गुंडाचा गणपती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gundacha Ganpati

वारसा हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. निरनिराळ्या कालखंडात बांधलेल्या इमारती हा त्या विशिष्ट काळातील जीवनशैली, बांधकामशैली, इतिहास, मूर्तिशास्त्र यांचा दस्तऐवज असतो.

गुंडाचा गणपती

- अंजली कलमदानी

वारसा हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. निरनिराळ्या कालखंडात बांधलेल्या इमारती हा त्या विशिष्ट काळातील जीवनशैली, बांधकामशैली, इतिहास, मूर्तिशास्त्र यांचा दस्तऐवज असतो.

प्रगती होताना हा वास्तुवारसा कसा सांभाळावा हा प्रश्न असतो. त्याच्याकडे कलात्मक दृष्टीनं पाहताना त्याचं महत्त्व जाणून त्याचं जतन-संवर्धन करून आजच्या काळातही हा वारसा उपयोगात ठेवूनसुद्धा प्रगती साधता येते.

आपल्या पूर्वजांनी उभारलेल्या इमारतींच्या उभारणीमागची संकल्पना, बांधकामाचं तंत्र समजून घेतलं तर त्यातील बलस्थानं ओळखून नवनिर्मितीत त्यांचा अंतर्भाव करता येतो. अफाट वास्तुवारसा आणि अपुरी सुविधा-साधनं व जागरूकतेची कमतरता यांमुळे इतिहासाची काही पानं नकळत नष्ट होत जातात.

इमारतींच्या वारशाचं महत्त्व जाणून त्याच्या जतन-संवर्धनाचं शास्त्र हा वास्तुकलेचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक वास्तूचं जतन-संवर्धन हे आव्हानात्मक असतं; कारण, तिचं बाह्य स्वरूप दिसत असतं; पण तिच्या बांधकामस्थापत्याचा तपास करण्याचं शास्त्र कसं अवलंबतात...

तसंच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ऐतिहासिक इमारतींचं महत्त्व कसं जाणावं...त्यांची शैली, सौंदर्य कसे अजमावावं या बाबींची जाणीव होण्यासाठी व जागरूकता निर्माण होण्यासाठी या सदरलेखनाचा हा लेखनाचा प्रपंच.

सदराची सुरुवात पुण्याच्या गावठाणातील ‘गुंडाचा गणपती’ या मंदिरापासून करू या. शनिवारवाड्याच्या पूर्वेला कसबा गणपती मंदिराच्या अलीकडच्या गल्लीतून सरळ खाली गेल्यावर गुंडाच्या गणपतीचं मंदिर दिसून येतं. रस्त्यालगतच, आवार नसलेलं गावठाणातील मंदिर छोट्या जागेत सामावलेलं आहे. मंदिरासमोरील रस्ता मंदिराच्या दक्षिणेला वळसा घालून पुढं जातो.

गुंडाचा गणपती हे ‘सिद्धिविनायक गणपती-मंदिर’ म्हणून प्रसिद्ध आहे. २५ फूट लांब व २५ फूट रुंद अशा काळ्या पाषाणातील गर्भगृहाचं मंदिर हे मूळ जुनं मंदिर असून त्याभोवतीचा प्रदक्षिणामार्ग आणि लाकडी मंडप पेशवेकाळात बांधला असण्याची शक्यता बांधकामशैली वरून दिसून येते.

पेशव्यांच्या कागदोपत्री या गणपतीचा उल्लेख आहे. पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणवीस यांचे एक सहकारी होते नागोजी गुंड. या नागोजी गुंड यांच्या घराजवळील मंदिर म्हणूनही या मंदिराला ‘गुंडाचा गणपती’ असं नाव पडलं असावं.

मूळ गणपतीची स्थापना पिंपळाच्या पारावरील छोट्या कोनाड्यात झाली होती. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या सन १८१० ते ११ याकालावधीतील रोजनिशीत या गणपतीचा उल्लेख आढळून येतो. सन १८५० च्या दरम्यान गोपाळराव जोशी यांनी इथं एक मंदिर उभारलं.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी अप्पाराव गणेश वैद्य यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेच या मंदिराचं आजचं मोठं रूप दिसत आहे. सरदार फुलंब्रीकर यांच्या आजोबांनी देणगी देऊन काळ्या दगडातील सुबक गाभारा १८९२ मध्ये करून घेतला.

