समाधी कान्होजी आंग्रेंची

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्याच्या जोडीला आपल्याला लाभलेल्या समुद्रावर प्रबळ आरमारही उभं केलं.
Mausoleum of Kanhoji Angre
Mausoleum of Kanhoji Angresakal

- अंजली कलमदानी, anjali.kalamdani10@gmail.com

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्याच्या जोडीला आपल्याला लाभलेल्या समुद्रावर प्रबळ आरमारही उभं केलं. शिवाजी महाराजांच्या नंतर या आरमाराची धुरा कान्होजी आंग्रे यांनी नुसती सांभाळली असं नाही, तर त्याचं रूपांतर बलाढ्य आरमारात केलं.

प्रचंड शौर्य गाजवून मराठी साम्राज्याला बळकटी देण्याचं काम केलं ते विलक्षण बुद्धिमत्ता आणि बाहुबळ असलेल्या कान्होजी आंग्रेंनी! १८ व्या शतकाच्या सुरुवातीला कोकणच्या दर्यावर कान्होजींनी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. असं म्हणतात की, त्यांचा दबदबा कोकणच्या किनारपट्टीवर इतका होता की, तिथल्या दर्यावर कुठलंही परकी जहाज एकट्यादुकट्याने निर्धोकपणे जायची सोय उरली नव्हती.

शस्त्रांचा कडेकोट बंदोबस्त असलेल्या युद्धनौकाही झुंडी करून जायच्या. मोगल व मराठ्यांच्या कडव्या झुंजी जमिनीवर चालूच असायच्या. अशावेळी व्यापाराचं निमित्त साधून इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज कोकणच्या समुद्रकिनारपट्टीवर टपून बसले होते. हिंदुस्थानवर वर्चस्व काबीज करण्याच्या खटपटीत ते आपापसांतही भांडत असत. अशा या परदेशी शक्तींना किनारपट्टीवर दहशत वाटायची ती फक्त कान्होजी आंग्रेंची.

कान्होजींना नेस्तनाबूत करण्यासाठी हे परदेशी शत्रू कधी हातमिळवणी करायचे, तर कधी गुपचूप कान्होजींना वश करण्यासाठी आपापलं कौशल्य पणाला लावायचे. पण, मराठी मातीतला हा रांगडा गडी आपल्या युद्धनीतीतील खेळ अशा काही कौशल्याने खेळायचा, की त्यामुळे या परदेशी रक्तपिपासूंच्या झालेल्या फटफजित्यांच्या कथा वाचताना कान्होजींच्या विलक्षण बुद्धिचातुर्याने अचंबित व्हायला होतं.

इंग्रज त्यांना चाचा, लुटारू म्हणत. जेम्स डग्लस यांनी कान्होजींबद्दल लिहिलं आहे, ‘आंग्रे हा एखाद्या जमिनीवरच्या शार्क माशासारखा किंवा मगरीसारखा म्हणावा तसा होता. तो पाण्यातून बाहेर येत असे, जमिनीवर वेगाने सरपटत असे आणि सरपटता सरपटता जे जे हिरवं दिसेल, ते गिळंकृत करत असे.’

कान्होजींचं बालपण सुवर्णदुर्ग किल्ल्यावर गेलं. वयाच्या तेराव्या वर्षापासूनच दर्यावरची नोकरी पत्करून त्यांनी साहसाला सुरुवात केली. आपल्या मनगटातील सामर्थ्य सिद्ध करून तरुण वयात सुवर्णदुर्ग किल्ल्याचा किल्लेदार होण्याचा मान त्यांनी मिळवला. सरखेल आणि सरसेनापती ही पदवी मिळवणाऱ्या कान्होजी यांच्या ठायी विलक्षण स्वामिनिष्ठा, सैन्यातील शिस्त, सतत वर्तमानाचा ध्यास आणि युद्धनीतीतील चाणाक्षपणा या गुणांची कमतरता नव्हती.

यापूर्वी सरसेनापती पदवी मिळाली होती ती धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांना. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील परकीयांच्या घुसखोरीला आळा घालून तिथली समृद्धी टिकवण्याचं काम कान्होजींनी यशस्वीपणे केलं. त्याची फळं आज मुंबई निश्चितच चाखत आहे. त्या उलट कान्होजींनी ईस्ट इंडिया कंपनीच्या नाकी दम आणल्यामुळे त्यांची पाळंमुळं बंगाल, बिहार, ओरिसामध्ये अधिक वेगाने पसरली.

दिनांक १४ जानेवारी १७०० रोजी मुंबईतील इंग्रजांच्या वखारीने मराठे अत्यंत सामर्थ्यवान असल्याची नोंद केलेली आढळते. सागरावर मर्दुमकी गाजवणाऱ्या कर्तृत्ववान कान्होजींची समाधी अलिबागमध्ये अनेक वर्षं दुरवस्थेत होती. कान्होजींचं वास्तव्य अलिबाग, पूर्वीचं श्रीबाग इथं, कुलाबा किल्ल्यामध्ये व आरमारी तळ सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग इथं होतं. आजही त्यांचे वंशज अलिबागमध्ये राहतात.

कान्होजी आंग्रेंची समाधी व त्यांच्या कुटुंबीयांच्या इतर सदस्यांच्या समाध्या अलिबाग शहराच्या मध्यवर्ती भागातील एक एकर जागेमध्ये विखुरल्या आहेत. त्यामध्ये काही स्त्रियांची वृंदावनंही आहेत. भोवताली असलेल्या भाजी मंडईने एकेकाळी कुजलेला भाजीपाला फेकण्यासाठी या परिसराचा वापर केला होता. मोकाट जनावरं व अनधिकृत आक्रमणांचा सुळसुळाट वाढला होता.

