ये प्रोसेस का जादू है मितवा !

फिल्म मेकिंगचं आणि स्वयंपाकाचं तसं सारखंच असतं. प्री-प्रॉडक्शन, प्रॉडक्शन आणि पोस्ट प्रॉडक्शन... फिल्मची कन्स्पेट सुचण्यापासून तिची गोष्ट होईपर्यंत वगैरे वगैरे... सेम स्वयंपाकाचं. आज आपण हे बनवूपासून, घरात अमुक तमुक जिन्नस आहेत त्याचं हे होऊ शकतं हे ठरवणं, पूर्वतयारी करणं वगैरे वगैरे.
ये प्रोसेस का जादू है मितवा !
ये प्रोसेस का जादू है मितवा !sakal

फिल्म मेकिंगचं आणि स्वयंपाकाचं तसं सारखंच असतं. प्री-प्रॉडक्शन, प्रॉडक्शन आणि पोस्ट प्रॉडक्शन... फिल्मची कन्स्पेट सुचण्यापासून तिची गोष्ट होईपर्यंत वगैरे वगैरे... सेम स्वयंपाकाचं. आज आपण हे बनवूपासून, घरात अमुक तमुक जिन्नस आहेत त्याचं हे होऊ शकतं हे ठरवणं, पूर्वतयारी करणं वगैरे वगैरे. दोन्ही ठिकाणी कमाल कॉन्सन्ट्रेशन, नियोजन आणि चिकाटी लागते.

तुम्ही म्हणाल, स्वयंपाक ही नित्यनियमाने घराघरात होत राहणारी गोष्ट. त्यात फिल्म मेकिंगचा काय संबंध; पण स्वयंपाकाच्या एकूण प्रक्रियेतही फिल्ममध्ये असतो तसा ड्रामा असतोच. दोन्ही प्रोसेस म्हणून एवढ्या समांतर असतात, की त्यातला व्यवहार आणि तंत्र दोन्ही गोष्टी बाजूला ठेवून इतर बारीक बारीक गोष्टींतला सारखेपणा थक्क करून सोडतो. नियोजन गंडलं, की खेळ खल्लास.

म्हणूनच मी स्वयंपाक आणि फिल्म मेकिंग एकमेकांशी असं विविध पातळ्यांवर कनेक्ट करत राहते आणि त्यांचा तयारीतला सहसंबंध जोडायला मला आवडतं. फिल्म मेकिंग, स्वयंपाक, नाती या सगळ्यांविषयीची एकमेकांना जोडणारी निरीक्षणं मला नोंदवायला आवडतात. फिल्म तयार करणं, रांधणं आणि नातं जोडून ठेवणं या तिघांसाठी जबाबदारी घेण्याची तयारी लागते. ही तयारी तुम्ही जे करणार आहात त्याची तर असतेच; पण तुमच्या स्वतःचीही असते. कॅरेक्टरमध्ये शिरणं असतं, त्या त्या रोलचा पवित्रा घेणं असतं... तुम्ही घरसखीची कामं करणाऱ्या काकू, मावशी, आजी पाहिल्यात का?

त्या तुमच्या घरी येतात तेव्हा कशाही येत नाहीत. तयारी करूनच आलेल्या असतात. आमची तारा आजी फक्त झाडू, लादी करायची; पण तिच्या लुगड्याचा काष्टा, जराही पोटऱ्या दिसणार नाहीत अशी नेसलेली नऊवार साडी, मॅचिंग ब्लाऊज, डोक्याचा अंबाडा, त्यात फूल आणि तिची तेल-फुलाची भाजी... एकटीसाठी तर करायचंय म्हणून कधीच तिने स्वतःच्या खाण्या-पिण्याची आबाळ केलेली मी पाहिली नाही किंवा माझं कोण आहे या जगात, मला कोण पाहतंय म्हणून तिच्या दिसण्यात कधीच कॅज्युअल ॲप्रोच मला सापडला नाही. एकूणच तुम्ही झकपक ऑफिसमध्ये जा, नाहीतर त्या ऑफिसवाल्यांच्या घरी घरसखी म्हणून; तुम्ही ड्युटीवर असता, तुम्ही चांगलंचं राहिलं पाहिजे, तयारीनिशी गेलं पाहिजे, ही गोष्ट तारा आजी आणि इतर अनेकींच्या मी केलेल्या निरीक्षणातून मला समजली आणि मी ती फॉलो करायला लागले. ही तीच तयारी आहे ज्याला फिल्म मेकिंग करत असताना सेट लावणं म्हणतात आणि सगळं आटोपून जी आवराआवर होतं तिला पॅकअप करणं...

