निसर्गरत्नांचं आश्रयस्थान : ईगलनेस्ट

देशातली विविध जंगलं आणि त्यांचं माझ्याशी असलेलं अतूट नातं याबाबत मी गेल्या अनेक लेखांमधून तुमच्याशी संवाद साधलाय.
Eaglenest Wildlife Sanctuary
Eaglenest Wildlife SanctuarySakal
Summary

देशातली विविध जंगलं आणि त्यांचं माझ्याशी असलेलं अतूट नातं याबाबत मी गेल्या अनेक लेखांमधून तुमच्याशी संवाद साधलाय.

देशातली विविध जंगलं आणि त्यांचं माझ्याशी असलेलं अतूट नातं याबाबत मी गेल्या अनेक लेखांमधून तुमच्याशी संवाद साधलाय. निसर्गाच्या या अद्भुत कलाकृतीनं आजवर माझ्यावर जी भुरळ घातली, मला संमोहित केलं तिच्या अमलाखाली मी अनेक जंगलं भटकलो. या भटकंतीनं माझं जीवन खऱ्या अर्थानं समृद्ध झालं. भारतातल्या अगदी प्रत्येक भागातली जंगलं माझ्या या निसर्गयज्ञाच्या ध्यासापायी मी पालथी घातली. आजही एक प्रकारची अनामिक ओढ माझ्या मनात निसर्गाविषयी कायम आहे. मला निसर्गाची गोडी लावणारे माझे दोन गुरू म्हणजे व्यंकटेश माडगूळकर आणि किरण पुरंदरे यांनी मला निसर्ग बघायला, वाचायला शिकवला. आपल्याला निसर्ग वाचता आला नाही तर तो वाचवता कसा येणार, या विचारानं मीही मन लावून निसर्ग वाचला. निसर्ग वाचताना माझ्या असं लक्षात आलं, की निसर्ग वाचवण्यासाठी आपण असं वेगळं काही करण्याची गरजच नाही. उलट निसर्गानं आखून दिलेल्या नियमांनुसार आपण वागलो, निसर्गाचं ऐकलं, तर अख्खी मानवजात आपण वाचवू शकू. निसर्गाच्या अस्तित्वावरच आपलं अस्तित्व अवलंबून आहे, त्यामुळं निसर्गाला वाचवण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा त्याला जाणून घेऊन त्यानं आखून दिलेल्या चौकटीप्रमाणे वागलो तर आपलं भवितव्य उज्ज्वल असेल यात कोणतीही शंका नाही.

भारतातल्या अनेक सुंदर जंगलांपैकी अशाच एका सुंदर जंगलानं अगदी बालपणापासून माझ्यावर विलक्षण जादू केली होती. अर्थात, अगदी लहान असताना मला निसर्ग, जंगल वगैरे बाबींबद्दल फारसा गंध नव्हता. अगदी बालपणीच्या काळात आई-बाबा यांच्याकडून ऐकलेल्या गोष्टींमधून ईशान्य भारतातली जंगलं, तिथले प्राणी-पक्षी यांच्याबद्दल माझ्या मनात एक चित्र तयार झालं होतं. इथल्या जंगलातल्या जळवा माणसाच्या रक्ताचा अगदी शेवटचा थेंब संपेपर्यंत रक्त शोषून घेतात, इथले डास हे पक्ष्यांपेक्षा मोठ्या आकाराचे असतात, उडते सर्प आपल्या डोक्यावर हिरे घेऊन जातात, अशा नानाविध कल्पनांनी माझ्या मनात ईशान्य भारतातली जंगलं रंगवली होती. पण जसजसा मी मोठा होत गेलो, तसतशी मला ‘निसर्गदृष्टी’ लाभत गेली. या कल्पना केवळ अतिरंजक कथा आहेत हे समजत गेलं. पण ईशान्य भारतातल्या जंगलांची ओढ काही कमी झाली नाही. याचं कारण इथली सुंदर जंगलं आणि त्यात असलेली अफलातून जैवविविधता. याच ओढीतून मी अनेक वर्षांपूर्वी एका अभयारण्याला भेट दिली आणि त्या जंगलाच्या प्रेमातच पडलो. पक्षी निरीक्षण आणि पक्षी अभ्यास यांची नव्यानं व्याख्या ठरवणाऱ्या या जंगलाचं नाव आहे ‘ईगलनेस्ट वन्यजीव अभयारण्य’. अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यात हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या या अभयारण्याला निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्व आहे. या जंगलाच्या ईशान्येला ‘सेसा ऑर्किड अभयारण्य’ आहे, तर पूर्वेला कामेंग नदीच्या पलीकडच्या बाजूला ‘पाके व्याघ्र प्रकल्प’ आहे. कामेंग हत्ती प्रकल्पाचा भाग असलेली ही तिन्ही जंगलं. १९५० साली भारतीय लष्कराच्या रेड ईगल तुकडीला या ठिकाणी तैनात करण्यात आलं होतं, त्यावरूनच या अभयारण्याचं नाव ‘ईगलनेस्ट’ अभयारण्य असं पडलं आहे.

