अद्वैत वेदान्त आश्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

advaita vedanta ashram

पुण्यातील रामकृष्ण मठाच्या अनुयायांच्या सहकार्यानं उत्तराखंडमधील मायावती या ठिकाणच्या ‘अद्वैत वेदान्त आश्रमा’च्या जतन-संवर्धनाचं काम पूर्ण झालं, त्याबद्दल...

अद्वैत वेदान्त आश्रम

- अंजली कलमदानी anjali.kalamdani10@gmail.com

स्वामी विवेकानंदांची १५० वी जयंती १२ जानेवारीला साजरी झाली. त्यानिमित्तानं पुण्यातील रामकृष्ण मठाच्या अनुयायांच्या सहकार्यानं उत्तराखंडमधील मायावती या ठिकाणच्या ‘अद्वैत वेदान्त आश्रमा’च्या जतन-संवर्धनाचं काम पूर्ण झालं, त्याबद्दल...

काळ्याभोर आकाशात चमचमणाऱ्या अनेक चांदण्या...हिरव्या पानांचा आसमंतात भरलेला गंध...आणि श्वासाचा वेध घेणारी कमालीची शांतता...अशा वातावरणात घनदाट जंगलाच्या अंतरंगात विसावला आहे मायावतीचा अद्वैत वेदान्त आश्रम. ‘अवघ्या विश्वात मानवता हा एकच धर्म आहे...’, ‘सत्याचा शोध हेच जीवनाचं सूत्र आहे,’ अशी शिकवण जनमानसात रुजवून अद्वैताच्या मार्गाचा वेध घेणारा हा आश्रम हा आध्यात्मिक भारताचा एक महत्त्वाचा दुवा आहे.

सन १८९३ मध्ये अमेरिकेत शिकागो इथल्या जागतिक परिषदेत स्वामी विवेकानंदांनी ऐतिहासिक भाषण केलं. तिथून भारतात परत येत असताना विवेकानंद इंग्लंड इथं मुक्कामाला होते. तिथंही त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेले अनेक अनुयायी होते. त्यापैकी कॅप्टन सेविअर व त्यांच्या पत्नी शार्लेट आणि हेन्री मिलर यांनी, स्वित्झर्लंडच्या पर्वतरांगांमध्ये विवेकानंदांना काही दिवस घालवता यावेत यासाठी, सुटीची योजना केली. बर्फाच्छादित, सौंदर्यपूर्ण आल्प्स पर्वतरांगांकडे पाहून विवेकानंदांना आपल्या हिमालयाची आठवण झाली.

विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांची शिकवण पुढं शिष्यांमध्ये अंशतः उतरवण्यासाठी हिमालयाच्या कुशीत सौंदर्यपूर्ण आणि शांत जागी आश्रम तयार करण्याची ऊर्मी विवेकानंदांमध्ये निर्माण झाली. त्यांच्या या विचारांना कॅप्टन सेविअर व शार्लोट सेविअर यांनी कृतीची जोड दिली.

भारतीय आध्यात्मिक ज्ञानाचा विचार जगात पोहोचवण्यासाठी अशा निसर्गरम्य परिसराची नितांत गरज विवेकानंदांना भासली. त्यांच्या विचारांशी सहमत असलेल्या सेविअर-दाम्पत्यानं इंग्लंडमधील आपली मालमत्ता विकून विवेकानंदांच्या कार्याला वाहून घेण्याचा निर्धार केला. अथक् शोधकार्यानंतर सेविअर-दाम्पत्यानं चंपावत जिल्ह्यातील मायावती (सध्याचं उत्तराखंड) इथं नयनरम्य अशी जागा विवेकानंदांच्या कार्यासाठी निवडली. काठगोदाम किंवा रुद्रपूर या ठिकाणांपासून उंच पर्वतरांगांच्या कुशीतून वळणावळणाच्या रस्त्यानं चंपावतमधल्या लोहाघाटपर्यंतचा रस्ता अद्भुत अनुभव देणारा आहे. निसर्गाची श्रीमंती भरपूर अनुभवायला मिळते. लोहाघाटपासून पुन्हा घनदाट वृक्षांमधून रस्ता मायावतीपर्यंत जातो. अद्वैत आश्रमाच्या सान्निध्यात आल्यावर आपल्या चित्तवृत्तीत पडलेला फरक आपल्याला जाणवतो. कमालीची शांतता, विवेकानंदांना अपेक्षित अद्वैताची स्पंदनं तिथं अणू-रेणूत सामावलेली आहेत.

