फणसाड : गिधाडांचं जंगल

कोकण किनारपट्टीवर असणाऱ्या मुरुड-जंजिरा या सुप्रसिद्ध किल्ल्यापासून जवळच असणाऱ्या एका अप्रतिम जंगलानं मला कायम वेड लावलं आहे.
Vulture
VultureSakal

अफाट नैसर्गिक साधन संपत्तीची देणगी आपल्या राज्याला लाभली आहे असं आपण कायम ऐकतो. अगदी लहान असताना शाळेत शिकत असल्यापासून महाराष्ट्राला लाभलेल्या या वरदानाविषयी आपण वाचलेले आहे. महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या अथांग निळ्या विश्वात दडलेल्या अफलातून जलसंपत्तीने महाराष्ट्राला समृद्ध केले आहेच पण त्याचसोबत निसर्गाचे चक्र संतुलित ठेवले आहे. त्याचसोबत महाराष्ट्रात असणारा पश्चिम घाट हा इथल्या सौंदर्यात अधिक भर टाकतो. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वर्षानुवर्षांपासून टिकून राहिलेलं सुंदर जंगल महाराष्ट्राच्या सौंदर्याला चार चांद लावतं. इथल्या जंगलांमध्ये आल्यावर आपल्याला निसर्ग आपल्यावर वेगळीच जादू करतो. आणि आपणही त्याच्या या मोहिनीत अडकत जातो. असं गुरफटलेपण आपल्याला अधिकाधिक आनंद देऊन जातं.

कोकण किनारपट्टीवर असणाऱ्या मुरुड-जंजिरा या सुप्रसिद्ध किल्ल्यापासून जवळच असणाऱ्या एका अप्रतिम जंगलानं मला कायम वेड लावलं आहे. इथल्या निसर्ग सौंदर्यात न्हाऊन निघताना मनाला जो अलौकिक आनंद होतो त्याची तुलना इतर कोणत्याही आनंदाशी करणं तसं कठीणच. या जंगलाचं नाव आहे फणसाड वन्यजीव अभयारण्य. या जंगलाला निसर्गाचा जणू वरदहस्तच लाभला आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात हे जंगल जंजिऱ्याच्या नवाबाचं शिकारीसाठीचं राखीव क्षेत्र होतं. स्वातंत्र्योत्तर काळात इथल्या निसर्गसंपदेचे संरक्षण व्हावे आणि इथला निसर्गठेवा सुरक्षित राहावा यासाठी राज्य सरकारनं १९८६ मध्ये २५ फेब्रुवारीला या जंगलाला अभयारण्याचा दर्जा दिला. अभयारण्यात आपल्याला शुष्क पानगळीचे सदाहरित-निमसदाहरित आणि मिश्रसदाहरित तसेच किनारी वनराजी म्हणजेच तटीय परिसंस्था असे जंगलप्रकार बघायला मिळतात. पूर्वी शिकारीसाठी प्रसिद्ध असलेले हे जंगल आज तटीय परिसंस्थेचे संवर्धनक्षेत्र बनले आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि रोहा तालुक्यात असणारे सुमारे ६९.७९ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले हे जंगल जैवविविधतेचा उत्कृष्ट नमुना आहे.

अभयारण्यात आपल्याला नानाविध प्रजातींच्या वनस्पती, पशू, पक्षी बघायला मिळतात. या जंगलात अनेक पाण्याच्या जागा आहेत. या जागांना स्थानिक भाषेत ‘गाण’ म्हणतात. या पाणथळ जागांच्या अवतीभोवती असलेल्या मोकळ्या जागेस ‘माळ’ असे संबोधले जाते. चिखलगाण, फणसाडगाण, गुण्याचा माळ, भांडव्याचा माळ अशा अनेक जागा आपल्याला या अभयारण्यात पाहायला मिळतात. अभयारण्यात भ्रमंतीसाठी पायवाटा आहेत. जंगलात पूर्वीच्या काळात जांभा दगडांनी बांधलेले वर्तुळाकार आडोसे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. या पूर्वीच्या लपणाच्या जागा होत्या ज्यांचा उपयोग शिकारीसाठी केला जाई. यांना ‘बारी’ म्हणत असत. सरासरी २८०० मिलीमीटर पडणारा पाऊस दरवर्षी जंगलाला नवं रुपडं देतो. वनस्पती प्रकारात आपल्याला या जंगलात अतिशय मोठ्या प्रमाणात विविधता पाहायला मिळते. असंख्य प्रजातीचे वृक्ष, झुडपे, वेली आपल्याला जंगलात पाहायला मिळतात. गारंबीच्या वेली हेही या जंगलाचे आणखी एक वैशिष्ट्य.

