esakal | कुद्रेमुख : शोला जंगल! 
sakal

बोलून बातमी शोधा

कर्नाटकातल्या ‘कुद्रेमुख राष्ट्रीय उद्याना’त आढळणारं सिंहपुच्छ माकड. (छायाचित्र : क्लेमेन्ट फ्रान्सिस)

रानभूल
आपण आजपर्यंतच्या लेखांमधून मध्य आणि उत्तर भारतातील जंगलांची माहिती घेतली. आज आपण भारताच्या तितक्याच; किंबहुना कांकणभर जास्त सुंदर असणाऱ्या दक्षिण भागातील एका जंगलाची माहिती घेऊ या. हे जंगल म्हणजे ‘कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान.’ कानडी भाषेतल्या कुद्रेमुख या शब्दाचा अर्थ आहे घोड्याचं तोंड.

कुद्रेमुख : शोला जंगल! 

sakal_logo
By
अनुज खरे informanuj@gmail.com

आपण आजपर्यंतच्या लेखांमधून मध्य आणि उत्तर भारतातील जंगलांची माहिती घेतली. आज आपण भारताच्या तितक्याच; किंबहुना कांकणभर जास्त सुंदर असणाऱ्या दक्षिण भागातील एका जंगलाची माहिती घेऊ या. हे जंगल म्हणजे ‘कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान.’ कानडी भाषेतल्या कुद्रेमुख या शब्दाचा अर्थ आहे घोड्याचं तोंड. 

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेश या दक्षिण भारतातील राज्यांत अनेक व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यं आहेत. त्यांत अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्राणी, पक्षी आढळून येतात. पश्चिम घाटाची तटबंदी लाभल्यामुळे दक्षिण भारतातल्या या जंगलांचं सौंदर्य अजूनच खुललं आहे. ‘कुद्रेमुख’ (जिल्हा : चिकमगळुरू) हा या अशा सुंदर जंगलांच्या कोंदणातला हिरा आहे!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतातील एकूण वाघांच्या संख्येत कर्नाटक राज्य अनेक वर्षं अग्रेसर होतं. आताच्या गणनेनुसार, अग्रस्थानी असणाऱ्या मध्य प्रदेशाखालोखाल वाघांच्या संख्येबाबत कर्नाटकचाच क्रमांक लागतो. कर्नाटकात व्याघ्रप्रकल्पांबरोबरच अनेक छोट्या-मोठ्या अभयारण्यांत आणि राष्ट्रीय उद्यानांत वाघ आढळतात, त्यामुळे या राज्यातील सर्वच जंगलांना वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, वाघाबरोबरच आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण सस्तन प्राण्याचा वावर कुद्रेमुखमध्ये आढळतो व तो प्राणी म्हणजे ‘सिंहपुच्छ माकड’ अर्थात् Lion-tailed macaque. 

केवळ पश्चिम घाटात आढळणाऱ्या माकडाच्या या उपजातीचा वावर हे कुद्रेमुखचं वैशिष्ट्य; किंबहुना याच प्राण्याच्या संरक्षणासाठी या राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

