प्रिय डॉक्टर, तुम्ही आयुष्यात आल्यानंतरचं आयुष्य...

Narendra-Dabholkar
Narendra-Dabholkar

प्रिय डॉक्टर,

तुम्हाला 74 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! 1 नोव्हेंबर 1945 हा तुमचा जन्मदिवस ! अर्थात यंदाचं तुमचं हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे तुमच्या आजवरच्या आयुष्याचं थोरामोठ्यांकडून सिंहावलोकन होईल, पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील तुमच्याबाबत बोलणं हे अधिक संयुक्तिक होईल. डॉक्टर मी तुमच्याबरोबर अर्थात विवेकवाहिनी, साधना, अंधश्रद्धा निर्मूलन समितीत 9 वर्षे काम केलं. आजही कमीजास्त प्रमाणात आहेच.

मी नववीत असताना विपुल गोसावी या मित्राने मला तुमचं 'ऐसें कैसे झाले भोंदू' हे पुस्तक वाचायला सुचवलं. तोपर्यंत मी तुमचं नावंही ऐकलं नव्हतं. त्याला कारण, ना वर्तमानपत्र वाचायची सवय, ना घरी टीव्ही, ना आजूबाजूला पुरोगामी लोकांचं वर्तुळ, त्यामुळे तुम्ही आणि तुमचं काम त्या वयात मला माहीत नव्हतं, पण तुमचं पुस्तकं वाचून मी भारावून तर गेलोच, पण मला एक दिशा मिळाली. सामाजिक, वैयक्तिक, कौटुंबिक प्रश्नांची उकल कशी करायची आणि त्यावर उपाय काय ? या प्रश्नाभोवती विचार करण्यात मी माझे शालेय दिवस खूप खर्च केलेत. व्यसनाधिता कशी कमी करायची? गरिबीवर उत्तर काय? देवधर्म करून खरंच माणूस सुखी होईल काय? असे प्रश्न मला पडायचे.

या प्रश्नांवर राजकीय उत्तर हे गोलगोल असायचं. या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात मी वारकरी संप्रदाय, धन निरंकार, वामनराव पै, मेधा पाटकर, अण्णा हजारे, ग्राहक संरक्षण समिती, हॅप्पी थॉट्स, मराठा सेवा महासंघ या सगळ्यांच्या आसपास जाऊन आलो, पण यांची उत्तरं माझं समाधान करू शकली नाहीत. डॉक्टर मी तुमचं अंधश्रद्धेबाबत वाचायच्या आधी संत गाडगेबाबा, संत तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या विचारांनी प्रभावित होतोच, पण तुमचं पुस्तकं वाचल्यामुळ मला दिशा मिळाली, म्हणजे काय झालं? तर प्रत्येक घटना, प्रश्न, संकट, समस्या घडते त्याच्यामागे कारण असतं, हा सिद्धांत डॉक्टर मला तुमच्याकडून समजला. पण मी जेव्हा याच प्रश्नांची उकल करण्यासाठी इतरांकडे जायचो, तेव्हा प्रश्न निर्माण कसा होतो आणि त्याच्यावर उत्तर काय किंवा कसं शोधायचं, याबाबत जे सांगितलं जायचं ते अवास्तविक असायचं.

जीवनात दुःख आहे, ते कमी करण्यासाठी नामस्मरण करा, असे काही जण सांगायचे, पण ते मला पटत नव्हतं. तंबाखू, गुटखा खाऊन तोंड सडायला लागले आणि मग नाम उच्चार तरी कसा करायचा आणि नामस्मरण तरी कसं करायचं, हा प्रश्न मला पडायचा. काही संघटना असे सांगायच्या की, समाजात जे काही प्रश्न आहेत, त्यातील बहुतांशी प्रश्न कालच्या आणि आजच्या ब्राह्मणांमुळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे ब्राह्मण्यशाही नष्ट केल्याशिवाय प्रश्न संपणार नाही, पण ही मांडणी मला पटत नव्हती, ती अतार्किक वाटायची. घरातील एखादी व्यक्ती दारू पिते, आम्ही गरीब आहोत, याला ब्राम्हण्यशाही कशी काय जबाबदार, हे मला कधी समजलं नाही, पण डॉक्टर तुम्ही जो सिद्धांत सांगितलात की कार्य घडतं त्याच्या मागे कारण असतं. घटनेमागे कार्यकारणभाव असतो, वैज्ञानिक दृष्टिकोन असतो, हे मात्र मला पटलं.

