घाटांचा मेळ... मेळघाट

अनुज खरे informanuj@gmail.com
Sunday, 24 January 2021

रानभूल
पांडवांचा अज्ञातवास सुरू होता...विराट राजाच्या आश्रयाला आलेले पांडव आणि द्रौपदी हे नाव आणि वेश बदलून विराटनगरीत राहत होते... बारा वर्षांचा वनवास संपला होता; पण एक वर्षाचा खडतर अज्ञातवासाचा काळ शिल्लक होता... ‘या काळात कुणीही या सहांपैकी कुणालाही ओळखलं तरी पुन्हा बारा वर्षं वनवास भोगायचा,’ अशी अट कौरवांनी द्यूतप्रसंगी घातलेली होती...

पांडवांचा अज्ञातवास सुरू होता...विराट राजाच्या आश्रयाला आलेले पांडव आणि द्रौपदी हे नाव आणि वेश बदलून विराटनगरीत राहत होते... बारा वर्षांचा वनवास संपला होता; पण एक वर्षाचा खडतर अज्ञातवासाचा काळ शिल्लक होता... ‘या काळात कुणीही या सहांपैकी कुणालाही ओळखलं तरी पुन्हा बारा वर्षं वनवास भोगायचा,’ अशी अट कौरवांनी द्यूतप्रसंगी घातलेली होती... अत्यंत कठीण असं हे वर्ष संपत आलं होतं; पण तितक्यात महाराणी सुदेष्णाच्या भावाची - कीचकाची - नजर तिची दासी बनून राहिलेल्या सैरंध्रीवर, म्हणजेच द्रौपदीवर पडली. द्रौपदीच्या सौंदर्यावर मोहित झालेल्या कीचकानं द्रौपदीला त्रास द्यायला सुरुवात केली. द्रौपदीनं या संकटाविषयी विराटाच्या मुदपाकखान्याचा आचारी बनलेल्या ‘बल्लवा’ला म्हणजेच भीमाला सांगितलं. ‘तू कीचकाला रात्री नृत्यशाळेत बोलाव, मी त्याचा समाचार घेतो,’ अशा शब्दांत भीमानं तिला आश्वस्त केलं. ठरल्यानुसार कीचक तिथं गेला असता भीमानं कीचकाचा वध करून त्याला एका दरीत टाकलं. पुढं या दरीला ‘कीचकदरा’ असं नाव पडलं. ही पौराणिक कथा सांगण्याचा उद्देश एवढाच की ही आख्यायिका ज्या ‘कीचकदरा’शी जोडली गेली आहे त्या नावाचाच पुढं अपभ्रंश होऊन ‘चिखलदरा’ झाला. 

आजच्या लेखाचा विषय असलेला ‘मेळघाट व्याघ्रप्रकल्प’ इथलाच.

कीचकाला ठार मारल्यावर भीमानं ज्या कुंडात हात धुतले अशी कथा आहे, त्या कुंडाला आजही ‘भीमकुंड’ या नावानं ओळखलं जातं. असा पौराणिक वसा जपणाऱ्या या स्थळानं आणखी एक वारसा आजही जपलाय, आजही एक वैभव टिकवून ठेवलंय व ते म्हणजे ‘व्याघ्रवैभव’. ‘मेळघाट व्याघ्रप्रकल्प’ अतिशय विलक्षण भूभागासाठी प्रसिद्ध आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात वाघांची संख्या सुमारे एक लाख होती अस म्हटलं जातं. पुढं ब्रिटिशांनी आणि राजे-महाराजांनी ‘शौर्याचं प्रतीक’ म्हणून वाघांची बेसुमार शिकार केली. स्वातंत्र्योत्तर काळातही परिस्थितीत फारसा फरक पडला नव्हता आणि अवयवांच्या चोरट्या व्यापारासाठी वाघांची शिकार होतच राहिली. सन १९७० च्या दरम्यान वाघांची संख्या सतराशेच्या आसपास घसरली. या अधोगतीला एका पोलादी स्त्रीनं आवर घातला व त्या म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी. त्यांच्या प्रयत्नांनी आणि पुढाकारानं सन १९७३ मध्ये भारतातल्या नऊ जंगलांना ‘व्याघ्रप्रकल्प’ हा दर्जा देण्यात आला. ‘मेळघाट’ हा त्याच नऊ व्याघ्रप्रकल्पांपैकी एक. महाराष्ट्रातला सर्वात पहिला व्याघ्रप्रकल्प. मेळघाटाची भौगोलिक विविधता विलक्षण आहे. भूप्रदेशाच्या बाबतीत एवढी विविधता असूनही आजही मेळघाटात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे हा निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल.

