ऑन एअर : सोडवू विचारांचा गुंता

ऑन एअर : सोडवू विचारांचा गुंता

आपण स्वतःला रॅशनल म्हणवत असलो, तरी आपण प्रत्येक वेळी लॉजिक आणि रॅशनॅलिटी वापरतो असं नाही. ९९ टक्के वेळ आपण ऑटोपायलटवर जगात असतो. सकाळी तयार होणं, नाश्ता करणं, कॉलेज किंवा कामावर जाणं, संध्याकाळी घरी कुठल्या मार्गानं यायचं, घरच्यांशी कसं वागायचं वगैरे गोष्टींबद्दल आपण विशेष विचार करत नाही. आहेत ती गृहितकं वापरतो, मेंटल शॉर्टकट्स वापरतो, अंगवळणी पडलेल्या सवयी वापरतो. कारण प्रत्येक कृती ही विचार करून करायला लागलो, तर मानसिक लकवा बसायची वेळ येईल.

उदाहरणार्थ, सकाळी उठल्याउठल्या दात घासायची आपली सवय. (अजून कायम आहे ना? मास्कमागे आज-काल काय दडलंय सांगता येत नाही म्हणून विचारलं). हा विधी ऑटोमॅटिक नसता, तर सकाळ खूप वाईट गेली असती. ‘आधी ब्रश हातात घेऊ का टूथपेस्टचं झाकण उघडू? ते झाकण खाली ठेवू का दुसऱ्या हातात धरू? खाली म्हणजे कुठे? आतल्या भागावर ठेवू की बाहेरच्या? दात घासायची खरंच गरज आहे का?....’ अशा असंख्य बाबींवर रोज मनातल्या मनात चर्चा करायला लागलो, तर कोणीच सकाळी बिछाना सोडणार नाही. म्हणून सवयी, मेंटल शॉर्टकट्‍सचं महत्त्व. आणि ते तयार कसे होतात? अनेक प्रक्रिया आहेत. त्यातील एक म्हणजे पालकांची शिकवण. डेंटिस्ट, बालरोगतज्ज्ञ यांच्याकडून पालकांना किंवा पालकांच्या पालकांना आणि मग पालकांकडून आपल्याकडे अशी विश्वासाची शृंखला तयार झाली आणि जाहिरातींद्वारा ती अधिक पक्की बनत गेली, की आपल्याला पुनःपुन्हा विचार करावा लागत नाही. (पालकांचेही खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात; पण त्यावर पुढच्या वेळी बोलू!) मात्र, दैनंदिन आणि सोप्या गोष्टी सोडल्या आणि महत्त्वाच्या आणि गुंतागुंतीच्या विषयांकडे आपण वळलो, की मेंटल शॉर्टकट्स फसतात. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतीय माणूस म्हटलं की काय चित्र उभ राहतं तुमच्या डोळ्यांसमोर? आपल्या जातीचा माणूस म्हटलं की? दुसऱ्या धर्माचा? आपलं कुटुंब म्हटलं, की काय भावना मनात येतात? भारतीय कुटुंब म्हटलं की? (Cheating करू नका, खरंच डोळे मिटून विचार करा!) 

चिनी किंवा पाकिस्तानी माणूस म्हटलं की? चित्र बदललं ना? भावनादेखील? 
पाकिस्तानी माणूस? अमेरिकन माणूस? पाकिस्तानी, अमेरिकन कुटुंबं?
चिनी किंवा पाकिस्तानी माणूस म्हटलं, की जे चित्र समोर उभं होतं ते भारतीय माणूस यापेक्षा खूप वेगळं असतं. ‘आपली माणसं’साठी डोक्यात आयमॅक्सचं थ्री-डी थिएटर तयार होतं; पण चिनी आणि पाकिस्तानी मात्र ऑईल पेंटिंगसारखे स्थिर आणि स्तब्ध दिसतात. 

वडीलधारी मंडळींबद्दल आदर आणि प्रेम हे फक्त भारतीय संस्कृतीत आहे, अमेरिका आणि युरोपमध्ये नाही असा आपला एक समज आहे. तिकडे म्हणे ‘मुलं मोठ्यांचा आदर करत नाहीत. पालकसुद्धा अठराव्या वर्षी मुलांना घरातून हाकलून देतात. आपल्यासारखं प्रेम, ममता, बंधुता, आदर वगैरे त्यांना माहीत नाही, कारण आपली संस्कृती प्राचीन आणि श्रेष्ठ आहे, त्यांना बिचाऱ्यांना तेवढा इतिहासच नाही; पण  ठीक आहे, एकदा का आपण महासत्ता झालो, की ‘विश्व-गुरू’ या नात्यानं आपण त्यांना हे सगळं शिकवू...!’ मात्र, प्रत्यक्ष अमेरिकन वाङ्‍मय वाचल्यावर, तिथे गेल्यावर, तिथल्या लोकांशी मैत्री केल्यावर आपल्या असं लक्षात येतं, की सत्य वेगळंच आहे. त्यांचा स्वावलंबनावर जास्त जोर आहे; पण तिथेही आपल्यासारखीच कुटुंबपद्धती आहे. आई आणि मुलाचं नातं प्राण्यांमध्येही असतं; मग पाश्चात्य देशांत नसेल, असं आपल्याला का वाटावं?

गुंतागुंतीचे विषय - राजकारण, समाजकारण, संस्कृती, धर्म वगैरे या मुद्यांवर अर्ध्या झोपेत जुन्या पेस्टने चूळ भरून चालणार नाही. जुन्या पिढीचं म्हणणं बरोबर आहे का चूक हे पडताळून बघावं लागेल. नाहीतर दात शाबूत राहतील; मात्र मेंदूला कीड लागेल!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com