सुप्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक डॉ. उल्हास कारंथ यांनी सन १९८३-८४ मध्ये या जंगलभागाचा अभ्यास केला तेव्हा त्यांना सिंहपुच्छ माकडाचा वावर या जंगलात मोठ्या प्रमाणावर आढळून आला. कर्नाटकच्या पश्चिम घाटाच्या भागातील या जंगलात सर्वात जास्त संख्येनं सिंहपुच्छ माकडं असल्याची नोंद त्यांनी केली. ‘या माकडांचं संरक्षण आणि संवर्धन या मुद्द्यावर भर दिल्यास जंगलातील इतर जैवविविधतेचंही आपोआप रक्षण होईल,’ असं त्यांनी अहवालातून सुचवलं. डॉ. कारंथ यांचं नाव व्याघ्रसंवर्धनासंदर्भातही आदरानं घेतलं जातं. व्याघ्रगणनेसाठी सध्या वापरण्यात येणारी क्रांतिकारी आणि अचूक अशी ‘कॅमेरा-ट्रॅप’पद्धत ही डॉ. कारंथ यांनीच शोधली आहे. त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, या जंगलाला संरक्षण देण्याविषयी राज्य वन्यजीव सल्लागार मंडळानं राज्य सरकारला सुचवलं. त्यानुसार, कर्नाटक सरकारनं सन १९८७ मध्ये सुमारे ६००.३२ चौरस किलोमीटरच्या या जंगलाला ‘राष्ट्रीय उद्यान’ म्हणून मान्यता दिली. आजही ही सिंहपुच्छ माकडं कुद्रेमुखमध्ये मोठ्या संख्येनं आढळतात. या माकडाच्या दोन्ही गालांवर व कपाळाच्या वरच्या बाजूला (चेहऱ्यावर वर्तुळाकार) करड्या व पांढऱ्या रंगाच्या केसांचे पुष्कळ झुबके असतात, तसंच त्याच्या शेपटीच्या टोकाला सिंहाच्या शेपटीसारखा केसांचा झुबका असतो, त्यामुळे त्याला ‘सिंहपुच्छ माकड’ असं म्हटलं जातं. नरामध्ये शेपटीच्या केसांचा झुबका जास्त लांब आणि जाड असतो. केरळमध्येही या माकडांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याची नोंद आहे.

सदाहरित जंगल हे कुद्रेमुखचं वैशिष्ट्य; पण हे जंगल नुसतंच हिरवंगार नाही. या परिसरातल्या जंगलाला ‘शोला जंगल’ असंही म्हणतात. शोला जंगल म्हणजे दोन दऱ्यांमध्ये अडकलेलं जंगल. या अशा जंगलात झाडांबरोबरच आजूबाजूला गवताळ मैदानंही असतात. दोन डोंगरांच्या मध्ये असल्यामुळे इथल्या जंगलातली झाडं, वेली, वैशिष्ट्यपूर्ण आहेत. सूर्यप्रकाशही जमिनीवर पोहोचणार नाही अशी उंच झाडं काही परिसरात आहे. ही झाडं आणि अतिशय मोठमोठ्या वेली यांमुळे इतर जैवविविधताही वैशिष्ट्यपूर्ण आहे. कुद्रेमुखजवळ असणाऱ्या ‘अगुंबे’ या ठिकाणी राज्यातील सर्वात जास्त पाऊस पडतो, त्यामुळे या ठिकाणी अप्रतिम असं वर्षावन निर्माण झालं आहे. जगातील सर्वात लांब असा विषारी साप म्हणजेच ‘नागराज’ अर्थातच किंग कोब्रा हे या ठिकाणचं वैशिष्ट्य. हा जहाल विषारी साप हा घरटं तयार करणारा एकमेव साप आहे.

चिकमगळुरू, उडपी आणि दक्षिण कन्नड या तीन जिल्ह्यांत पसरलेल्या ‘कुद्रेमुख राष्ट्रीय उद्याना’चा आकार हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य. कानडी भाषेतल्या कुद्रेमुख या शब्दाचा अर्थ घोड्याचं तोंड. कर्नाटक राज्यातील ‘मुलयानगिरी’खालोखाल दुसऱ्या सर्वात उंच शिखराच्या (१८९४ मीटर) या डोंगराचा आकार घोड्याच्या तोंडासारखा दिसतो. तुंग, भद्रा आणि नेत्रावती या नद्या ‘कुद्रेमुख’च्या जीवनवाहिनी आहेत. पुढं शिमोगा जिल्ह्यातील ‘कुडली’ या ठिकाणाजवळ तुंग आणि भद्रा या नद्यांचा संगम होतो आणि त्यांची ‘तुंगभद्रा’ नदी होते. कुद्रेमुख जंगलातील ‘गंगमुला’ या ठिकाणी या तिन्ही नद्यांचा उगम होतो. हे ठिकाण पाहण्यासारखं आहे. 

