पेंच माझा सर्वांगसुंदर सखा

अनुज खरे informanuj@gmail.com
Sunday, 10 January 2021

रानभूल
भारतातल्या जंगलांचं निसर्गसौंदर्य काही वेगळंच. या नितांतसुंदर जंगलांची वैशिष्ट्यं, तिथलं जैववैविध्य यांची ओळख करून देणारं हे साप्ताहिक सदर.

पेंच व्याघ्रप्रकल्प... महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांत पसरलेलं हे जंगल अतिशय वैविध्यपूर्ण आहे. आपण पेंचच्या महाराष्ट्राच्या बाजूची माहिती घेऊ या. नागपूर जिल्ह्यात असलेल्या पेंच व्याघ्रप्रकल्पाला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा सन १९९९ मध्ये देण्यात आला. नागपूरपासून सुमारे ९० किलोमीटरवर असलेल्या पेंच व्याघ्रप्रकल्पाला सिल्लारी, कोलीतमारा, चोरबाहुली, खुबादा (सालेघाट), खुरसापार आणि सुरेवाणी (नागलवाडी) अशी प्रवेशद्वारं आहेत. सुमारे २५७.२६ चौरस किलोमीटरचा कोअर भाग आणि सुमारे ४८३.९६ चौरस किलोमीटरचा बफर भाग मिळून सुमारे ७४१.२२ चौरस किलोमीटर भागात पेंच व्याघ्रप्रकल्प महाराष्ट्रात पसरलेला आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मिळून पेंच जंगलाच्या साधारणतः एक तृतीयांश जंगल महाराष्ट्रात येतं. उष्णकटीबंधीय शुष्क पानझडी जंगलप्रकारात मोडणारं हे जंगल सातपुडा-मैकल या उपरांगांमध्ये वसलेलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या व्याघ्रप्रकल्पाला पेंच हे नाव जिच्यामुळं मिळालं ती ‘पेंच’ नदी या जंगलाची जीवनवाहिनी आहे. पूर्व पेंच आणि पश्चिम पेंच असे पेंचचे दोन भाग पडतात. सिल्लारी, कोलीतमारा, सुरेवाणी हे भाग पश्चिम पेंचमध्ये आणि खुरसापार हा भाग पूर्व पेंचमध्ये मोडतो. 

पेंचची भौगोलिक विविधता लगेच लक्षात येते. पश्चिम पेंचची भौगोलिक रचना उंच-सखल आहे. इथं छोट्या-मोठ्या टेकड्या आहेत, नैसर्गिक पाण्याच्या जागा आहेत, दाट जंगल आहे, विरळ गवताळ प्रदेशही आहेत. याउलट, पूर्व पेंचमध्ये मोकळी माळरानं अधिक. हे दोन्ही अनुभव घेताना वेगळी मजा येते. महाराष्ट्रात पर्यटक सिल्लारी भागाला मोठ्या प्रमाणावर भेट देतात. सिल्लारीला वन विभागाचं संकुल आहे. इथं मुक्काम करण्यासाठीची सोय आहे. संकुलाच्या मागच्या बाजूला एक मोठा डोंगर आहे. या डोंगरावरून एक नेचर ट्रेल काढण्यात आलेला आहे. या ट्रेलच्या शेवटी एक छोटा तलाव आहे. बऱ्याचदा या पाणवठ्यावर संध्याकाळच्या वेळी प्राणी, पक्षी आलेले पाहायला मिळतात. इथं जाताना मात्र थोडी सावधगिरी बाळगावी लागते. एखादा बिबट्या इथं अवचित समोर उभा ठाकू शकतो. एकदा तर डोंगरावरून अचानक येऊन रानडुकरांनी मला पुरतं गोंधळवून टाकलं होतं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सिल्लारीजवळ महाराष्ट्र वन विभागाची सुंदर नर्सरी आहे. इथं विविध प्रकारची झाडं पाहायला मिळतात. हीच झाडं पावसाळ्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी लावण्यात येतात. इथं आणखी एक गोष्ट वन विभागानं चांगली केली आहे व ती म्हणजे स्थानिक लोकांना रोजगाराच्या निरनिराळ्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. वन विभागानं केलेल्या साह्यामुळं दोन फायदे झाले. एक म्हणजे, या लोकांचं जंगलांवरचं अवलंबित्व कमी झालं आणि दुसरं म्हणजे, या लोकांचा वन विभागावरचा विश्वास वाढला. याशिवाय, इथं एक सुंदर निसर्ग-परिचयकेंद्र आहे. जंगलात दिसणाऱ्या अनेक बाबींवर इथं प्रकाश टाकण्यात आलेला आहे. वाघांच्या एकंदर आयुष्याचा मागोवादेखील इथं शिल्पांच्या माध्यमातून घेतलेला पाहायला मिळतो. इथं एक निसर्गप्रशिक्षक असतो. तो या परिचयकेंद्राची माहिती आपल्याला करून देतो. 