‘मेळघाट’ म्हणजे घाटांचा मेळ. मेळघाट-सातपुडा-मैकल या भूप्रदेशातल्या सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलं आहे. सातपुड्याच्या रांगांपैकी गाविलगड ही रांग इथं पूर्व-पश्चिम अशी पसरलेली आहे. मेळघाट हा व्याघ्रप्रकल्प या रांगांच्या उत्तरेला आहे. ‘वैराट’ हे व्याघ्रप्रकल्पातलं सर्वात उंचीवरचं ठिकाण समुद्रसपाटीपासून ११७८ मीटर उंचीवर आहे. मेळघाट हा दऱ्या-खोऱ्यांचा, घनदाट जंगलांचा प्रदेश. ‘सिपना’ ही मेळघाटातली महत्त्वाची नदी. सिपना या शब्दाचा अर्थ साग. सागाची झाडं मेळघाटात मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे या झाडांमधून वाहणाऱ्या या नदीला ‘सिपना’ असं नाव पडलं. याशिवाय खंडू, खापर, गाडगा आणि डोलार या आणखी चार नद्या मेळघाटातून वाहतात. सिपनासह या चार नद्याही पुढं तापी नदीला मिळतात. मेळघाटात चिखलदरा, चीलदरी, पातुल्डा आणि गुगामल ही अतिशय दुर्गम ठिकाणं. शिवाय, मेळघाटात नर्नाळा नावाचा किल्ला आहे. हा वनदुर्ग आहे, म्हणजे त्याच्या चारी बाजूंना घनदाट जंगल आहे.

सप्तरंगमधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा.

मेळघाटात एका अत्यंत दुर्मिळ घुबडाचा आढळ आहे. ते म्हणजे फॉरेस्ट औलेट. पूर्वी हा पक्षी मध्य प्रदेशात व महाराष्ट्राच्या अन्य भागांतही मोठ्या संख्येनं आढळत असे; पण नंतरच्या काळात तो नामशेष झाल्याचं घोषित करण्यात आलं. साधारणपणे दिवसा सक्रिय असणाऱ्या या पक्ष्याचा शोध रात्रीच्या वेळी घेतला गेल्यामुळे मेळघाटात त्याचा असलेला वावर निदर्शनास आला नाही. सन १९९७ मध्ये तो दृष्टीस पडल्यावर त्याचा पुन्हा शोध घेण्यात आला आणि त्याची पुन्हा नोंद करण्यात आली. 