शालेय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मूल्यशिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य होतच, पण शिक्षक हे मूल्य जेवढे माझ्यावर रुजवू शकले नाही, त्यापेक्षा अधिक आणि व्यवस्थित 'ऐसें कैसे झाले भोंदू' या पुस्तकाने रुजवायचे काम केले. कोणताही प्रश्न असो तो गंडे, नाडे, उदी, भस्म, नशीब, प्रारब्ध, संचित, उपास-तापास, नवस यांनी सुटणार नाहीत ते प्रश्न सोडविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार आणि कृती करावी लागेल, हे पक्के लक्षात आले. त्यामुळे विचारांची आणि जगण्याची दिशाच बदलली. मग तर रडण्या-हसण्यात देखील वैज्ञानिक दृष्टीकोनाचं सूत्र वापरलं, प्रेम की आकर्षण हे समजून घ्यालाही हेच सूत्र वापरलं, सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांची उकल करायला हे सूत्र वापरलंच, पण रोजच्या जगण्यातील सर्व गोष्टींना हे सूत्र लावून, जगणं व्यवस्थित आखून घेतलं. त्यामुळं फायदा हा झाला की सामाजिक पातळीवर कुणाकडून आर्थिक फसवणूक होऊ शकली नाही, स्वतःचे निर्णय स्वतः जास्तीत जास्त अचूक घेण्याची क्षमता निर्माण झाली. अंधश्रद्धेच्या आहारी न गेल्याने पैशाची, वेळेची बरबादी झाली नाहीच, पण कुणा बुवाबाबा, धर्मांध पुढाऱ्यांचे मानसिक गुलाम झालो नाही, हाच दृष्टिकोन कुटुंबात झिरपला. एकंदरीत कुटुंबाची वाटचाल योग्य दिशेने सुरू राहिली. 

डॉक्टर एक सूत्र जर सापडलं तर काय काय घडतं, याचं हे उदाहरण आहे. तुम्हाला पुरेपूर माहीत होतं की, लोकांनी नक्की कसा विचार केला, तर त्यांचे प्रश्न लवकर सुटतील, म्हणून तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन ते विवेकवाद अशी मांडणी करता. डॉक्टर तुम्ही मला अधिक समजलात ते प्रा. सुभाष वाघमारे यांच्यामुळे. मी ज्या आण्णासाहेब आवटे कॉलेजला (मंचर) शिकलो, तेथे वाघमारे सर प्राध्यापक होते. येथूनच विवेक वाहिनीचं काम सुरू झालं. मग मला तुम्ही भेटलात. आयुकाच्या शिनोली केंद्राला भेट द्यायला तुम्ही आला होतात.

आपली पहिली भेट घोडेगावला झाली. नुकताच श्याम मानव यांच्यावर हल्ला झाल्यानंतर तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी वादग्रस्त विधान केले होते, त्यांच्याशी मी जो वादविवादाचा पत्रव्यवहार केला होता, तो मी तुम्हाला दाखवला. तेव्हा मी कॉलेजला होतो, पण माझी तडफ पाहून तुम्ही मला गुड अशी शाबासकी दिली होती. यानंतर तर मी विवेकवाहिनीच काम खूपच जोमाने करू लागलो. आवटे कॉलेजला काम केलंच, पण डॉक्टर आपण मोहोळ, सातारा, पुणे येथे शिबीरं, परिषदा घेतल्या. विवेक वाहिनीच्या वाढीसाठी तासन्तास बैठका घेतल्या. हमीद देखील या कामात सहभागी झाला. कामाचा विस्तार झाला. अनेक विवेकी तरुण तयार झाले. पण काही मर्यादांमुळे काम पुढं गेलं नाही. यावर देखील डॉक्टर आपण खूप चिंतन केलं. पण काही मर्यादा नाही ओलांडता आल्या. 

माझे कॉलेज झाल्यावर मला पत्रकारितेत करिअर करायचं होतं,  म्हणून मी पत्रकरितेच्या शिक्षणासाठी पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. मला नोकरी करून शिक्षण करायचं होतं, म्हणून तुम्ही मला साधनेत काम दिलं. मग शिक्षण, साधना, अंनिस, विवेकवाहिनी असं काम सुरू झालं. मग तर डॉक्टर आपली आठवड्यातून एकदा भेट व्हायला लागली. आनंद भोजनालयात जेवायलाही एकत्र असायचो. तुमचं काम जवळून पाहता आलं. तुमच्या बारीकसारीक गोष्टी मी टिपत गेलो, प्रतिप्रश्न करत राहिलो. सोमवारच्या अंनिसच्या मीटिंगमध्ये ठरवू, आम्ही काहीजण तुम्हाला अडवळणाचे प्रश्न विचारायचो. यातून खूप काही शिकत गेलो. 

डॉक्टर तुम्ही केेवळ कार्यकर्ता कधीच नव्हता, तुम्ही लेखक आहात, संयोजक आहात, तुम्ही व्यवस्थापक आहात, संघटक आहात, वक्ते आहात, तसेच तुम्ही वैचारिक संगोपन करणारे पालकदेखील आहात.  

डॉक्टर अजून तुमच्याबद्दल खूप लिहिता येईल, पण येथे थांबतो.

तुमचा
'काय रे विशाल'
1/11/2019

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com