१९८९ साली या जंगलाला अभयारण्य म्हणून मान्यता देण्यात आली. सुमारे २१८ चौ. कि.मी. क्षेत्रात हे अभयारण्य पसरलेलं आहे. टिप्पी नदी ही या जंगलातून वाहणारी प्रमुख नदी, जी पुढं कामेंग या नदीला मिळते. याशिवाय बुहिरी, दिहुंग या नद्या पुढं ब्रह्मपुत्रेला जाऊन मिळतात. मोठ्या प्रमाणावर पडणारा पाऊस हा या नद्यांचा मुख्य जलस्रोत आहे. या नद्या आणि काही छोटे-मोठे ओढे या अभयारण्यातील जीवांची तहान भागवतात. अतिशय दुर्गम भाग आणि कच्चा रस्ता यामुळं हे जंगल आजपर्यंत टिकून राहिलं आहे. वैज्ञानिक, सैन्य आणि निसर्ग पर्यटक एवढेच काय ते या जंगलाच्या संपर्कात येतात. पक्षी निरीक्षण यादृष्टीनं या जंगलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक प्रजातींचे दुर्मीळ प्राणी, पक्षी, कीटक आपल्याला केवळ याच भागात बघायला मिळतात. सुमारे ५२५ प्रजातींच्या पक्ष्यांचं हे अभयारण्य म्हणजे आश्रयस्थान. १९९५ साली रमणा अत्रेय यांनी ‘बुगुन लियोचिकला’ या दुर्मीळ पक्ष्याचा येथे शोध लावला. पुढं २००६ साली त्यांनी या पक्ष्याचं इथं पुन्हा निरीक्षण नोंदवलं आणि त्यावर अभ्यास केला. हा पक्षी भारतात या ईगलनेस्ट खोऱ्याव्यतिरिक्त अन्यत्र कुठंही आढळत नाही. गेल्या ५० वर्षांत भारतात शोधण्यात आलेली ही शेवटची पक्ष्याची प्रजाती आहे.

बुगुन लियोचिकला हा सातभाई पक्ष्याच्या कुळातील एक छोटा पक्षी आहे. त्याचा पिसारा पिवळट- हिरवट -राखाडी रंगाचा आहे आणि डोक्याचा वरचा भाग काळा असतो. त्याच्या चेहऱ्यावर नारंगी-पिवळ्या रेषा आणि पंखांवर पिवळे, लाल, पांढरे पट्टे असतात. शेपूट काळी असून, तिचं टोक लाल रंगाचं असतं. त्याचे पाय गुलाबी रंगाचे असतात, तर चोच तोंडापाशी काळ्या रंगाची असून, टोकाकडं पांढऱ्या रंगाची होते. या पक्ष्याचा साधारणतः आकार २२ सें.मी. एवढा छोटा आहे. २००६ मध्ये या पक्ष्यांची संख्या सुमारे १४ नोंदवण्यात आली होती. आता या पक्ष्याला मिळालेलं संरक्षण आणि त्यांचं नोंदवण्यात आलेलं निरीक्षण याच्या आधारे शास्त्रज्ञांच्या मते ही संख्या सुमारे ५० ते २५० या घरात पोहोचली असावी. रमणा अत्रेय यांनी २००५ साली ईगलनेस्ट अभयारण्यात हा पक्षी पाहिल्यावर त्याचं शास्त्रोक्त वर्णन केलं. याअगोदर त्यांनी हा पक्षी १९९५ साली इथंच पहिला होता. हा नवीन प्रजातीचा पक्षी आहे का, याची खात्री करण्यासाठी त्यांनी दोन पक्ष्यांना पकडून त्यांचा शास्त्रीय अभ्यास केला आणि २००६ साली नवीन प्रजातीचा पक्षी सापडल्याचं जाहीर केलं. या पक्ष्याचा रंग आणि आवाज इतका विशिष्ट आहे, की पक्षी निरीक्षकांच्या दृष्टीतून हा पक्षी निसटणं सहसा कठीणच. पक्षिशास्त्रात अशा प्रकारे पक्ष्याची नवीन प्रजात सापडणं ही दुर्मीळ घटना आहे. इथं राहणाऱ्या बुगुन जमातीच्या लोकांवरून या पक्ष्याला बुगुन लियोचिकला हे नाव देण्यात आलं आहे.

