दुधवाच्या तराईच्या जंगलात...

अनुज खरे informanuj@gmail.com
Sunday, 14 February 2021

रानभूल
भारताला आसेतुहिमाचल जैवविविधता लाभली आहे. भारतात प्रत्येक भागाचं नैसर्गिक सौंदर्य आणि महत्त्व वेगळं आहे. प्रत्येक जंगलाची खासियत आहे; पण उत्तर भारतातल्या जंगलांमध्ये डोकावून पाहिलं तर लगेच लक्षात येतं की निसर्गदेवतेनं इथं आपला खजिना खरोखरच रिता केला आहे.

भारताला आसेतुहिमाचल जैवविविधता लाभली आहे. भारतात प्रत्येक भागाचं नैसर्गिक सौंदर्य आणि महत्त्व वेगळं आहे. प्रत्येक जंगलाची खासियत आहे; पण उत्तर भारतातल्या जंगलांमध्ये डोकावून पाहिलं तर लगेच लक्षात येतं की निसर्गदेवतेनं इथं आपला खजिना खरोखरच रिता केला आहे. उत्तर प्रदेशातली कित्येक जंगलं अप्रतिम निसर्गसौंदर्यानं नटलेली आणि समृद्ध आहेत. जिम कॉर्बेटच्या अनेक पुस्तकांतून वर्णन असणाऱ्या उत्तराखंडानं (पूर्वीचा उत्तर प्रदेशाचा भाग) माझ्या मनावर लहानपणापासूनच गारुड केलं होतं. त्यामुळे एकदा तरी या भागाला भेट द्यायची असं ठरवलं होतं. पुढं मी ‘जिम कॉर्बेट व्याघ्रप्रकल्पा’ला अनेकदा भेट दिली. भारताच्या आणि नेपाळच्या सीमेलगत असणारा उत्तर प्रदेशातला ‘दुधवा व्याघ्रप्रकल्प’ही आपल्या निसर्गवैविध्यानं मला अनेक वर्षं खुणावत होता.

भारताच्या उत्तर भागातली तराईप्रदेशातली जंगलं समृद्ध म्हणावी लागतील. डोंगररांगा, सपाट मैदानं, पाणी अशा निरनिराळ्या अधिवासांमुळे तराईभागातल्या जंगलांत जैवविविधता खूप आढळते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हिंदी भाषेत तराईचा अर्थ ‘ओला’ असा होतो. उत्तर भारतातल्या हिमालयाच्या पायथ्याशी असणारी दलदलीची मैदानं ही तराईवनांमध्ये मोडतात. या तराईवनांमध्ये समावेश असणाऱ्या तेरा राखीव क्षेत्रांपैकी पाच राखीव क्षेत्रं उत्तर प्रदेशात आहेत. ती म्हणजे, दुधवा राष्ट्रीय उद्यान, किशनपूर वन्यजीव अभयारण्य, कतर्नियाघाट वन्यजीव अभयारण्य, सोहेलवा वन्यजीव अभयारण्य, सोहागी बरवा वन्यजीव अभयारण्य.

लखीमपूर खेरी आणि बहराईच या जिल्ह्यांतल्या दुधवा व्याघ्रप्रकल्पात दुधवा राष्ट्रीय उद्यान, किशनपूर वन्यजीव अभयारण्य आणि कतर्नियाघाट वन्यजीव अभयारण्य या संरक्षित क्षेत्रांचा समावेश होतो. सुमारे ८८३ चौरस किलोमीटर क्षेत्रात हा व्याघ्रप्रकल्प पसरलेला असून, पिलिभितसारख्या अनेक महत्त्वाच्या जंगलांना जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा व्याघ्रप्रकल्प आहे. उत्तर प्रदेशाला लागून असलेल्या नेपाळ या देशातली अनेक जंगलंही दुधवामुळे भारतातल्या जंगलांशी जोडली गेली आहेत. संपूर्ण तराईभाग हा हत्ती आणि एकशिंगी गेंडा यांच्यासाठी प्रसिद्ध असला तरी आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यासाठीही दुधवा हे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं होतं. तो वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे ‘बाराशिंगा. भारतात आढळणाऱ्या Rucervus duvaucelii duvaucelii, Rucervus duvaucelii ranjitsinhi, Rucervus duvaucelii brander या तीन उपजातींच्या बाराशिंग्यांपैकी Rucervus duvaucelii duvaucelii  या उपजातीचा बाराशिंगा दुधवामध्ये आढळतो. सन १९५८ मध्ये अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेल्या या संरक्षित क्षेत्राला ‘सोनारीपूर अभयारण्य’ म्हटलं जाई. पुढं सन १९८८ मध्ये वरील तीन क्षेत्रांना मिळून व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा मिळाल्यावर ‘दुधवा’ हे नाव पडलं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्याघ्रप्रकल्पाच्या उत्तर आणि दक्षिणसीमेवर मोहन आणि सुहेली या नद्या आहेत, तर व्याघ्रप्रकल्पातली प्रमुख नदी आहे.

शारदा. किशनपूर अभयारण्य आणि दुधवा राष्ट्रीय उद्यान यांदरम्यान वाहणाऱ्या या नदीला पावसाळ्यात मोठा पूर येतो. पावसाळ्यात तीन ते सहा मीटर उंचीचं वाढणारं ‘हत्तीगवत’ हे दुधवा व्याघ्रप्रकल्पाचं वैशिष्ट्य. यामुळे एकशिंगी गेंड्यांची संख्याही दुधवामध्ये चांगल्या प्रमाणावर आहे. ‘मुबलक पाणी’ हे तराईजंगलांचं मुख्य वैशिष्ट्य असतं. मोठ्या संख्येनं असलेले तलाव आणि खाद्याची उपलब्धता यांमुळे दुधवामध्ये मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आढळते.