या पक्ष्याला मराठीत ‘वनपिंगळा’ असं म्हणतात. गडद करडा, तपकिरी रंग असलेला हा पक्षी साधारणतः साळुंकीएवढा आहे. याच्या कपाळावर आणि पाठीवर अगदी अस्पष्ट ठिपके असतात. पंखांवर आणि शेपटीवर रुंद तपकिरी-काळपट आणि पांढरे पट्टे असतात. छातीचा रंग गडद तपकिरी असून छातीच्या वरील भागावर पांढरे पट्टे असतात. पोटाकडचा भाग पांढरा स्वच्छ असतो. उंदीर, कीटक, पाली, सरडे हे मुख्य खाद्य असणारा हा पक्षी कधी कधी छोट्या पक्ष्यांचीही शिकार करतो. पानझडी जंगलात याचं वसतिस्थान आहे. सागवानबहुल पानगळी जंगल असलेल्या मेळघाटात या पक्ष्याची संख्या लक्षणीय आहे. मेळघाटात हा पक्षी नर्नाळा, वान, तोरणमाळ, चौराकुंड या भागात सापडतो. डॉ. प्राची मेहता यांच्या संस्थेमार्फत या  वनपिंगळ्यावर शास्त्रीय अभ्यास मेळघाटात सुरू आहे. या अभ्यासाद्वारे या पक्ष्याच्या संवर्धनाचे यशस्वी प्रयत्न सुरू आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मेळघाटच्या जंगलाला माझ्या मनात एक विशिष्ट स्थान आहे. एकतर मी पाहिलेलं हे पहिलं जंगल, त्यामुळे या जंगलानं मला खूप गोष्टी शिकवल्या. चिकार अनुभव दिले. इथं मी अगदी सगळ्या ऋतूंमध्ये मनसोक्त भटकलो. निसर्गाचा कोरडा चेहरा बघितला, कुडकुडायला लावणारी थंडी बघितली आणि निसर्गाचं रौद्र रूपही. इथल्या सातपुड्याच्या डोंगररांगा, उंच उंच शिखरं, तळ दिसणार नाहीत अशा दऱ्या, त्यांच्या पाठीवर पसरलेलं विस्तीर्ण जंगल, नजर जाईल तिथं दिसणारं घनदाट अरण्य, मोठमोठी गवताळ कुरणं, प्रचंड आवाज करत डोंगरावरून खाली उड्या मारणारं नद्यांचं अवखळ पाणी, नागासारख्या चालीनं जाणारी सिपना नदी आणि या सर्वात ठायी ठायी भरलेली जैवविविधता यामुळे मी मेळघाटाकडे अक्षरशः ओढला जातो. वर्षातून एकदा तरी इथं आल्याशिवाय मला चैन पडत नाही. इथं आलो की मग जाणवतं की आपल्यावर निसर्गाचा किती वरदहस्त आहे ते. निसर्गानं आपल्यावर वेगवेगळ्या रंगांची उधळण केली आहे. त्या रंगांत रंगून जायचं की आपला वेगळा रंग दाखवायचा हे आपल्या हातात आहे. निसर्ग सतत आपल्यावर अमृतवर्षाव करत आला आहे. त्याच्या या बरसणाऱ्या धारांमध्ये चिंब भिजायचं की कोरडा पाषाण बनून राहायचं हे आपण ठरवायचं आहे. त्याचा हात हातात घेतला की आपल्या जीवनाच्या प्रवासाला खरी मजा येईल. हात सोडला तर मात्र ही दूर जाणारी वाट कदाचित आपल्याला वाळवंटाकडेच घेऊन जाईल!

कसे जाल? : 
पुणे-बडनेरा-मेळघाट
भेट देण्यासाठीचा उत्तम कालावधी : ऑक्टोबर ते जून

काय पाहू शकाल? :
सस्तन प्राणी :
मुंगूस, जवादी मांजर, उदमांजर, खवल्यामांजर, साळिंदर, ससा, वानर, रानकुत्री, चांदी-अस्वल, रानडुक्कर, अस्वल, गवा, रानमांजर, चितळ, सांबर, भेकर, दुर्मिळ पिसोरी-हरीण, नीलगाय, चौशिंगा, बिबट्या, पट्टेरी वाघ, पखमांजर.

पक्षी : तुरेबाज व्याध, शिक्रा, मोहोळघार, कापशी-घार, मत्स्यघुबड, कंठेरी शिंगळा घुबड, गव्हाणी-घुबड,  पिंगळा, वनपिंगळा, मत्स्यगरुड, कोतवाल, कुरटुक, सूर्यपक्षी, स्वर्गीय नर्तक, नवरंग, सुतारपक्षी.

सरपटणारे प्राणी : मगर, कासव, पाल, गेको, सरडा, घोरपड, सापसुरळी, वाळा, डुरक्या घोणस, अजगर, दुतोंड्या, तस्कर, धामण, धूळनागीण, कवड्या, कुकरी, गवत्या, पाणदिवड, नानेटी, मांजऱ्या, चापडा, नाग, फुरसं, मण्यार, घोणस.

वृक्ष : साग, ऐन, अर्जुन, बेहडा, बिजा, भेरा, बोर, बेल,चीचवा,धावडा,कुसुम, मोह, मोवई, रोहन, सालई, करू, सावर, शिसम, शिवण, सूर्या, तेंदू, इ. 

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार बापट) 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anuj Khare Writes about Melghat