मनाप्रमाणेच शरीरांचं मिलनही सुखकारक करायचंय?; वाचा आवर्जून

Article about first night of marriage
Article about first night of marriage

आपल्या देशात अनेक सोहळे साजरे केले जातात. सगळ्यात उत्साहाने साजरा केलेला सोहळा म्हणजे लग्न सोहळा! अत्यंत जोशात व धामधुमीत लग्नाचे हे विधी साजरे केले जातात. जन्मोजन्मीच्या गाठी बांधताना नवदांपत्याना अनेक सल्ले दिले जातात. कसे उठायचे, बसायचे, कपडे कसे घालायचे, मोठ्यांचा सन्मान कसा करायचा, लहानग्यांना प्रेम कसे द्यायचे, हे अतिशय सविस्तरपणे सांगितले जाते. एकंदरीतच जगण्याच्या, वागण्याच्या सर्व सूचना घरच्यांकडून या नवविवाहित जोडप्याला दिल्या जातात. 

पण केवळ मनांचे मिलन नव्हे तर दोन शरीरांचे मिलन होणे, हा लग्नाचा पाया आहे. हे शरीरांचे मिलन आनंददायी, सुखकारक व समाधानकारक कसे करायचे, याबद्दल मात्र कोणीच सांगत नाही. लग्न झाल्यावर हे आपोआप समजेल, असे गृहीत धरले जाते. मग अंधारात धडपडत अनेक चुका करत, नवविवाहित जोडप्याचा हा शरीरांच्या मिलनाचा प्रवास सुरू होतो. मार्गदर्शन करायला कोणी नाही, सल्ला मागायला कोणी नाही, आपण करतोय ते बरोबर आहे की चूक, हे सांगायलादेखील कोणी नाही. अशाने या जोडप्यांच्या लैंगिक सहजीवनात अडचणी, गैरसमजुती आणि अनेक वेळेला वाद-विवाद व्हायला लागतात. 

हीच गोष्ट राहुल व कविताच्या बाबतीत झाली. दोघेही उच्चशिक्षित, कॉम्प्युटर इंजिनिअर. मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या हुद्यावर कार्यरत होते. एकमेकांना सर्वार्थाने अनुरूप असल्यामुळे यांचे लग्न यशस्वी होणारच याबद्दल कोणाच्याच मनात दुमत नव्हते; परंतु लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच दोघांमध्ये धुसफुस सुरू झाली. दोघांनाही लैंगिक सहजीवनाविषयीची माहिती इंटरनेटवरील व्हिडिओ बघून, पुस्तके वाचून झाली होती. आपल्याला सर्व क्रिया व्यवस्थित जमतील, या गैरसमजुतीतून त्यांचे लैंगिक सहजीवन सुरू झाले; परंतु सिद्धांत आणि प्रत्यक्ष क्रिया यामधील फरक पहिल्याच रात्री त्यांच्या लक्षात आला. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे लैंगिक क्रिया झालीच नाही. त्यातूनच मग एकमेकांविषयीच्या गैरसमजुती सुरू झाल्या. लैंगिक सहजीवन यशस्वी न झाल्याने दोघेही एकमेकांना दोष देऊ लागले. हा लैंगिक असंतोष त्यांच्या इतर जीवनावरदेखील परिणाम करायला लागला. 

परिणामी, हे बेडरूममधील वाद हॉलपर्यंत आले आणि दोघेही एकमेकांची उणीदुणी काढू लागली. दोघांच्या घरच्यांनीदेखील वादाचे मूळ कारण न शोधता एकमेकांच्यावर आरोप-प्रत्यारोप चालू केले. ही अटीतटीची भांडणे नंतर पोलिस केस कोर्टातील केस यामध्ये रूपांतरित झाली. 
माझ्या एका स्नेह्यांमुळे हे दोघेही माझ्याकडे लग्नानंतर अडीच वर्षांनी समुपदेशनासाठी आले. राहुल व कविताशी वेगवेगळे बोलल्यावर हे लक्षात आले की, दोघांमधील वादाचे मूळ कारण त्यांच्यातील लैंगिक विसंवाद आहे. मतभेदांची इतर कारणे विसरायला व जमवून घ्यायला दोघेही सहज तयार झाली. 

त्यांच्या लैंगिक सहजीवनात डोकावल्यावर या क्रियेविषयीचे त्यांचे अज्ञान ठळकपणे सामोरे आले. लग्नाच्या पहिल्या काही दिवसांत योग्य शारीरिक संबंध न आल्यामुळे दोघेही हतबल झाले होते. आपल्याला जमत नाही, जमणारच नाही, ही भावना प्रबळ झाल्यामुळे दोघांनीही प्रयत्नच सोडून दिले होते. अडीच वर्षांच्या लग्नाच्या कालावधीत जेमतेम आठ ते दहा वेळेला त्यांनी लैंगिक क्रिया करायचा प्रयत्न केला होता. 

कुठलीही नवीन गोष्ट शिकायला वेळ लागतो. एकाच दिवसात ती आत्मसात करता येत नाही. पाण्यामध्ये पोहायचे कसे, हे पुस्तक वाचून समजत नाही. त्यासाठी पाण्यात उडी मारायलाच लागते. त्याचप्रमाणे लैंगिक क्रिया ही पहिल्या काही दिवसात व्यवस्थितपणे येत नाही. स्त्रीचा योनीमार्ग लहान असतो, योग्य प्रकारे संबंध कसे ठेवायचे याचे ज्ञान नसते. त्यामुळे योग्य लैंगिक क्रिया घडायला काही दिवसांचा अवधी द्यावा लागतो. प्रयत्नच केला नाही तर ही क्रिया कधीच पूर्ण होत नाही. समुपदेशनाद्वारे ही गोष्ट राहुल व कविताच्या मनावर बिंबवली गेली. योग्य संबंध कसे ठेवायचे, काय उपाय करायचे, वेगवेगळी आसने या विषयाची सखोल माहिती त्यांना समुपदेशनाद्वारे दिली गेली. 

सहजीवनाविषयीच्या गैरसमजुतींचा पगडा त्यांच्या मनावरून काढला गेला. धीर धरून, संयमाने व आपल्या जोडीदाराला बरोबर घेऊन लैंगिक समाधान कसे मिळवायचे, याविषयी त्यांना सांगितले गेले. या समुपदेशनानंतर दोघांनीही आपली पहिली मधुचंद्राची रात्र जल्लोषात साजरी केली. या आनंदोत्सवात त्यांच्यामध्ये असलेले इतर मतभेद आपोआपच गळून पडले. 
आपल्या जोडीदाराला कुठे स्पर्श केलेला आवडतो, कुठे आवडत नाही, हे जाणले पाहिजे. हे जाणताना आपल्या जोडीदाराला हळुवारपणे, नाजूकपणे आणि समजूतदारपणे हाताळले पाहिजे. हे तिन्ही "पण' आपण पाळल्यास नक्कीच आपल्या वैवाहिक जीवनातील मधुचंद्राची रात्र कधी संपणारच नाही. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com