संन्याशांचा सहज वावर इथल्या पवित्र वातावरणाची ग्वाही देतो. स्थानिक लाकडामध्ये बांधलेली उतरत्या छताची इमारत १८९८ मध्ये सेविअर-दाम्पत्यानं घेतली तेव्हा चहाच्या मळ्यांतून गोळा केली गेलेली चहाची पानं सुकवण्यासाठी तिच्या काही भागाचा उपयोग होत असे. त्यानंतर इमारतीचा उपयोग विवेकानंदांच्या अद्वैतापर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या साधनेसाठी इथले संन्यासी-भक्त करत आहेत. शतकाहून जास्त जुन्या असलेल्या या इमारतीला काळाच्या ओघात डागडुजीची गरज निर्माण झाली. अनेक नामवंत योगीजनांचे पाय या इमारतीला लागले आहेत. खुद्द विवेकानंदांच्या वास्तव्यानं पुनित झालेली वास्तू म्हणजे रामकृष्ण मठाच्या अनुयायांसाठी अतिशय महत्त्वाचं असं स्थान आहे.

इथं मूर्तिपूजा नाही. एकही फोटो नाही. प्रार्थना, भक्तिभाव हे थेट आपल्या अंतरंगातून परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी इथलं वातावरणच पुरेसं आहे. आश्रमाच्या परिसरात मुख्य इमारत, ‘प्रबुद्ध भारता’ची इमारत, याशिवाय मदर सेविअर यांचं वास्तव असलेल्या छोट्या इमारती आहेत. इमारतींचा बाज स्थानिक शैलीला अनुसरून साधा व रांगडा आहे.

रामकृष्ण मठाकडे उपलब्ध असलेले संग्रहित जुने फोटो अनुसरून इमारतीची मूळ रचना अभ्यासली व त्यानुसार जतन-संवर्धन करण्याची संकल्पना रामकृष्ण मठाचे अनुयायी मुक्तिदानंद महाराज यांनी पुण्याच्या आश्रमातील भेटीत आमच्याकडे मांडली. त्यानुसार, आम्ही उभयता बालाजीसिंह सिसोदिया यांच्याबरोबर मायावती इथं गेलो. देशाच्या एका टोकाला, नेपाळच्या सीमेजवळच्या व पुण्याहून खूप दूर असलेल्या या ठिकाणाचं जतन-संवर्धन करण्यासाठी आम्हीच का? या प्रश्नाला त्यांचं उत्तर होतं : ठाकुरजींची इच्छा! साक्षात् रामकृष्ण परमहंस यांची इच्छा! हे सारं समजून घेताना मनाचा फार गोंधळ उडत होता. पहिल्या भेटीत आम्ही सर्व इमारतींची मोजमापं घेतली व पुण्याला परतल्यावर त्यांचे तपशीलवार नकाशे तयार झाले. काळाच्या ओघात केलेले बदल, दुरुस्त्या, इमारत पूर्ववत् करण्यासाठी नंतरच्या काळात केलेले विसंगत बदल काढून रेखांकनं तयार केली. इमारतीतील तळमजल्यावर विवेकानंद जिथं ध्यानधारणा करत ती खोली अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

