निसर्गसंवर्धनाचा आदर्श : सायलेंट व्हॅली

आपण भारतातील अनेक जंगलाबद्दल गेल्या अनेक लेखांमधून अनेक जंगलांबद्दल माहिती घेतली आहे. भारताच्या जवळपास सर्व भागातील जंगलांचा आढावा आपण घेतला.
Silent Valley National Park
Silent Valley National Parksakal

आपण भारतातील अनेक जंगलाबद्दल गेल्या अनेक लेखांमधून अनेक जंगलांबद्दल माहिती घेतली आहे. भारताच्या जवळपास सर्व भागातील जंगलांचा आढावा आपण घेतला. उत्तर भारतातील कॉर्बेट, दुधवा, राजाजी; ईशान्य भारतातील कांचनगंगा, बारसे; पूर्व भारतातील नेलापट्टू, पुलीकत; मध्य भारतातील कान्हा, बांधवगड, पेंच, ताडोबा, नागझिरा; पश्चिम भारतातील रणथंबोर, कोयना, चांदोली; दक्षिण भारतातील भद्रा, अन्नामलाई, मदुमलाई, कुद्रेमुख, शरावती अशा अनेक जंगलांची सफर लेखमालेच्या माध्यमातून केली. अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेली दक्षिण भारतातील जंगलं आणि त्यांना माझ्या हृदयात असलेलं विशेष स्थान याचा उल्लेखही मी दक्षिण भारतातील विविध जंगलांची माहिती देताना केला आहे. खरोखरच दक्षिण भारतातल्या जंगलांनी माझ्या मनावर वेगळंच गारुड केलंय. त्यांची माझ्यावर असलेली जादू इतकी वर्ष झाली तरीही टिकून आहे. प्रत्येक जंगलाची स्वतःची अशी खासियत असली तरीही दक्षिण भारतातील जंगलं माझ्या मनाच्या जास्त जवळची आहेत. याचा अर्थ मला बाकी जंगलं आवडत नाहीत असा नाही. पण भारतातल्या इतर जंगलांबद्दल मला असलेल्या प्रेमापेक्षा काकणभर जास्त प्रेम, आकर्षण मला दक्षिण भारतातल्या जंगलांबद्दल वाटतं.

व्यापक जनआंदोलन हे अनेकदा यशस्वी ठरल्याची अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात. मग तो भारताच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा असो वा एखाद्या गोष्टीचं रक्षण करण्यासाठी केलेले प्रयत्न असोत. बहुतांशी ही जनआंदोलनं यशस्वीच ठरतात. याचं कारण म्हणजे सामान्य माणसाची त्यामागची निर्मोही भावना आणि त्या आंदोलनांमागे असलेला मोठा जनरेटा. यापूर्वी आपण वनविभागाच्या अथक परिश्रमामुळे पुन्हा बहराला आलेल्या पन्ना व्याघ्र प्रकल्पाची कहाणी पाहिली आहे. हे जंगल मात्र पूर्णपणे सामान्य लोकांच्या लढ्यामुळे वाचलं, वाढलं आणि अधिक समृद्ध झालं.

केरळ राज्यातील पलक्कड जिल्ह्यातलं हे जंगल म्हणजे सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान. केरळ राज्याला लाभलेला निसर्गवसा अधिकाधिक वाढवणारं हे जंगल निलगिरी पर्वतरांगांमध्ये वसलेलं आहे. या जंगलाच्या शोधाची आणि स्वातंत्र्यानंतर झालेल्या रक्षणाची कथा मोठी आहे.

अगदी गेल्या शतकापर्यंत भारतात जंगलांची एकूण असलेली संख्या आणि जंगलानं आपल्या देशाचा व्यापलेला भाग मोठ्या प्रमाणावर होता. १८५७ मध्ये भारतात आलेल्या रॉबर्ट वेट या वनस्पतिशास्त्रज्ञाने सायलेंट व्हॅली या जंगलाचे अस्तित्व उजेडात आणले. कोणत्याही जंगलाला पार्श्वसंगीताचा साज देणाऱ्या सिकाडा आणि रातकिडा या वर्गाच्या किड्यांच्या अनुपस्थितीमुळे शांतता भरून राहिलेल्या या जंगलाला रॉबर्ट वेटने सायलेंट व्हॅली असे नाव दिले. पुढे १९१४ साली या जंगलाला संरक्षित वन म्हणून मान्यता मिळाली. १९२१ या वर्षांपर्यंत हे जंगल दक्षिण मलबार वन विभागाचा भाग होते. त्यानंतर ते पलक्कड वनविभागात समाविष्ट करण्यात आले.