आंग्रेंच्या वंशजांनी हा परिसर अलिबाग नगरपरिषदेकडे सुपूर्त केला. तुटपुंज्या आर्थिक तरतुदीपायी व नियोजनाच्या अभावामुळे त्यांची त्यांची योग्य देखभाल करणंही परिषदेला जमेना. शनिवारवाडा परिसर सुधारणा प्रकल्पापासून स्फूर्ती घेऊन अलिबागमध्ये कान्होजींच्या समाधीच्या परिसरासाठी नियोजित प्रकल्प परिषदेसाठी तयार झाला.

काळ्या पाषाणात सुंदर कोरीवकाम केलेली कान्होजी आंग्रेंची समाधी ही अपूर्ण अवस्थेतच आहे. ग्वाल्हेर, इंदोरकडील छत्र्यांप्रमाणे तिचं स्वरूप असणार हे उर्वरित जोती, अपूर्ण खांब व भिंतींवरून लक्षात येतं. पुण्यातील वाघोलीजवळ असलेल्या पिलाजी जाधवरावांच्या छत्रीशीही त्याचं स्वरूप बरंचसं मिळतंजुळतं आहे.

छत्री पूर्ण बांधून काढावी असा प्रस्ताव परिषदेतर्फे ठेवण्यात आला; परंतु पुरातत्त्व खात्याच्या अचानक लक्षात आलं की, हा भाग आपल्या अखत्यारीत येत आहे व तिथं त्यांनी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करणारा फलक तातडीने उभा केला. पुरातत्त्व खात्याने निखळलेले दगड, कोरीवकाम केलेल्या नक्षीदार दगडांसकट जोत्याचं काम केलं; पण छत्री पूर्ण बांधण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला.

उत्साहाच्या भरात सुरू झालेलं काम जोती बांधून झाल्यावर थांबलं. कान्होजींच्या समाधीभोवतीच्या उर्वरित परिसरात सुसूत्रता आणून या जागेचं महत्त्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी नियोजित आराखडा तयार झाला.

अलिबागला येणारे पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करून परत जातात, तेव्हा या जागेवर काय इतिहास घडला किंवा कान्होजींनी गाजवलेलं शौर्य याची पर्यटकांना पुसटशी कल्पनाही येणार नाही. पर्यटन हे फक्त समुद्रकिनाऱ्यापुरतं मर्यादित न राहता इथं भेट देणाऱ्यांनी अलिबागचं महत्त्वही जाणावं.

सर्वप्रथम समाधी परिसरातील स्वच्छता करण्यात आली व परिसराभोवती सुरक्षा भिंत बांधली गेली. समाधी परिसराशी मिळत्याजुळत्या काळ्या पाषाणात सुबक घडीव कामातील भिंतीमुळे परिसराचा दुरुपयोग थांबून त्याचं पावित्र्य राखण्यास मदत झाली. दगडकामातीलच कोरीव जाळीकामामुळे समाधी परिसर संपूर्ण बंदिस्त न होता आतील भाग सहज नजरेस पडतो.

वीस समाधींची डागडुजी व त्यांना जोडणाऱ्या पायवाटा तयार केल्या. उपलब्ध माहितीनुसार समाध्यांची माहिती, कान्होजींबद्दलची माहिती दगडांत कोरून पर्यटकांसाठी लावण्यात आली. समुद्रकिनारी पडणाऱ्या पावसाचा विचार करताना नवीन सामग्री ही अलिबागच्या हवामानात तग धरेल अशीच निवडली गेली.

परिसराला साजेसं विद्युतीकरण व नारळी- पोफळीच्या सावलीतला माफक बगीचा असं दुसऱ्या टप्प्याचं कामही पूर्ण झालं. आज तिथली वृक्षसंपदा बहरली आहे. तिसऱ्या आणि महत्त्वाच्या टप्प्यात कान्होजींच्या शौर्यकथा सांगणारं संग्रहालय, ज्यामध्ये त्यांनी वर्चस्व गाजवलेल्या दर्या व भूभागांच्या जमिनीवरील त्रिमितीतील प्रतिकृतीचं मध्यवर्ती अंगण ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट नियोजित केली होती.

कान्होजींनी वापरलेली जहाजं, गलबतं, गुराबं, शीडहोड्या यांच्या माहितीपूर्ण प्रतिकृती, त्यांनी अवलंबलेल्या युद्धनीतीचे आराखडे, कान्होजींच्या ताब्यात असलेल्या सागरी व जमिनीवरील किल्ल्यांबद्दल आकर्षक माहितीपट दाखवणारं दालन, हे संग्रहालयाचे महत्त्वपूर्ण नियोजित भाग व रात्रीच्या वेळी पर्यटकांसाठी दृकश्राव्य कार्यक्रम इत्यादी पर्यटकांसाठी माहितीपूर्ण संकल्पना वित्तबळाच्या प्रतीक्षेत तशाच राहिल्या.

ज्यांनी आपल्या सागरी सामर्थ्याची चुणूक साऱ्या हिंदुस्थानास दाखवली अशा दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रेंच्या शौर्यगाथा इतिहासाच्या पानापुरत्या मर्यादित राहता सर्वपरिचित व्हायला हव्यात. कोकणची समृद्धी टिकवण्यासाठी वेळप्रसंगी शत्रूंचा पाडाव करताना त्यातील लूट भरून दौलतीचा खजिना कान्होजींनी कधी रिता होऊ दिला नाही. पण आज ज्या ठिकाणी ते चिरनिद्रा घेत आहेत, त्या समाधी परिसरातील संग्रहालयाच्या दालनासाठी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार?

(लेखिका वास्तुविशारद व नगरविन्यासकार असून जतन व संवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com