तसंच हनुमानगुंडी, कदंबी धबधबा, श्रृंगेरी ही या जंगलातील भेट देण्यासारखी ठिकाणं. कुद्रेमुख, केरकाते, कलासा आणि शिमोगा या चार भागांत विभागल्या गेलेल्या या राष्ट्रीय उद्यानात ‘भगवती नेचर कॅम्प’ नावाचं वनविभागाची सोय असणारं राहण्याचं ठिकाण आहे. याशिवाय श्रृंगेरी, कलासा इथंही राहण्याची सोय आहे. अप्रतिम निसर्गसौंदर्याबरोबरच येथे असणाऱ्या अनेक ट्रेकिंग-पॉईंट्सवर ट्रेकिंगचाही आनंद घेता येतो.

कुद्रेमुखला एखाद्या निसर्गवेड्याचा कस लागतो. सूर्यप्रकाशही सहजासहजी न पोहोचणाऱ्या हिरव्यागार घनदाट जंगलात, डोंगर-दऱ्यांतून फिरताना एखाद्याच्या शारीरिक क्षमतेची कसोटी लागते. आजूबाजूच्या झाडा-झुडपांवर असणाऱ्या जळवा आपल्या शरीराचा कधी वेध घेतील याचा काही नेम नसतो. मात्र, या सगळ्याची सवय करून घेतली की कुद्रेमुखमध्ये फिरण्यासारखं दुसरं सुख नाही. सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, वृक्ष, वेली अशा विविधतेचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी कुद्रेमुख हे सुयोग्य ठिकाण. कुद्रेमुखसारखी ‘शोला जंगलं’ हा खरं तर आपल्याला आवश्यक असणाऱ्या पाण्याचा खरा स्रोत. पाण्याच्या व्यवस्थापनाचा अद्भुत नैसर्गिक कारखाना असणाऱ्या या शोला जंगलातील काही वनस्पती, प्राणी, पक्षी जगात कुठंही आढळत नाहीत. विविध कारणांमुळे ही जंगलं कमी होत चालली आहेत आणि हा आपल्यासमोरचा खरा धोका आहे. शाश्वत विकासासाठी कुद्रेमुखसारखी ‘शोला जंगलं’ वाचवणं हेच आपलं प्राथमिक उद्दिष्ट असायला हवं. जगाला भेडसावणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगसारख्या धोक्यांविरुद्ध लढण्यासाठी कुद्रेमुखसारखी ‘शोला जंगलं’च निर्णायक अस्त्र म्हणून उपयोगी पडतील. 

कसे जाल? : पुणे-उडपी/मंगळूरू-कुद्रेमुख
भेट देण्यासाठी उत्तम कालावधी : ऑक्टोबर ते मे
काय पाहू शकाल?
सस्तन प्राणी :
सुमारे ४२ प्रजाती. वाघ, बिबट्या, गवे, सिंहपुच्छ माकड, लाजवंती (स्लेंडर लॉरिस), रानमांजर, लेपर्ड कॅट, अस्वल, हत्ती, शेकरू.

पक्षी : सुमारे २५४ हून अधिक प्रजातींचे पक्षी. Blossom Headed Parakeet, Blue Winged Parakeet, Indian Lorikeet, Great Pied Hornbill, Frog Mouth, Long Tailed Nightjar, Malabar Trogon, Black Capped Kingfisher, Stork Billed Kingfisher, Indian Great Black Woodpecker, Spotted Babbler.

सरपटणारे प्राणी : सुमारे ५२ हून अधिक प्रजाती. Brook''s House Gecko, Northern Spotted Gecko, Indian Rock Python, Buff-Striped Keelback, King Cobra,, Hump-Nosed Pit Viper, Malabar Pit Viper.

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार बापट) 

Edited By - Prashant Patil