esakal | 1917 एक हलवून टाकणारा प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

‘१९१७’ चित्रपटातलं एक दृश्य.

‘१९१७’ हा चित्रपट म्हणजे रूढार्थानं युद्धपट नाही. प्रत्यक्ष युद्ध तो नाहीच दाखवत. तो युद्ध किती वाईट असतं हे दाखवतो, युद्धामुळं मरण किती स्वस्त होतं हे दाखवतो, त्याचे पडसाद कुठपर्यंत जाऊ शकतात हेही दाखवतो; पण हे सगळं बॅकग्राऊंडवर. तो त्याची तुम्हाला जाणीव करून देतो. फोरग्राऊंडवर मात्र तो दाखवतो एक कथा. थ्रिलर. हा थ्रिलर भन्नाट आहे. त्यात आशा आहे, निराशा आहे, वेदना आहे, नात्यांची गुंफण आहे आणि विलक्षण थरार आहे. हा थरार आणखी गडद होतो तो हा थरार ‘रिअल टाइम’मध्ये दाखवल्यामुळं. सॅम मेंडिस या दिग्दर्शकानं संपूर्ण चित्रपट एकच शॉट असल्यासारखा मांडलाय. त्यामुळं तो थरार आणखी गडद होतो.

1917 एक हलवून टाकणारा प्रवास

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

‘१९१७’ हा चित्रपट म्हणजे रूढार्थानं युद्धपट नाही. प्रत्यक्ष युद्ध तो नाहीच दाखवत. तो युद्ध किती वाईट असतं हे दाखवतो, युद्धामुळं मरण किती स्वस्त होतं हे दाखवतो, त्याचे पडसाद कुठपर्यंत जाऊ शकतात हेही दाखवतो; पण हे सगळं बॅकग्राऊंडवर. तो त्याची तुम्हाला जाणीव करून देतो. फोरग्राऊंडवर मात्र तो दाखवतो एक कथा. थ्रिलर. हा थ्रिलर भन्नाट आहे. त्यात आशा आहे, निराशा आहे, वेदना आहे, नात्यांची गुंफण आहे आणि विलक्षण थरार आहे. हा थरार आणखी गडद होतो तो हा थरार ‘रिअल टाइम’मध्ये दाखवल्यामुळं. सॅम मेंडिस या दिग्दर्शकानं संपूर्ण चित्रपट एकच शॉट असल्यासारखा मांडलाय. त्यामुळं तो थरार आणखी गडद होतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पहिल्या महायुद्धादरम्यान जर्मन आणि ब्रिटिश फौजांमध्ये फ्रेंच भूमीवर युद्ध सुरू आहे. एका भागातल्या ब्रिटिश तुकडीला दुसऱ्या एका कोपऱ्यातल्या ब्रिटिश तुकडीला निरोप द्यायचा आहे. ‘तुम्ही ज्या आक्रमणाची तयारी केली आहे, ते आक्रमण म्हणजे जर्मनांनी रचलेल्या सापळ्यात जाणं आहे,’ असं सांगायचं आहे. मात्र, जर्मन फौजांनी नेमक्या टेलिफोन लाइन्स कापल्या आहेत. या दोन तुकड्यांच्या मध्ये जर्मनव्याप्त प्रदेश आहे. पहिल्या तुकडीतल्या दोन सैनिकांना नो-मॅन्स लॅंडपलीकडं जाऊन त्या कोपऱ्यातल्या ब्रिटिश तुकडीला निरोप द्यायचा आहे. त्यातल्या एका सैनिकाचा भाऊ दुसऱ्या तुकडीत असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेमकं हेरलं आहेच. मधल्या भागातल्या जर्मन फौजा तिथून निघून गेल्या आहेत अशी त्यांची माहिती आहे. हा निरोप पोचवण्याचा विलक्षण थरारक, रोमांचक आणि तितकाच वेदनादायी; पण आशेचे किरणही असलेला प्रवास म्हणजे ‘१९१७’. 

दिग्दर्शक सॅम मेंडिस थेट विषयाला हात घालतो. अगदी पहिल्या फ्रेममध्ये तो अतिशय सुंदर फुलं दाखवतो आणि तिथंच पुढं काही तरी विरोधाभासी दिसणार हे जाणवतंच. कॅमेरा हळूहळू मागं जात दिसतात ते आपल्या चित्रपटाचे दोन नायक टॉम ब्लेक आणि विल्यम स्कोफिल्ड. त्यांना वरिष्ठांकडं जायचा निरोप मिळतो आणि हळूहळू किती तरी सैनिक दिसायला लागतात. कॅमेरा मग या दोघांचा पाठलाग करायला लागतो.

घोड्यांच्या, माणसांच्या मृतदेहांमधून, गोळीबारातून, चिखलातून, खंदकांतून. जणू प्रेक्षकच टॉम आणि विल्यम यांच्याबरोबर आहेत असं वाटण्याइतका हा प्रवास जिवंत आहे. 