तिला ‘गोल कमरा’ असं संबोधलं जातं. विवेकानंदांची तब्येत बिघडल्यावर मात्र त्यांचं वास्तव्य पहिल्या मजल्यावरील कक्षात होतं, जिथून हिमालयाचं विलोभनीय दृश्य नजरेस पडतं. पहिल्या मजल्यावरच माता सेविअर यांची खोली आहे. इमारतीच्या पूर्वेला सज्जा व उत्तरेला लांबच लांब गॅलरी आहे. इमारतीचा मूळ ढाचा लाकडी भिंती, दगड व विटांच्या भिंतीवर मातीचा गिलावा, लाकडी छतावर काळ्या दगडी फरश्यांचं (स्लेट )आच्छादन असा आहे. पारंपरिक पद्धतीनं बांधलेल्या इमारतीचं जतन-संवर्धन करताना तिची मूळ बांधकामशैली तशीच राखून सामग्रीचं विश्लेषण महत्त्वाचं होतं. मातीचा गिलावा हा स्थानिक हवामानास पूरक व स्थानिक सामग्रीस अनुसरून उत्तम पर्याय. त्यासाठी विशिष्ट माती, तिचं मिश्रण, तीमधील इतर पदार्थ हा सारा घाट जमवण्यासाठी स्थानिक कारागीर - ज्याला ही कला अवगत आहे असा - शोधणं गरजेचं होतं. सुदैवानं, आश्रमाच्या इमारतीच्या डागडुजीवर काम केलेल्या सुताराच्या मुलाचा शोध लागला. तो निवृत्त जीवन जगत होता. इमारतीच्या अंतर्गत बदलाआधीचा तो साक्षीदार होता. अनुभवी नजर, पहाडी बारीक चण आणि अनेक वर्षांच्या कामातून आलेलं अनुभवाचं शहाणपण त्याच्या विनम्र स्वभावाला साजेसं होतं.

चुन्यात केलेला गिलावा (प्लॅस्टर) व मातीनं केलेला गिलावा यांचे नमुने परतभेटीत बघून आम्हाला अतिशय आनंद झाला. दुर्मिळ झालेला मातीचा गिलावा उत्कृष्टपणे साधला गेलेला होता. त्याचा पोत, बळकटी व स्थानिक हवामानाला पूरक असा बाहेरच्या थंडीपासून संरक्षण देणारा सौम्य ऊबदारपणा...ही कालबाह्य होत चाललेली कला स्थानिक कारागिरांनी इतकी सुंदर साकारली की या गिलाव्याला रंग लावू नये असे सर्वांचं मत पडलं. बाह्यदर्शनी दगडी कामाला दरजा भरल्यावर दगडांचं सौंदर्य अधिक खुलून आलं. इमारतींमध्ये धुराड्याच्या चार शेकोट्या आहेत. त्या पुनरुज्जीवित झाल्या आहेत. इथं काही काळ बर्फाचं आच्छादन असतं. विषम हवेपासून संरक्षण ही इथली महत्त्वाची बाब आहे.

लाकडावरचे तैलरंग उतरवण्याआधी त्यांच्या स्थैर्याच्या चाचण्या झाल्या. लाकडांचे, दगडी बांधकामाचे अभियंता रवी रानडे यांनी सर्व परीक्षण केलं. पुढं रूरकी इथले संजय चिकरमणे यांनी इमारतीच्या स्थैर्याच्या दृष्टीनं तांत्रिक सल्ला दिला. देवदार लाकडात बांधलेल्या इमारतींचा सांगाडा अजूनही उत्तम आहे. तैलरंग उतरल्यावर देवदाराच्या लाकडाचं सौंदर्य तर लोभसवाणं होतंच; परंतु इतक्या वर्षांनंतरही त्याच्या टिकाऊपणाची कमाल बघून आम्ही अचंबित झालो. काही कीटकांनी लाकडावर केलेलं आक्रमण हा अपवाद. तेवढीच लाकडं बदलून उर्वरित लाकडांच्या टिकाऊपणासाठी कीटकसंरक्षणतंत्र अवलंबलं. काळानुरूप झालेले बदल परतवून लावत इमारत नव्या झळाळीनं; परंतु पारंपरिक शैलीत भक्तांसाठी पुन्हा सज्ज झाली. दानातून उभारलेलं खर्चाचं नियोजन याही पलीकडे जाऊन इमारतीच्या बारकाव्यांसह अनेकदा झालेल्या चर्चेअंती केलेलं काम हे समाधान देणार आहे.