सायलेंट व्हॅली हे केरळमधील शेवटचे शिल्लक राहिलेले वर्षावन आहे. त्यामुळे या जंगलाचे रक्षण करण्याची हे जंगल जतन करण्याची गरज होती आणि आहे. पण १९५८ मध्ये इथल्या कुंती नदीवर धरण बांधून १२० मेगावॉटचा जलविद्युत प्रकल्प सुरु करण्यासाठी चाचपणी करण्यात आली. या सर्वेक्षणानुसार सायलेंट व्हॅली जंगलाची जागा या जलविद्युत प्रकल्पासाठी आदर्श निवडण्यात आली. मात्र यामुळे संपूर्ण जंगलच बाधित होणार होते. या जलविद्युत प्रकल्पासाठी केरळ सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या. प्रकल्पाला आवश्यक १७ कोटींच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली. मग सुरू झाला हे जंगल वाचवण्यासाठीचा लढा. यासाठी केरळमधील अनेक संस्था, शास्त्रज्ञ पुढे आले. या प्रकल्पामुळे नुसते जंगलच नाही तर त्याचबरोबर या जंगलातली अमूल्य जैवविविधता धोक्यात येणार होती.

यानंतर केंद्रीय समितीने या जंगलाला भेट देऊन हा प्रकल्प रद्द करणे शक्य नसल्यास आवश्यक १७ सुरक्षा धोरणांची यादी तयार केली. हळूहळू हा प्रकल्प आणि यातून होणारे दुष्परिणाम याबाबत जनजागृती होण्यास सुरुवात झाली. १९७० मध्ये या जनआंदोलनाने खऱ्या अर्थाने जोर पकडला. हजारो लोक जे या जंगलाच्या आसपासही राहत नव्हते पण हे जंगल वाचावे अशी त्यांची इच्छा होते, ते एकत्र आले. १९७७ मध्ये केरळ वन संशोधन संस्थेने या संपूर्ण भागाचा अभ्यास केला आणि येथे निलगिरी बायोस्फियरची निर्मिती करण्याची शिफारस केली. १९७८ मध्ये तत्कालीन पंतप्रधानांनी जलविद्युत प्रकल्पाला केंद्रीय समितीने सुचवलेल्या आवश्यक सुरक्षा धोरणांसह हिरवा कंदील दाखवला.

त्यानंतर ही चळवळ अधिकच धारदार झाली. केरळ राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक या चळवळीला पाठिंबा द्यायला लागले. संपूर्ण विरोध झुगारून जून १९७९ मध्ये केरळ सरकारनेही प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली. १९८० मध्ये उच्च न्यायालयानेही यावर सुनावणीस नकार दिला. पण चळवळीत सहभागी असलेले लोक मागे हटले नाहीत. काही लोकांनी केरळच्या राज्यपालांना भेटून कामावर बंदी आणण्याची विनंती केली. केरळच्या राज्यपालांनी ही विनंती मान्य केल्यावर १९८० मध्ये प्रकल्पाचे काम थांबले.

एव्हाना या चळवळीला संपूर्ण भारतातील लोकांकडून पाठिंबा मिळायला लागला. डॉ. सलीम अली, डॉ. माधव गाडगीळ, सी.व्ही. राधाकृष्णन, एम. एस. स्वामीनाथन अशा अनेक पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी या चळवळीला पाठिंबा दर्शवला. १९८० मध्ये स्व. इंदिरा गांधी भारताच्या पुन्हा पंतप्रधान झाल्या. याचदरम्यान केरळ राज्य सरकारने प्रकल्पामुळे बाधित होणारा जंगलभाग वगळता इतर जंगलाला सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान म्हणून मान्यता दिली. डॉ. सलीम अलींसारख्या ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी श्रीमती गांधी यांना या जंगलाचे महत्त्व पटवून दिले. वाढता जनक्षोभ आणि जंगलाचे महत्त्व पाहता १९८३ साली हा प्रकल्प कायमचा बंद करण्यात आला. आणि या जंगलावर घोंघावणारं संकटाचं वादळ शमलं.