नो-मॅन्स लँडमध्ये दिसणारे घोड्यांचे आणि नंतरचे माणसांचे मृतदेह, जर्मन बंकरमध्ये होणारा स्फोट, टॉम आणि विल्यमकडं झेपावणारं विमान हे भाग जबरदस्त आहेत. जर्मन बंकरमध्ये दिसणारं मुलगी आणि आई यांचं छायाचित्र किंवा ‘त्यांचे उंदीरही आपल्यापेक्षा मोठे आहेत,’ हे टॉमचं वाक्य असं लेखक-दिग्दर्शकाचं अस्तित्व ठायी ठायी दिसतं. विशेषतः मध्यंतरानंतर फ्रान्समधल्या त्या शहरातल्या संपूर्ण विध्वंस झालेल्या भागातून जाणारा विल्यम, त्या वेळी वरून फ्लेअरचा म्हणजे एक प्रकारच्या फटाक्यांचा येणारा प्रकाश, विलक्षण संगीत आणि त्या दृश्याच्या शेवटी समोर आगीच्या ज्वाळांमध्ये वेढलेली इमारत हा संपूर्ण शॉट अतिशय अंगावर येतो. एका इमारतीच्या तळघरात असलेली एक मुलगी आणि छोटं बाळ हा भाग दाखवून दिग्दर्शक संपूर्ण कथेला एक मुलायम असं अस्तर देतो. शेवटचा आक्रमणाच्या तयारीचा भागही फार जबरदस्त. अंगावर रोमांच उभे राहणं म्हणजे काय हे दाखवणारा हा प्रसंग. एका फोटोच्या मागं दिसणारी ‘कम बॅक’ ही अक्षरं संपूर्ण युद्धाची शोकांतिकाच ठळक करतात. 

हा संपूर्ण चित्रपट दिग्दर्शकाला रिअल टाइममध्ये दाखवायचा होता. त्यातून थरार वाढेल, पुढच्या क्षणी काय होईल याची उत्कंठा वाढेल असं त्याला वाटत होतं, म्हणूनच त्यानं संपूर्ण चित्रपट एका शॉटमध्ये असल्यासारखा चित्रित केलाय. अर्थातच तो एक शॉट नाहीच; पण हे तुकडे कुठं जोडलेत हे अजिबात कळत नाही, इतकं त्याचं छायाचित्रण, स्पेशल इफेक्ट्स दाद देण्यासारखे आहेत. अनेक ठिकाणी कॅमेरा कुठून कशा प्रकारे प्रवास करतो याचा विचार करताना डोकं चक्रावून जातं. काही तासांचा हा प्रवास आहे, मात्र दिग्दर्शक किती तरी स्थळं दाखवतो; दिवसाचे, रात्रीचे किती तरी प्रकार दाखवतो. त्यामुळं दृश्यात्मकता वाढतेच. विशेषतः ‘सोर्स ऑफ लाइट’चा अतिशय बारकाईनं केलेला विचार हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. तळघरातल्या प्रसंगात, फ्लेअरचा प्रकाश येणाऱ्या प्रसंगात, बंकरमध्ये अशा अनेक ठिकाणी त्याचा वापर आणि विचार कसा केला आहे ते अभ्यासण्यासारखं आहे. 

जॉर्ज मॅक्‌के आणि डीन चार्ल्स-चॅपमन या दोन मुख्य नायकांबरोबर सगळ्यांचेच अभिनय फार उल्लेखनीय आहेत. विशेषतः सैनिकांची भूमिका करणारे हजारो ज्युनिअर आर्टिस्ट यांच्याबद्दल हॅट्स ऑफ. कुणीही अभिनय करत आहे असं वाटतंच नाही, इतकी प्रचंड मेहनत या कलाकारांनी आणि कॅमेऱ्यामागच्या मंडळींनीही केली आहे. चित्रपटाचे संगीतदिग्दर्शक थॉमस न्यूमन यांच्या कामगिरीबद्दल बोलल्याशिवाय चित्रपटाचं वर्णन पुरं होऊच शकणार नाही. न्यूमन यांनी वेगवेगळे संगीत-तुकडे तयार केले आहेत आणि ते विलक्षण प्रभावी आहेत. अनेक ठिकाणी ते हळूहळू आवाजांची आणि वाद्यांची संख्या वाढवत नेतात आणि विशिष्ट ठिकाणी हा वाद्यमेळ बंद करतात, ते दाद देण्यासारखं. छायाचित्रण, लेखन, कलादिग्दर्शन, अभिनय अशा सगळ्याच गोष्टींमध्ये हा चित्रपट ‘ए-क्लास’ आहे. 

किंचित काही त्रुटीही आहेत. इतके मृतदेह अवतीभोवती असताना सैनिकांच्या देहबोलीत काहीच जाणवत नाही हे खटकतं. सैनिक असले तरी ते अमानवी नाहीत ना. नदीतल्या प्रसंगात दिसणारे मृतदेहही कृत्रिम वाटतात आणि एका प्रसंगात विल्यम इतर सैनिकांच्यात बसतो तेव्हा त्यांना त्याची जाणीवही होत नाही हेही आश्चर्याचं वाटतं. अर्थात या अतिशय सूक्ष्म त्रुटी आहेत. बाकी, संपूर्ण चित्रपट जबरदस्त आहे. तो तुम्हाला सोडत नाही. तो तुम्हाला हलवून टाकतो, खिळवून टाकतो, हेलावून टाकतो. ‘पडद्यावरचा एक्सलन्स’ म्हणजे काय असा प्रश्न कुणी विचारला तर याचं एक उत्तर आपल्याकडे नक्की आहे...‘१९१७’!!

loading image