आपण तंत्रज्ञानाच्या आहारी जात आहोत का?

information-technology
information-technology

गेल्या अनेक वर्षांपासून मानवप्रजाती मंगळावर घर वसवण्याची गोड स्वप्न बघत आहे. काळ इतक्‍या वेगाने बदलतो आहे की तंत्रज्ञानाच्या जोरावर काहीही करू शकण्याची धमक आता मानवप्रजाती बाळगत आहे. पण, हा प्रवास इतका सहज आणि सोपा नव्हता. इथपर्यंत पोहोचायलासुद्धा माणसाला बरीच वर्षे लागली. अश्‍मयुग, धातुयुग, यंत्रयुग अशा विविध टप्प्यांतून आजचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. सध्या आपण माहिती तंत्रज्ञान आणि बिग डाटा या युगात जगतो आहे हे म्हणायला हरकत नाही. यंत्रयुगात चार औद्योगिक क्रांती घडून आल्या. पाणी आणि वाफेचा शक्तीचा उपयोग करून यंत्र चालवून उत्पादन करणे हे पहिल्या औद्योगिक क्रांतीमध्ये शक्‍य झाले. दुसऱ्यामध्ये विजेचा वापर करून आणि तिसऱ्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे औद्योगिक क्रांती घडून आली. आता आपण बघत असलेली ही चौथी औद्योगिक क्रांती आहे, ज्यात तिसऱ्या औद्योगिक क्रांतीतील काही घटक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), इंटरनेट ऑफ थिंग्ज, जनुकीय तंत्रज्ञान (Genetic Engineering), यंत्रमानव आणि रोबोटिक्‍स अशा वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग करून अशक्‍य काम शक्‍य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सर्व घडत असताना मानवाच्या जीवनात बरेच बदल घडून आले. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानवाने बरीच प्रगती केली. शेतीचे उत्पादन वाढून उपासमारी कमी करण्यात आली. विविध आजारांवर लस आणि औषध यांचा शोध लावून रोगराईवर विजय मिळवण्यात आला. एकंदरच मानवाचे जीवन हे सुसह्य होत गेले.

तंत्रज्ञानासोबत आणि त्याचा अवतीभोवती हे असे छान छान होत असतानाच काही अनावश्‍यक घटना पण घडून आलेल्या आहेत. ज्यावर हवे तितकेसे लक्ष दिले गेले नाही किंवा त्याबद्दल फारसा विचार पण केलेला नाही. नवीन तंत्रज्ञान आहे म्हणून ते छानच आणि उपयोगी असणार असाच सर्वस्वी समज होऊन बसलेला आहे. कदाचित तंत्रज्ञानाने मानवजातीचा आणि एकंदर जीवसृष्टीचा जितका नफा नसेल झाला त्यापेक्षा अधिक तोटाच जास्त झालेला दिसत आहे. जेव्हा एखाद्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण समाजात करत असतो तेव्हा ते फक्त एक तंत्रज्ञानाच्या प्रगतीतील एक नवे पाऊल किंवा एक मैलाचा दगड असा नसून त्यामुळे समाजात पण विविध आर्थिक, सामाजिक, भौगोलिक आणि वैयक्तिक बदल घडून येतात. पण, हे सर्व खटाटोप करत असताना आपण निसर्गाचे आणि जैवविविधतेचे नियम तोडत आहोत का हे पाहणे अनिवार्य आहे. कारण याने मानवाच्या आणि एकूणच संपूर्ण जीवसृष्टीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. तंत्रज्ञानाने बहुतेकदा अनुलंब वाढ (Vertical Growth) होत असते ज्यात समाजातील मोजक्‍याचा लोकांना फायदा होत असतो. भारतात आता बऱ्याच छोट्या-मोठ्या शहरात मेट्रो चा गाजावाजा सुरू आहे. हायपरलूप रेल्वेने (Hyperloop) मोठी औद्योगिक शहरे जोडण्याचा प्रस्ताव मांडला जात आहे ज्यात तब्बल ताशी 1000 किलोमीटर या वेगाने रेल्वे धावतील. पण, खरंच अशा अतिखर्चिक आणि भरपूर ऊर्जा लागणाऱ्या तंत्रज्ञानाची गरज आपल्याला आहे काय? त्यांचा एकंदर कार्बन पदचिन्ह(Carbon Footprint)किती असणार? त्यांना लागणारी प्रचंड ऊर्जा ही परत 8-10 गावांतील लोकांच्या जिवावरील कोळशातून निर्माण होईल का? होणार असेल तर त्या गावातील लोकांना स्थलांतर करण्यासाठी किती खर्च येईल? पर्यावरणाची किती हानी होईल आणि त्याची किंमत कोण मोजणार? वगैरे वगैरे. यासारखे बरेच प्रश्न आहेत जे कुठल्याही नवीन तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीच्या आधी स्वत:ला आणि समाजाला विचारायला हवे.
भारतासारख्या देशात जिथे बेरोजगारीने धुमाकूळ घातला आहे तिथे बहुतांश लोकांचे मानवी कष्ट जितके जास्त उपयोगात आणता येईल तितके चांगले. ना की एक यंत्र वापरून जे 10 लोकांचे काम कमी करेल. त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा नवीन तंत्रज्ञानानेच सुटतो हा शुद्ध मूर्खपणा आहे. मी स्वतः बऱ्याच युवकांच्या उपक्रमाचा (Start Up, समाजकार्य) भाग असल्याने तंत्रज्ञानाची वर्गवारी खूप जवळून पाहता आली. एखादे तंत्रज्ञान आधारित स्टार्ट अप (Start Up) असेल तर त्याला नेहमीच अवाजवी डोक्‍यावर घेतले जाते. मग त्याची समाजातील कुठलेही प्रश्न सोडविण्याची क्षमता कमी असली तरीही. बऱ्याचदा एखादा प्रश्न सोडवणे हा मुख्य हेतू बाजूला राहून त्याला तंत्रज्ञानानेच कसं सोडवता येईल हाच आग्रह होऊन बसतो.
त्यामुळे तंत्रज्ञान आणि ज्ञान याची सांगड घालून सामाजिक, आर्थिक, वैयक्तिक आणि इतर विविध बाबींचा विचार करूनच तंत्रज्ञानाचा उपयोग व्हायला पाहिजे नाहीतर हिरोशिमा-नागासाकी, चेर्नोबेल, फुकुशिमा, बीटी कापूस, कृत्रिम बुद्धिमत्तेने रचलेल्या नवीन भाषेतील संभाषण यांची निरुपयोगी अटळ पुनरावृत्ती होत राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com