अजस्त्र स्वरूपाच्या या वेलींनी जंगल एखाद्या जटाधारी साधूसारखं भासतं. जंगलात आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण पाहायला मिळेल. हे एक रेस्टॉरंट आहे. इथला मेन्यूही तितकाच स्पेशल. कधी यात गाय, बैल अशा एखाद्या प्राण्याच्या कलेवराचा समावेश असतो तर कधी एखाद्या जंगली प्राण्याच्या मृत शरीराचा. या अनोख्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला येणारे जीवही तितकेच अनोखे आणि दुर्मिळ आहेत. या रेस्टॉरंटचं नाव आहे ‘व्हल्चर रेस्टॉरंट’.

संख्येने अतिशय कमी होत चाललेल्या गिधाड पक्ष्यांसाठी महाराष्ट्र वनविभागातर्फे या अनोख्या रेस्टॉरंटची निर्मिती करण्यात आली आहे. अ‍ॅक्सिपिट्रिडी या कुलात मोडणारा पक्षी आहे. अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया हे खंड वगळता गिधाडे जगात सर्वत्र आढळतात. गिधाडे आकाराने खूप मोठी आणि अतिशय ताकदवान असतात. गिधाडांचे पाय दणकट आणि चोच बाकदार व टोकदार असते. नखे आत वळलेली आणि टोकदार असतात. बहुतेक गिधाडांच्या मानेवर पिसे नसतात. नर आणि मादी दिसायला सारखीच असतात. त्यांची नजर तीक्ष्ण असते. ती दिवसा आकाशात खूप उंचावर पंख न हलविता तासनतास घिरट्या घालतात. गिधाडे मृतोपाजीवी आहेत. ती प्राण्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारत नाहीत. मृतोपजीवी असल्याने निसर्ग स्वच्छ ठेवण्यास ती मदत करतात. गिधाडांच्या जठरातील आम्ल अतिशय क्षरणकारी असते. त्यामुळे कृमी आणि संसर्गजन्य जिवाणूंनी सडलेले मृतदेहाचे मांस ती सहजरीत्या पचवू शकतात.

गिधाडांची घरटी खडकांच्या कपारींसारख्या दुर्गम ठिकाणी असतात. काही प्रजाती झाडांवर देखील घरटी बांधतात . मादी प्रत्येक विणीच्या हंगामात एक किंवा दोन अंडी घालते. पाळीव जनावरे आजारी पडल्यानंतर त्यांना डायक्लोफिनॅक औषध देतात. अशा जनावरांचे मांस खाऊन गिधाडे मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भारतात जनावरांसाठी डायक्लोफिनॅक या औषधांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. अगदी प्राचीन पौराणिक काळापासून आपल्याला गिधाडांचा उल्लेख पाहायला मिळतो. अगदी रामायणकाळातही जटायू आणि संपाती या दोन गिधाडबंधूंची कथा आपण ऐकली आहे. पर्यावरणाचा समतोल राखून ठेवणाऱ्या या अनोख्या जिवाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांचे संवर्धन करण्यासाठीच्या आपल्या प्रयत्नात फणसाड सारख्या जंगलात उभारलेली व्हल्चर्स रेस्टॉरंट अत्यंत मोलाची भूमिका बजावतात. भारतात आपल्याला गिधाडांच्या सात उपजाती पाहायला मिळतात. पांढरे गिधाड, पांढऱ्या पाठीचे गिधाड, भुरे गिधाड, लांब चोचीचे गिधाड आणि राज गिधाड यापैकी पांढऱ्या पाठीची गिधाडे आपल्याला फणसाडमध्ये पाहायला मिळतात.