ता. तीन एप्रिल १९७५ रोजी गणपतीच्या मूळ मूर्तीवरील कवच निघालं व आतमध्ये प्राचीन सुबक मूर्ती असल्याचं आढळून आलं. मात्र, ती भंगलेल्या स्थितीत होती. ही मूळ मूर्ती चौदाव्या शतकातील असावी असा अंदाज अभ्यासकांनी व तज्ज्ञांनी व्यक्त केला.

भंगलेल्या मूर्तीच्या जागी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करणं आवश्यक होतं म्हणून नवीन मूर्तीची स्थापना ता. चार फेब्रुवारी १९७६ रोजी कवीश्वरशास्त्री यांच्या हस्ते करण्यात आली. मूर्तिकार खेडेकर यांनी जीर्णोद्धारापूर्वीच्या मूर्तीचा साचा तयार केला.

हा साचा केळकर वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे. सध्याची मूर्ती अखंड दगडातून घडवलेली असून मूर्तिकार केशव रघुनाथ देशपांडे यांनी ती साकारली आहे. जुनी मूर्ती सभामंडपामध्ये गणपतीसमोरील कट्ट्याच्या डाव्या बाजूला कपाटात ठेवण्यात आली आहे. सद्य परिस्थितीत गावठाणातील गजबजलेल्या वस्तीत गुंडाच्या गणपतीच्या या मंदिराला खेटून अनेक इमारती उभ्या राहिल्या असून रस्त्यावरील वाहनांची वर्दळही वाढली आहे. मंदिराची देखभाल करणाऱ्या बाभळेगुरुजींनी मंदिराच्या दुरुस्तीचा व जतन-संवर्धनाचा आग्रह धरला व तो पूर्णत्वासही नेला.

तुटपुंज्या उपलब्ध पुंजीत काम सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला. आमची संस्था ‘किमया’च्या उत्साही गटानं जागेवर मोजमापं घेऊन रेखांकनं तयार केली. जुन्या वास्तूंच्या जतन-संवर्धनासाठी कोरी पाटी न घेता वारसा आधी रेखांकित करावा लागतो व त्याचं अंतरंग व बाह्यरंग समजून घेतल्यावरच पुढील वाटचाल सुरू होते.

छताची गळती व इमारतीचं स्थैर्य ही सर्वात मोठी समस्या! कौलारू छत उतरवून त्यातील खराब झालेल्या लाकडांची जागा नवीन; म्हणजे दुसऱ्या; पण जुन्या आणि मुरलेल्या लाकडांनी घेतली. प्रदक्षिणामार्गाभोवतीच्या छताच्या दुरुस्त्या प्राधान्यानं करणं गरजेचं होते.

तसं करताना मुळात बिघडलेल्या पातळ्यांना सुस्वरूप देऊन प्रदक्षिणामार्गाच्या अंतर्भागाला पुरेशी उंची मिळाली. मंडपाचं रेखीव छत दुरुस्त करून त्याला पॉलिशची झळाळी प्राप्त झाल्यावर मंडप जास्त प्रशस्त वाटू लागला.

लाकडी खांबांच्या तळाकडील कुजलेला भाग बदलून खांबासाठी दगडी घडवलेले तळखडे बसवण्यात आले. लाकडी मंडपाच्या इमारतीचा तोलात्मक विचार करता हे काम जिकिरीचं होतं. दगडी गाभाऱ्यातील सिरॅमिकच्या फरश्या उतरल्या, तसंच तैलरंगही उतरले आणि भारदस्त काळ्या पाषाणानं परत मोकळा श्वास घेतला.

त्याच्या दरजा चुन्यानं सुबकपणे भरल्या. मोडकळीस आलेला लाकडी दरवाजा कसाबसा तगून होता. नव्या वाड्यासारख्या दरवाजानं मंडपाचं रूप खुललं. खिडक्यांचे त्रिकोणी आकाराचे वैशिष्ट्यपूर्ण गज मधून मधून निखळले होते.

सर्व त्रिकोणी गजांसह खिडक्या सजल्या. तैलरंग जुना झाल्यावर त्याचं रूप कळकळ दिसू लागतं; पण तैलरंगाचे थर काढल्यावर लाकडाचं मूळ रूप दिसू लागलं व त्याचं सौंदर्य खुलून दिसू लागलं. लाकडाला लाखदाण्याचे पारंपरिक पॉलिश केल्यावर मंदिराला अपेक्षित असलेला माफक उजळपणा उठावदारपणे दिसू लागला.