याशिवाय लाल पांडा, कॅप्ड लंगूर, अरुणाचल मकाक असे दुर्मीळ सस्तन प्राणी आणि अनेक प्रजातींचे दुर्मीळ सरपटणारे प्राणी या जंगलात सापडतात. ‘अबॉर हिल्स अगामा’ या सरड्याच्या प्रजातीचा शोध १२५ वर्षांनंतर पुन्हा ईगलनेस्ट अभयारण्यात लावण्यात आला. डॉ. अन्वरुद्दीन चौधरी यांनी १९९७ साली माकडाच्या नव्या प्रजातीचा शोध इथंच लावला. या प्रजातीचा अभ्यास करून ‘अरुणाचल मकाक’ असं नाव देण्यात आलं. एकूण, इथल्या जैवविविधतेचा अभ्यास केला तर असं लक्षात येईल, की अनेक दुर्मीळ प्रजातींच्या जीवांचं ईगलनेस्ट हे आश्रयस्थान. आपण एकदा या जंगलाला भेट दिली की आपल्या मनात या जंगलाबद्दल एक विशिष्ट स्थान निर्माण होतं. अफलातून निसर्गसौंदर्यासाठी आणि अद्भुत जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या जंगलाबद्दल आपल्या मनात एक विलक्षण ओढ निर्माण होते. ही ओढ आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. निसर्गाच्या या सादाला प्रतिसाद देऊन आपण निसर्गाकडं नकळत ओढले जातो. या ओढीनं निसर्ग आणि आपल्यातलं अंतर पावलापावलाला कमी होत जातं.

गेल्या वर्षभरात भारतातल्या निसर्गानं समृद्ध असलेल्या अनेक जंगलांचा आपण आढावा घेतला. ही जंगलं माझ्या दिठीतून मला जशी दिसली, तशी मी रंगवली. अनेकदा माझ्या लेखणीतून त्यांचं वर्णन करताना माझ्या अत्यंत आवडीचं जंगल असा अनेक जंगलांचा उल्लेख आला आहे. याचं कारण म्हणजे प्रत्येक जंगलाचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. त्यांची एकमेकांशी तुलना होऊ शकत नाही. एकतर निसर्ग हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, त्यामुळं प्रत्येक जंगलाला माझ्या मनात धृवपद आहे. या जंगलांनी माझ्यावर विलक्षण जादू केलेली आहे. ही ‘रानभूल’ मला निसर्गाच्या अधिकाधिक जवळ घेऊन गेली. निसर्गासमोर नतमस्तक झाल्यावर आज ‘निसर्गापुढे काय मागो कळेना’ अशी माझी अवस्था झाली आहे. त्या निसर्गनायकाकडं ‘सदा सर्वदा योग तुझा घडावा’ असं मागणं करतो आणि लेखणीला अर्धविराम देतो.

कसं जाल?

पुणे/मुंबई-गुवाहाटी-तेजपूर-भालुपोंग-तेंगा-रामलिंगा

भेट देण्यास उत्तम हंगाम -

नोव्हेंबर ते एप्रिल

काय पाहू शकाल?

सस्तन प्राणी : गवा, भेकर, रेड पांडा, हिमालयन सेरो, हिमालयन काळं अस्वल, कॅप्ड लंगूर, अरुणाचल मकाक, वाघ, हत्ती, लेपर्ड कॅट, गोल्डन कॅट, भूतान जायंट फ्लाइंग स्क्विरल, अॅरो टेल्ड फ्लाइंग स्क्विरल, स्लो लोरीस इ.

पक्षी : सुमारे ५२५ हून अधिक प्रजातींचे पक्षी, व्हाइट कॉलर्ड ब्लॅकबर्ड्स, वॉल क्रीपर्स, कॉमन बझार्ड, हॉगसन्स फ्रॉगमाऊथ, ब्लू व्हिसलिंग थ्रश, व्हाइट-क्रस्टेड लाफिंग थ्रश, बार्ड आउलेट, सिल्व्हर-इयर्ड मेसिया, बुगुन लियोचिकला, व्हाइट विंग्ड वूड डक, कॉमन मर्गेन्सर, राज धनेश, रीथ्ड हॉर्नबील, खलीज फिझंट, रुफस नेक्ड हॉर्नबील, आयबीस बील, लार्ज व्हिसलिंग टील, लाँग-बिल्ड रीन्ग्ड प्लोवर, हिल मैना, ब्लॅक स्टॉर्क, पिन-टेल्ड ग्रीन पिजन, हिमालयन पाईड किंगफिशर, तिबोटी खंड्या, फेअरी ब्लू बर्ड इ.

फुलपाखरं : सुमारे १६५ प्रजाती – भूतान ग्लोरी, ग्रे ॲडमिरल, स्कार्स रेड-फॉरेस्टर, डस्की लॅबिरिंथ, टायगरब्राऊन, जंगल क्वीन, व्हाइट एज्ड बुश-ब्राऊन, व्हाइट आऊल, इ.

(सदराचे लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. )

(शब्दांकन : ओंकार पांडुरंग बापट)

(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com