याशिवाय फणसाडमध्ये आपल्याला बेडूकतोंड्या अर्थात फ्रॉग माउथ नावाचा दुर्मीळ पक्षीही पाहायला मिळतो. याशिवाय सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, सरपटणारे प्राणी, उभयचर यांचीही विविधता आपल्याला फणसाडमध्ये बघावयास मिळते. अभयारण्य हे समुद्रकिनाऱ्यापासून १२ किलोमीटर अंतरावर असून काशीद, कोकबन, चिकनी. दांडा, नांदगाव, बारशिव, मजगाव अशा एकूण ३८ गावांनी वेढलेले आहे. पण तरीही वनविभागाचे प्रयत्न आणि गावकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे इथली विविधता आजही टिकून आहे. इथल्या दांडा मनोऱ्यावरून अथांग पसरलेल्या सागराचे मनोहारी रूप पाहताना भान हरपून जाते.

अनोख्या जैविविधतेने नटलेले हे सुंदर जंगल बघताना आपल्याला वेगळ्याच सुखाची अनुभूती होते. तटीय वनराजी या अनोख्या परिसंस्थेचे संवर्धन करणारे हे जंगल गिधाडे, बेडूक तोंड्या, शेकरू अशा सुंदर प्राणी-पक्ष्यांच्या संवर्धनातही मोठा वाटा उचलते. इथे आल्यावर आपल्याला परिपूर्ण परिसंस्थेचे उदाहरण पाहायला मिळते. अशीच परिसंस्था आपण कायम टिकवून ठेऊ शकलो तर आपल्या पृथ्वीतलावर आपल्याइतका सुंदर देश दुसरा नसेल. निसर्ग वाचवण्यासाठी अशाच छोट्या छोट्या जंगलांचे संरक्षण होणे अतिशय मोलाचे असते. निसर्गचक्रातला अगदी छोट्यात छोटा घटक जरी वाचला तर त्यावर अवलंबून असलेले संपूर्ण निसर्गचक्र आपण वाचवू शकू. आपल्याला मिळालेला हा निसर्गाचा अनमोल ठेवा जपून ठेवणे आणि या ठेवीला मर्मबंधातली ठेव बनवणे अधिक आवश्यक आहे. निसर्गाला आपण आपल्या हृदयाच्या जितके जवळ ठेऊ तितके तो आपल्याला भरभरून देत राहिलं यात शंका नाही.

कसे जाल?

पुणे/मुंबई-रोहा-तळेखार-फणसाड

भेट देण्यास उत्तम हंगाम

ऑक्टोबर ते एप्रिल

काय पाहू शकाल?

वनस्पती - आंबा, ऐन, किंजळ, साग, पारजांभूळ, पळस, पांगारा, कांटे सावर, हळदु, काजरा, वाद, पिंपळ, हिरडा, बेहडा, आवळा, मुरुडशेंग, सर्पगंधा, कुडा, आघाडा, गेळ, गुंज, ब्राह्मी, अनंतमूळ, तमालपत्र, नागरमोथा, मिरी, नरक्या, इ.

सस्तन प्राणी – रानगवा, शेकरू, बिबट्या, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर, कोल्हा, खवल्या मांजर, रानडुक्कर, वानर, माकड, उदमांजर, रानमांजर, मुंगूस, इ.

पक्षी – मलबारचा कवड्या धनेश, कृष्णगरुड, हरियाल, स्वर्गीय नर्तक, ठिपकेदार पिंगळा, हळद्या, सुभग, पंचरंगी पोपट, पाचू कवडा, शिक्रा, ब्राह्मणी घार, तुरेवाला सर्पगरूड, ससाणा, पांढऱ्या पाठीची गिधाडे, सातभाई, बुलबुल, हळद्या, तांबट, खंड्या, खाटीक, सुभग, नीलपंख, स्वर्गीय नर्तक, सुतार, हरियाल, कोकीळ, समुद्र गरूड, बेडूकतोंड्या इ.

सरपटणारे प्राणी – नाग, फुरसे, मण्यार, घोणस, धामण, अजगर, रुका, नानेटी, हरणटोळ, घोरपड, इ.

(या सदराचे लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत.)

(शब्दांकन : ओंकार बापट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com