या सगळ्यात जनचळवळीचा फार मोठा वाटा आहे. पुढे १५ नोव्हेंबर १९८४ रोजी संपूर्ण जंगलाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. ७ सप्टेंबर १९८५ साली या राष्ट्रीय उद्यानाचे तत्कालीन पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी लोकार्पण केले. सुमारे ८९.५२ चौ.किमी. कोअर झोन असणाऱ्या या जंगलात सुमारे १४८ चौ.किमी.चा बफर झोन असणारा भाग काही वर्षांपूर्वी वाढवण्यात आला आहे. १९८६ साली या जंगलाचा समावेश निलगिरी बायोस्फियर रिझर्व्हमध्ये करण्यात आला. आज सायलेंट व्हॅली जंगलाचा कोअर झोन आणि बफर झोन निलांबर हत्ती अभयारण्याचाही महत्त्वाचा भाग आहे. जंगलाचा इतिहास इतक्या विस्तृतपणे सांगण्याचं कारण म्हणजे जंगलाचं जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून असलेले महत्त्व. सिंहपुच्छ माकडाचा असलेला वावर आणि या प्रजातींच्या माकडांचे सर्वांत मोठे अढळस्थान अशी जंगलाची ख्याती आहे. नानाविध प्रजातींचे पक्षी, प्राणी, कीटक, वनस्पती यांचे अनेक अधिवास भारतात आढळतात. पण यात सायलेंट व्हॅली जंगल अधिक उजवे ठरते.

पश्चिमी घाटातील जैविक विविधतेचा असा संग्रह आपल्याला कदाचितच दुसऱ्या एखाद्या जंगलात पाहायला मिळेल. सुमारे १००० हून अधिक जातीच्या पुष्प वनस्पती ज्यात सुमारे ११० जातींची ऑर्किड, सुमारे ३४ हून अधिक जातीचे सस्तन प्राणी, साधारण २०० जातीची फुलपाखरे, सुमारे ४०० प्रजातींचे पतंग, सुमारे २०० प्रजातींचे पक्षी असा जैवविविधतेचा खजिना आपल्याला येथे पाहायला मिळतो. कुंती नदी, निलगिरी पर्वतातून वाहते. निलगिरी पर्वतात असणाऱ्या दरीतून वाहत घनदाट जंगलातील मैदानावरून पुढे जाते. बारमाही आणि दुथडी भरून वाहणार्‍या कुंती नदीचे पाणी कधीही गढूळ होत नाही तर नेहमी काचेसारखे स्वच्छ असते. याशिवाय या जंगलात भवानी या कावेरी नदीच्या उपनदीचाही उगम होतो.

निसर्गासारख्या गुरूच्या सानिध्यात आल्यावर आपल्याला मिळणारा आनंद हा चिरकाल टिकणारा, चिरंतन असतो. क्षणभंगुर विकासासाठी निसर्गाचा ऱ्हास आपण करत चाललो आहोत हे आपले दुर्दैव. निसर्गाच्या सोबतीने विकासाचे स्वप्न पहिले तर ते शाश्वत असेल. यासाठी सायलेंट व्हॅली जंगलाच्या रक्षणासाठी केलेली जनआंदोलने आपल्याला प्रेरणादायी ठरतील. सर्वसामान्य माणसात असलेली ताकद आणि त्यांचे निसर्गाप्रती असलेले प्रेम यावर फुंकर मारण्याची आज आवश्यकता आहे. तो निखारा फुलला तर निसर्गाच्या रक्षणाकरिता लोकं एकत्र येतील आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या जैवविविधतेचे रक्षण, संवर्धन आपण सहज करू शकू. असे झाले तर आपला भारत देश पृथ्वीतलावरचा सर्वांत सुंदर देश असेल यात शंका नाही.

कसे जाल? : पुणे/मुंबई-कोईम्बतूर-पलक्कड-मुक्काली- सायलेंट व्हॅली

भेट देण्यास उत्तम हंगाम : सप्टेंबर ते मार्च

काय पाहू शकाल?

सस्तन प्राणी : गवा, सिंहपुच्छ माकड, वाघ, बिबट्या, रानकुत्रे, कोल्हा, वानर, लाजवंती, अस्वल, हत्ती, सांबर, भेकर, निलगिरी मार्टिन, रस्टी स्पॉटेड कॅट, इ.

पक्षी : निलगिरी रानपारवा, माउंटन इम्पेरीयल पिजन, जर्डनचा रातवा, भारतीय रातवा, रान रातवा, पर्वत कस्तुर, मलबारचा राखी धनेश, मलबारचा कवड्या धनेश, राज धनेश, पिवळ्या भुवईचा बुलबुल, लाल निखार, भृंगराज, शिटीमार रानभाई, राखी रानकोंबडा, , रुफस बेलीड इगल, कृष्णगरुड, शिक्रा, मलबारी कर्णा, नारिंगी डोक्याचा कस्तुर, सुर्यपक्षी, चष्मेवाला, हळद्या, मलबार बार्बेट, इ.

(सदराचे लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत.)

(शब्दांकन : ओंकार बापट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com