कोरोनायुद्धात भारताची जगाला दिशा !

आनिर्बन गांगुली saptrang@esakal.com
Sunday, 3 January 2021

नवा भारत
नवा भारत कसा घडतोय हे जाणून घेण्याची उत्सुकता बहुतेकांना आहे. ‘आयडिया ऑफ न्यू इंडिया’च्या छताखाली काय काय घडतयं ते सांगणारं हे पाक्षिक सदर.

देशाने कोरोनाविरुद्धचे युद्ध उत्तम प्रकारे हाताळले, हा लढा एक लोकचळवळ बनवली, समाज व सरकारनं मिळून या आव्हानाला तोंड दिले, दृढ ऐक्य, राष्ट्रीय एकात्मता व लवचिकता दाखवली, त्यामुळे जगाचं लक्ष भारताकडे वेधले गेले. विविध पातळ्यांवरील सहज पेललेली आव्हाने, सर्व स्तरांतील लोकांना प्रोत्साहन देत एकत्र बांधून ठेवणे, समाजातील प्रत्येक व्यक्तीला काही तरी जबाबदारी उचलण्यासाठी दिलेले प्रोत्साहन, त्याचबरोबर जगाची गरज ओळखून महामारीच्या काळात औषधे व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करीत मोदींना आपल्या नेतृत्व गुणांचा ठसा उमटवला. भारत एक जबाबदार सत्ता म्हणून समोर आला एक जबाबदार सत्ता, जी जगाच्या कल्याणामध्ये सहभागी आहे, एक सत्ता जी जग हे एक कुटुंब आहे, या मूलभूत सत्याचा स्वीकार करते व त्यामुळेच भागीदारी आणि सहकार्य या तत्त्वांवर विश्वास ठेवते...

भारताच्या कोरोना महामारीला हाताळण्याच्या पद्धतीनं तिला जागतिक आरोग्यसेवेच्या नकाशाच्या व आकांक्षांच्या केंद्रस्थानी आणून ठेवले. यामुळे भारत महत्त्वाची व मुख्य सत्ता म्हणून समोर आला असून, तो कोरोनापश्चात जागतिक क्रमवारीला आकार देताना महत्त्वाची भूमिका बजावेल. खरेतर, अगदी मार्च २०२०मध्येच पंतप्रधानांनी ` जी-२०’ देशांशी, युरोपियन युनियनशी चर्चा केली व जागतिकीकरणाच्या नव्या कालखंडासाठी काम करण्याचे आवाहन केले. हे जागतिकीकरण मानवकेंद्रीत, विश्वासाठी कल्याणकारी व ताळमेळ बसविणारे असावे, हेही त्यांनी सांगितले. असे आवाहन करणारे ते पहिलेच नेते होते. त्यांनी भविष्याचा अदमास घेतला होता व जगाच्या पुनर्रचनेत भारताची भूमिका आणि जबाबदारी काय असेल, याची कल्पनाही केली होती.

