशात अती भर पडलेली नसतानाच ही क्रिया सुरू केली पाहिजे. संयम ध्यानपद्धतीचा अवलंब केल्याने स्मृतिकोश विघटित होतात आणि मेंदू आयुष्यभर तरतरीत राहतो.

वृद्धपणी चित्ताचे नियंत्रण कसे करता (संयम) येईल? सुखद विचारात रमणे आणि आनंदाच्या आठवणींना उजाळा देऊन हे सहज करता येईल. मित्रांच्या गाठीभेटी घेणं, मुलांबद्दल विचार करणं, जुनी छायाचित्रं पाहण्यात रमणं यातून सुखद स्मृतींची अनुभूती पुन्हा येते. सतत आनंदी विचार करीत राहिल्याने मानसिक गुंतागुंत कमी करता येते.

पण दुर्दैवानं काय होतं की, आयुष्यातल्या आनंदाच्या क्षणापेक्षा दुःखद स्मृतीच सहजपणे येतात, राज्य करतात. याचं कारण असं की, कोणताही प्रसंग ओढावला तर त्याला तोंड देण्यासाठी आणि त्यावर मात करून जगण्यासाठी आपला मेंदू सज्ज असतो. पुढं जाण्याच्या, प्रगतीच्या प्रेरणेनं त्यासाठीच त्याला तशी शिकवण दिलेली असते. आयुष्यातील क्लेशदायी प्रसंग आणि त्यांच्या आठवणी अगदी सहजपणे तसं करण्यास उद्युक्त करी असतात.

एक गहन प्रश्न मात्र कायम आहे. पुनरुत्पादनाची आस का असते? डार्विनने उत्क्रांतीवादाचा सहज सुंदर सिद्धांत मांडताना, पुनरुत्पादनाची कामनाच त्यामागचं उद्दिष्ट आहे, असं दाखवून दिलं. अशा प्रकारे लैंगिक इच्छा सजीवांमध्ये सर्वांत प्रभावी आहे, हे दिसतं. पण पुनरुत्पादनाची तृष्णा का असते, याबद्दल मात्र डार्विनने मौन बाळगलेले दिसते.

जगण्याची इच्छा अनादि काळापासून आहे आणि अनुभव प्राप्त करीत राहणं, हेच आत्म्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी श्रेयस्कर आहे, असं महर्षी पतंजली यांच्या सुत्रात म्हटलं आहे. असं असलं तरी आपल्या प्राचीन शास्त्रविषयक वा धार्मिक ग्रंथांमध्येही याबद्दल सुस्पष्टपणे काही म्हटलेलं नाही.

एकूणच ज्ञान वाढवणं हेच उत्क्रांतीचं संभाव्य कारण असू शकतं. विचार करण्यात गुरफटलेल्या मेंदूंमध्ये ज्ञानाच्या धारणेची क्षमता असते. असे असंख्य मेंदू (अगदी लक्षावधी, कोट्यवधी) या विश्वातल्या ज्ञानामध्ये भर घालत असतात आणि त्यातूनच उत्क्रांती होत असते. हे ज्ञान लौकिक वा भौतिक स्वरूपात (अनुवांशिक वैशिष्ट्ये, लिखित वा इलेक्ट्रॉनिक स्वरूप इत्यादी) किंवा ज्ञानाच्या व्यापक अवकाशात राहते.

असं असलं तरी मला वाटतं की, महास्फोटातून विश्वाची उपपत्ती झाल्याच्या (‘बिग बँग’) सिद्धांतात उत्क्रांतीचं अधिक चांगलं कारण सापडू शकतं. आपल्या विश्वाचा अगदी छोटा भाग (जेमतेम १५ टक्के) दृश्यमान आहे आणि बाकी सारा अंधकार. तो भाग दृश्यमान होईपर्यंत उत्क्रांतीचा वाटचाल सुरूच राहील, असा अंदाज करता येतो. हे नवीन जग निर्माण करण्यासाठी सजीवांची गरज भासणार आहेच. त्यामुळेच पुनरुत्पादनाची इच्छा आणि त्या प्रक्रियेत विश्वातील ज्ञान वाढविण्याची आसही राहील.

Web Title: Anil Rajvanshi Writes Experience Evolution Theory Process

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Experiencesaptarang