या दोन्ही फिल्म मेकिंगच्या गोष्टी स्वयंपाकातही सापडल्या. कलर पॅलेट दिसू लागली, जेवणाचा मूड दिसू लागला. असं खूप काय काय सापडत गेलं आणि जातंय. एका सुप्रसिद्ध हॉलिवूड फिल्मचा डायलॉग आहे. फिल्म मेकिंगला स्वयंपाक करणं किंवा शिजवणं हा एकच पर्याय आहे आणि असू शकतो. माझाही यावरचा विश्वास आपोआप दृढ होऊ लागला. हा एक ॲप्रोच असला तरी मला स्वतःहून स्वतःसाठी किंवा स्वतः बनवलेला स्वयंपाक स्वतः खाणं हा निहिलीझम अर्थात शून्यवादाच्या जवळ जाणाराही वाटतो. म्हणजे आपण सगळं छान निगुतीने बनवावं, ताट सजवावं आणि अरबट-चरबट चावून उद्‍ध्वस्त करून टाकावं, हे मला शुद्ध निहिलिस्ट असणाऱ्याचं वागणं वाटतं.

आता हे स्वयंपाकाच्या सिनेमातले पोस्ट प्रॉडक्शनचे भाग आहेत खरं तर; पण इथे एक गंमत आहे. तुम्ही फिल्म कशी डिस्प्ले करता आणि तुम्ही जेवण कसं वाढता, या दोन्ही गोष्टीही बऱ्याच प्रमाणात सारख्या आहेत आणि त्यात अनेक परिवर्तन आणि कॉम्बिनेशन करता येण्याची मुभा आहे, सक्ती नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टी अधिक फुलू शकतात, देखण्या होऊ शकतात आणि हेच नात्यांनाही लागू पडतं.

घरच्यांचा विरोध पत्करून केलेल्या लव्ह मॅरेजची गोष्ट सांगताना एकदा मित्र म्हणाला, नवा संसार थाटताना त्या जोडप्याने अमुक-तमुक सामान घेतलं, किचनच्या सगळ्या वस्तू घेतल्या; पण ताट, वाटी आणि चमचा मात्र एकच घेतला. मी तेव्हा चटकन म्हटलं होतं, याला काय अर्थ आहे! त्यांच्या घरी पाहुणे जाणार नाहीत का? ताट-वाट्या जास्त घ्यायला हव्या होत्या त्यांनी. आता त्या जोडप्याची गोष्ट पाहता नजीकच्या काळात आणि ते परराज्यात जाणार असल्याने त्यांच्या घरी खरंच कुणी जाणार नव्हतं आणि ती दोघंही सतत सोबत एकाच घरात राहणार नसून कामानिमित्त दोन वेगळ्या शहरांत राहणार होते. त्यामुळे एकच ताट-वाटी वापरणं ही कसली रोमँटिक गोष्ट आहे.

ते नेहमी सोबत नसणार म्हणून मग जेव्हा एकत्र असतील तेव्हा त्या एकेका ताट-वाटीमुळे एकत्रच जेवतील, असं माझ्या मित्राचं म्हणणं होतं. मला मात्र हे वैयक्तिकरीत्या तेव्हाही आणि आताही अजिबात रोमँटिक वगैरे नव्हतं वाटलं. कारण मुळातच त्यांनी एकेकांसमोर एकत्र एका ताटात जेवण्यावाचून दुसरा पर्याय ठेवलाच नव्हता. जेव्हा त्यांच्याकडे दहा वेगळ्या ताट-वाट्या असत्या आणि तरी ते सगळे ऑप्शन नाकारून एकत्र जेवले असते तर तिथे रोमँटिसिझम असता. कारण तू हे नाकारलं पाहिजेस, या सक्तीपेक्षा काय काय नाकारून ठरवलेल्या पर्यायावर ठाम राहायचं हा स्टँड घ्यायला जास्त हिंमत लागते.

मला वाटतं, की फिल्म मेकिंग आणि स्वयंपाक यातही हेच असतं. फिल्ममेकर हे जॉब प्रोफेशन नसतं, त्याला नोकरी नसते... घरातली बाई घरात स्वयंपाक करते, स्वयंपाक करणं ही तिची नोकरी नसते; पण सगळे ऑप्शन ओपन ठेवून या दोन्ही गोष्टी माणसं पॅशनने करतात, म्हणून तिथे रोमान्स असतो. प्रोफेशन आणि नातं हे या स्वयंपाक अन् फिल्म मेकिंगमधल्या सहसंबंधासारखं असतं. स्वीकाराची आणि नकाराची सक्ती नसतानाही एकमेकांपासून ठराविक अंतर ठेवून एकमेकांना सतत सोबत करणारं आणि ते तसं व्हावं, राहावं यासाठी काळ, वेळ आणि समज या सगळ्याचा मेळ साधण्याच्या प्रक्रियेतून जावंचं लागतं. तेव्हा कुठे चांगली फिल्म, अप्रतिम अन्न, हेल्दी नातं आणि उत्तम करिअर या गोष्टी साध्य होतात.

vishakhavishwanath11@gmail.com

(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’विजेत्या साहित्यिक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com