सप्तरंगमधील आणखी दर्जेदार लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारत २०२१मध्ये जगातील सर्वांत मोठ्या लसीकरणाची मोहीम सुरू करेल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील राजकोट येथे ‘एआयआयएमएस’च्या पायाभरणी कार्यक्रमात केली. देश गेल्या दहा महिन्यांत लसीकरणाच्या महाकाय व्यवस्थेसाठी तयार झाला आहे. त्यासाठी देशानं नियोजनबद्ध तयारी केली असून, संशोधन व प्रयोगांच्या आधारे लशीची निर्मिती केली आहे. पंतप्रधान मोदींच्या शांत, संयमी, सातत्यपूर्ण व  अविचल दृष्टिकोनामुळे आपण या स्थितीपर्यंत येऊन पोचलो आहोत. लशीकरणाची ही मोहीम ऐतिहासिक व अभूतपूर्व असेल व तिला पुन्हा एकदा भारतीय मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर अभ्यासले व अनुसरले जाईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतातील व परदेशातील देशाचा अपमान व विरोध करणारे या काळात शांत बसलेले नव्हतेच. त्यांना असे वाटत होते, की कोरोना महामारीने त्रस्त झालेल्या भारतावर सहजच हल्ला करता येईल. भारतविरोधी शक्तींनी लडाखपासून काश्मीरपर्यंत आणि ‘सीएए’पासून शेतकरी कायद्यांपर्यंतच्या प्रत्येक संधींचा देशात गोंधळ व अस्थिरता माजवण्यासाठी उपयोग केला. मात्र, मोदींच्या नेतृत्वाखालील भारत या देशविरोधी शक्तींच्या विरोधात उभा राहिला. या काळात जागतिक सूर मोठ्या प्रमाणात भारताच्या समर्थनार्थ होता आणि त्यांनी देशाच्या संरक्षणविषयक गरजा व आकांक्षांना पाठिंबाच दिला. मोदींच्या नेतृत्वाखालील भारताने आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आपल्या संरक्षणविषयक हक्कांचा वापर करताना मागेपुढे पाहिले नाही. भारताने २०१६ व २०१९ प्रमाणे २०२० मध्येही न डगमगता आपल्या सीमांचं रक्षण केलं. आपल्या सीमांवर मूलभूत सुविधा उभारण्याचा अधिकार त्वरेने वापरत सीमाभागात मोठ्या प्रमाणात संरक्षण सज्जता केली. स्वातंत्र्यानंतर सात दशकांनी सीमेवरील पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व प्रगती झाली असून, २०२०मध्ये त्याचा परमोच्च बिंदू गाठला गेला.

जम्मू , काश्मीर आणि लडाख भागात विकास व लोकशाहीकरणाची ऐतिहासिक लाट पाहायला मिळाली. कम्युनिस्ट पक्षांचा दबाव, कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व व अपवित्र गुपकर युतीचे काश्मीर प्रश्नाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा केलेला प्रयत्न, अमेरिकेच्या कॉंग्रेसने भारताचा निषेध करावा व पंतप्रधान व गृहमंत्र्यांची आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर निंदा करावी, यासाठी झालेले प्रयत्न, तसेच जम्मू, काश्मीर व लडाखमधील नागरिकांची दिशाभूल व शोषण करण्याचा प्रयत्न होऊनही या नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेवरचा व पंतप्रधान मोदींच्या दृष्टिकोनावरचा विश्वास कायम ठेवला. कोरोना विषाणू व देशविरोधी शक्ती व त्यांच्या समर्थकांनी निर्माण केलेल्या ‘महामारी’ने देश हलला नाही व देशाचा प्रगती, सुप्रशासन व जबाबदार सत्ता हा मार्गही बदलला नाही.

भारतासाठी २०२० हे वर्ष चिकाटी व लवचिकतेचे होते व यातून तावून सुलाखून देश अधिक सशक्त बनून पुढं आला. देशाचा खंबीरपणा व स्थिरता हे त्याच्या नेतृत्वाचे प्रतिबिंब असून, ते या वादळाच्या स्थितीतही देशाला योग्य दिशा देत आहे. देश ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या उंबरठ्यावर उभा असताना देशाला अतिशय योग्य नेतृत्व मिळाले आहे. या नेत्याला देशाची संस्कृती आणि विकासाबद्दल दृढ विश्वास आहे, देश जगाचे नेतृत्व करेल, यावर ठाम विश्वास आहे व त्याचबरोबर देशातील लोकांचे भविष्य उज्ज्वल आहे, ही श्रद्धाही आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या नेतृत्व गुणांनी देशाचे भविष्य उज्ज्वल असणार आहे, हेच अधोरेखित केले आहे.  
(अनुवाद : महेश बर्दापूरकर)
(सदराचे लेखक ‘डॉ. श्‍यामाप्रमाद मुखर्जी रिसर्च फाउंडेशन’चे संचालक आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anirban ganguly writes about corona war india world