अद्वैत वेदान्त जाणून घेण्यासाठी खूप तपश्चर्या पाहिजे. सर्वएकात्मकता आत्मसात करण्यासाठी त्याग पाहिजे. भारताच्या एका जंगलात जगाच्या पाठीवरचे येणारे भक्तगण पाहिले की विस्मय वाटतो. इथं एक जपानी स्वामी गेली अनेक वर्ष स्वकष्टानं बागेची देखभाल करत आहेत. तीस वर्षं जतन-संवर्धनाच्या कामात सक्रिय असलेले स्वामी रामदास अर्जेंटिनाहून आले आहेत. माता सेविअर यांच्या काळापासून ते सद्य परिस्थितीत अध्ययावत रुग्णालय आजूबाजूच्या गावांसाठी मोफत चालवलं जातं. त्यासाठी भारतातून अनेक डॉक्टर सेवेसाठी इथं येऊन राहतात. चहाच्या मळ्यातील एक इमारत विवेकानंदांच्या वास्तव्यानं पुनित झाली. हिमालयाच्या सान्निध्यात अनेक भक्तांसाठी तिचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. जतनसंवर्धन करताना तांत्रिक अनुभव जमा झालेच; पण विवेकानंदांच्या अद्वैताच्या छोट्याशा खिडकीचं दारही किलकिलं झालं. अवघ्या मानवतेला बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या विवेकानंदांचं अस्तित्व इथल्या चराचरात आहे. सेविअर-दाम्पत्यानं विवेकानंदांच्या प्रेमापोटी दिलेलं योगदानही महत्त्वाचं आहे.

कॅप्टन सेविअर यांचं देहावसान मायावती इथं झालं, त्या वेळी विवेकानंद मदर सेविअर यांना भेटण्यासाठी आले होते. विवेकानंद ज्या तळ्याकाठी फेरफटका मारत असत त्याचंही जतन करण्यात आलेलं आहे. स्थानिक शैलीत बांधलेल्या या इमारतींमध्ये सामर्थ्यशाली व्यक्तींचं वास्तव्य होतं. त्यामुळे या इमारतींचं महत्त्व वाढलं आहे. रामकृष्ण मठानं पारंपरिक शैलीत बांधलेल्या इमारतीचं जतन-संवर्धन शास्त्रीय पद्धतीनं करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. पुणे ते मायावती या वारीनं दरवेळी वेगवेगळ्या अनुभवांचं दान पदरात टाकलं. विषम हवामानात मुंबईच्या कारागिरांनी स्थानिक कारागिरांबरोबर काम करताना कधी सुटीचा विचार केला नाही. सचिन विश्वकर्मा या कंत्राटदारानं जतन-संवर्धनाच्या कामाचा विडा उचलला तेव्हा एका वेगळ्या पार्श्वभूमीचं काम करायला मिळेल हीच प्रेरणा त्यामागं होती. जयशंकर यांनी मायावती इथं राहून कामाचं नियोजन सांभाळलं. अद्वैत वेदान्त आश्रमाच्या कामासाठी आम्हाला पुण्याहून मायावतीला आग्रहानं नेणारे बालाजीसिंह सिसोदिया मात्र काम पूर्ण होण्यापूर्वीच जग सोडून गेले ही खंत आहे. सर्वधर्मसमभावापलीकडे जाऊन अद्वैताची शिकवण देणाऱ्या या आश्रमासाठी काम करण्याची संधी वैयक्तिक विचारसरणीसंदर्भातही अंतर्मुख करून गेली, ही व्यावसायिक अनुभवाच्या मापदंडापलीकडची अनुभूती!

(लेखिका वास्तुविशारद व नगरविन्यासकार असून, जतन-संवर्धनक्षेत्रात कार्यरत आहेत.)

टॅग्स :saptarang