हे सगळं झालं दिसणाऱ्या सौंदर्याचं काम; पण मुख्य म्हणजे छताचं व खांबांचं स्थैर्य बळकट झालं, तसंच लाकडी खांबांना दगडी तळखडे बसवल्यामुळे भविष्यात जमिनीतील ओल लाकडामध्ये शिरण्याची प्रक्रिया रोखली गेली व कुजण्यापासून ते बचावले.

मंदिरालगत जाणारा रस्ता वारंवार नव्यानं करताना जुन्या रस्त्यावरच पुन्हा डांबरीकरण केलं जायचं, त्यामुळे मंदिराचं जोतं हळूहळू रस्त्याच्या उदरात जाऊ लागलं! रस्त्याची पातळी मंदिराच्या उंबरठ्याला खेटू लागली;

परंतु प्रशासनानं नव्या ड्रेनेजवाहिन्यांचं व पाणीपुरवठावाहिन्यांचं नूतनीकरण करताना रस्त्यांच्या पातळ्यांची दखल नव्यानं घेत भर घातलेल्या रस्त्याची उंची कमी केली आणि मंदिराचं जोतं मोकळं झालं. बळकटी आणि मूळ रूप या सर्वांगीण जतन-संवर्धनानं सिद्धिविनायकाचं मंदिर भक्तांसाठी २०१५ मध्ये सुसज्ज झालं.

जमिनीवरील झिजलेल्या फरश्या बदलून चौकोनी रुमालपद्धतीनं शहाबादी फरशा बसवण्यात आलेल्या आहेत. लोंबकळणाऱ्या विद्युत्-वाहिन्यांना लाकडी आच्छादनात बंदिस्त केल्यावर मंदिराचं साधं रूप नीटनेटकं दिसू लागलं.

आवारातील हनुमानाच्या व म्हसोबाच्या मंदिराला चिकटवलेल्या चकाकणाऱ्या सिरॅमिकच्या फरशा काढून टाकून मूळ स्वरूपात त्याचंही जतन झालं. हे सगळं काम करण्यासाठी महापालिकेच्या ‘हेरिटेज कमिटी’ची रीतसर परवानगी घेण्यात आली होती.

‘किमया’ वास्तुविशारद, तसंच सचिन विश्वकर्मा या कंत्राटदारानं केलेल्या या कामामुळे व आजूबाजूला राहणाऱ्या अनेक भक्तांच्या साह्यानं आणि बाभळेगुरुजींच्या पुढाकारानं कार्य सिद्धीस गेलं आहे.

मंदिर लहान असो की मोठं, ते ज्या वसाहतीमध्ये आहे त्या वसाहतीसाठी मंदिराची जागा ही नुसती श्रद्धेची जागा नसून सकारात्मक ऊर्जा देणारी वास्तू असते. ‘तो सिद्धिविनायक आपल्या बरोबर आहे,’ ही भावनाच पाठबळ देणारी असून ज्या कोंदणात तो राहतो ती वास्तू ही नीटनेटकी, पुनरुज्जीवित झाली की वास्तूचं आयुष्यमान तर वाढतंच;

पण त्यातील सकारात्मक श्रद्धाही द्विगुणित होत असणार हे निश्चित. गुंडाचा गणपती हा गजबजलेल्या गावठाणात असून आजूबाजूच्या भक्तांसाठी एक बहुमूल्य अशी वास्तू आहेच; पण त्या वस्तीसाठी ती महत्त्वाची खूणही आहे.

ही वास्तू पुनरुज्जीवित होऊन पुढं अनेक वर्षं तिचं महत्त्व टिकून राहणं ही काळाची गरज आहे; कारण, तो एका कालखंडातील वास्तुशैलीचा उत्तम नमुना आहे. आणि, त्यादृष्टीनं या वास्तूचं मेहनतीनं झालेलं जतन-संवर्धन अतिशय महत्त्वाचं असून भविष्यातही हा वारसा संवेदनशीलतेनं टिकवला जाणं ही जबाबदारी पुणेकरांची आहे. (लेखिका वास्तुविशारद व नगरविन्यासकार असून जतनसंवर्धनक्षेत्रात कार्यरत आहेत.)

टॅग्स :Ganesh Fesitivalsaptarang