सिंधू, ब्रह्मपुत्रा आणि गंगेच्या मैदानात पूर्वी मोठ्या प्रमाणावर एकशिंगी गेंडे आढळत असत. जगातल्या या चौथ्या सर्वात मोठ्या सस्तन वन्यप्राण्याची मोठ्या प्रमाणावर झालेली अवैध शिकार आणि या भागात झालेली बेसुमार जंगलतोड यांमुळे सन १८७८ च्या दरम्यान दुधवामधून एकशिंगी गेंडा नामशेष झाला. पुढं सन १९८४ मध्ये आसामच्या पोबितोरा वन्यजीव अभयारण्यातून सहा, तर नेपाळच्या ‘रॉयल चितवन राष्ट्रीय उद्याना’तून चार एकशिंगी गेंडे दुधवामध्ये आणण्यात आले. 
संवर्धनासाठी वनविभागानं केलेले प्रयत्न आणि संरक्षण यांमुळे आज दुधवामध्ये या प्राण्याची संख्या चांगल्या प्रमाणावर आढळून येते. मोठ्या प्रमाणावर असलेल्या गवताळ प्रदेशामुळे ‘बेंगाल फ्लोरिकन’ नावाचा दुर्मिळ पक्षीही दुधवामध्ये आढळतो. वाघांची आणि हत्तींची चांगली संख्या हे या व्याघ्रप्रकल्पाचं आणखी एक वैशिष्ट्य. कतर्नियाघाट वन्यजीव अभयारण्यात सन १९७७ मध्ये सुरू करण्यात आलेलं ‘सुसर पुनर्वसन केंद्र’ आहे.

या सर्व संरक्षित क्षेत्रांलगतच्या भागात ‘थारू’ जमातीचे आदिवासी लोक राहतात. ही उत्तर प्रदेशातली सर्वात मोठी आदिवासी जमात आहे. उत्तर प्रदेशातल्या एकूण आदिवासी लोकसंख्येच्या ३३ टक्के या जमातीचे लोक राज्यात आहेत. 

दुधवा व्याघ्रप्रकल्पाच्या इतिहासात एका व्यक्तीचं नाव आदरानं आणि अग्रक्रमानं घ्यावं लागेल व ते म्हणजे बिली अर्जनसिंह. ‘शिकारी ते वन्यजीवांचे रक्षक’ हा त्यांचा प्रवास अविस्मरणीय आहे. प्राणिसंग्रहालयातले वाघ आणि बिबटे यांचं जंगलात पुनर्वसन करण्याचा आणि त्यांना पुन्हा ‘रानटी’ करण्याचा त्यांचा प्रयोग उल्लेखनीयच. ‘दुधवा व्याघ्रप्रकल्पाचे प्रणेते’ अशीच त्यांची ओळख आहे. त्यांच्या आग्रहामुळे भारताच्या माजी पंतप्रधान आणि ‘प्रोजेक्ट टायगर’च्या प्रणेत्या इंदिरा गांधी यांनी दुधवाला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा दिला. 

काही अभ्यासकांच्या मते, मार्जारकुळातल्या प्राण्यांना शिकार करणं आईकडून शिकवलं जातं. अतिशय लहान वयात ही पिल्लं अनाथ झाली तर आईनं शिकार करणं शिकवलेलं नसल्यामुळे त्यांना स्वतःहून शिकार करता येत नाही, त्यामुळे त्यांना उर्वरित आयुष्य एक तर प्राणिसंग्रहालयात घालवावं लागतं अथवा ही पिल्लं मरण पावतात. तारा नावाच्या इंग्लंडमधल्या प्राणिसंग्रहालायातून आणलेल्या वाघिणीवर बिली अर्जनसिंह यांनी केलेला यासंदर्भातला प्रयोग खूपच गाजला होता. 

विस्तीर्ण गवताळ प्रदेश, दलदलीचा भूभाग, अनेक छोटे-मोठे तलाव, नद्या, जागोजागी वाढलेले मोठमोठे सालवृक्ष, उंच वाढलेलं हत्तीगवत, मुसळधार पाऊस, कुडकुडायला लावणारी थंडी या सगळ्यामुळे दुधवा या तराईजंगलाचं सौंदर्य  अधिकच खुलवलं आहे. 

कसे जाल? : पुणे/मुंबई-लखनौ-लखीमपूर-दुधवा
भेट देण्यासाठी उत्तम कालावधी : डिसेंबर ते मार्च 

काय पाहू शकाल? :
सस्तन प्राणी :
सुमारे ३८ प्रजाती. वाघ, बिबट्या, हत्ती, बाराशिंगा, सांबर, चितळ, भेकर, एकशिंगी गेंडा, मुंगूस, वानर, लालतोंडी माकडं, नीलगाय, अस्वल, हॉग डिअर.

पक्षी : सुमारे चारशेहून अधिक प्रजातींचे पक्षी. Swamp Partridge, Bengal Florican, Pied Hornbills, Brahminy Ducks, White necked storks, Pintails, Lesser Whistling Teals, Bronze winged jacana, Mallard, Tufted Pochard, River Lapwing.

सरपटणारे प्राणी : मगर, कासव, सुसर, धामण, नाग, घोणस, हिमालयन पिट वायपर, मण्यार,  दिवड, वाळा, कुकरी, रसेल कुकरी, मांजऱ्या, घोरपड.

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार बापट)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anuj Khare Writes about dudhwa tiger project