पेंचमध्ये आजवर अनुभवलेले अनेक क्षण माझ्या मनावर कायमचे कोरले गेले आहेत. मध्य प्रदेश असो वा महाराष्ट्र असो, दोन्ही बाजूंच्या पेंचचं काही ना काही वैशिष्ट्य आहे. इथले विस्तीर्ण गवताळ प्रदेश, लहान-मोठ्या टेकड्या, अजस्र कातळ, एखाद्या दिवशी कातळावर बसलेल्या बिबट्याचं दर्शन, कायम ‘बोलके’ असणारे इथले पाणवठे, ‘मेघदूत’ जलाशयाचं अथांग पसरलेलं निळंशार पाणी या सगळ्यांनी पेंचला वेगळ्याच पद्धतीनं आकर्षक बनवलं आहे. त्यामुळे पेंचची मला असलेली ओढ आजतागायत कमी झालेली नाही. या विस्तीर्ण जंगलाला मानवनिर्मित सीमारेषेनं वेगळं केलं आहे; पण निसर्गाला असं कोणत्याही बंधनात बांधून ठेवता येत नसतं. त्यानं दोन्ही बाजूंना आपला खजिना तेवढ्याच मुक्तपणे रिता केला आहे. निसर्गाचं हे सर्वांगसुंदर रूप पाहायचं असेल तर पेंचला जावं. 

पर्यटकांना पेंच कधीही निराश करणार नाही. माझा निसर्गानुभव समृद्ध करण्याचं काम पेंचनं कायमच केलं आहे. गेली अनेक वर्षं आपल्या जादूनं माझ्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या पेंचनं निसर्गाची अनेक मनोहारी रूपं मला दाखवली आहेत. 

आपल्या पोतडीतून दर वेळी मला नवीन काहीतरी दाखवणाऱ्या या निसर्गानं मला पेंचसारखा अनमोल सखा मिळवून दिला आहे. ‘मोगलीचं जंगल’ म्हणून अगदी लहानपणीच माझ्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या पेंचला माझ्या मनात अढळपद लाभलं आहे हे निश्चित. निसर्गानं ही एक अरभाट कलाकृती माणसाच्या पदरात टाकली आहे. निसर्गाचं हे अनमोल दान कवडीमोल ठरू नये हे आता फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे. 

कसे जाल?
पुणे-नागपूर-पेंच 
भेट देण्यासाठीचा उत्तम काळ : ऑक्टोबर ते मे 

काय पाहू शकाल? 
सस्तन प्राणी : वटवाघळांच्या काही प्रजाती, झाडचिचुंद्री, तीनपट्टी खार, मुंगूस, ऊदमांजर, खवल्या मांजर, साळिंदर, ससा, वानर, कोल्हा, रानकुत्री, खोकड, चांदीअस्वल, रानडुक्कर, अस्वल, गवा, रानमांजर, वाघाटी, चितळ, सांबर, भेकर, नीलगाय, चौशिंगा, बिबट्या, पट्टेरी वाघ, पखमांजर आदी. 

पक्षी : सुमारे ३२५ प्रजातींचे पक्षी : तुरेबाज व्याध, शिक्रा, तुरेवाला सर्पगरुड, मोहोळघार, कापशी घार यांसारखे शिकारी पक्षी, मत्स्यघुबड, कंठेरी शिंगळा घुबड (इंडियन स्कॉप्स आउल), गव्हाणी घुबड, ठिपकेदार पिंगळा, हळद्या, मोर, सूर्यपक्षी, हळद्या, हरियाल, पिट्टा आदी. 

सरपटणारे प्राणी : कासव, गेको, सरडा, घोरपड, सापसुरळी, अजगर, तस्कर, धामण, धूळनागीण, कवड्या, कुकरी, गवत्या, पाणदिवड, नानेटी, हरणटोळ, मांजऱ्या, चापडा, नाग, फुरसं, मण्यार, घोणस, आदी.

वृक्ष : साग, आंबा, सालई, मोवई, चिंच, करू, ऐन, अर्जुन, जांभूळ, कुंभ, बहावा, रोहन, धावडा, शिवण, उंबर, वड, पिंपळ, भेरा, आवळा, बेहडा, हिरडा, गराडी, हल्दू, खैर, बिजा, कुसुम, सावर, पळस, बेल, मोह, तेंदू, आदी. 

फुलपाखरं : Baronet, Blue Pansy, Chocolate Pansy, Commander, Common Crow, Common Evening Brown, Common Gull, Common Jezebel आदी.

(शब्दांकन : ओंकार बापट) 
(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anuj Khare Writes about Pench Tiger Project