चली, चली रे पतंग...

अरविंद रेणापूरकर
रविवार, 12 जानेवारी 2020

चली चली रे पतंग मेरी, चली चली रे, बादलो के पार चले डोर पे सवार, सारी दुनिया ये देख देख जली रे...हे भाभी (१९५७) चित्रपटातील गीत आजही तितकेच लोकांच्या तोंडी आहे. कारण पतंगाची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. पिढ्या बदलल्या, पतंगाचे आकार बदलले, पंतग सातासमुद्रापार गेला, पण ग्रामीण असो किंवा शहरी भाग असो मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडवण्याचा उत्साह कमी झालेला नाही.

चली चली रे पतंग मेरी, चली चली रे, बादलो के पार चले डोर पे सवार, सारी दुनिया ये देख देख जली रे...हे भाभी (१९५७) चित्रपटातील गीत आजही तितकेच लोकांच्या तोंडी आहे. कारण पतंगाची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. पिढ्या बदलल्या, पतंगाचे आकार बदलले, पंतग सातासमुद्रापार गेला, पण ग्रामीण असो किंवा शहरी भाग असो मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडवण्याचा उत्साह कमी झालेला नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

भारतात विशेषत: गुजरातच्या पतंगोत्सवाचे किंवा उत्तरायणाचे जगभरात आकर्षण आहे. यंदाही पतंगोत्सव सुरू असला तरी बाजारात माहोल वेगळाच आहे. गेल्या काही दिवसांपासून सुधारित नागरिकत्व कायद्यावरून सुरू असलेले आंदोलन आणि खेळत्या भांडवलाची कमतरता, जीएसटी कर आकारणी यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत पतंगाची विक्री आतापर्यंत ३० ते ३५ टक्के एवढीच झाली आहे. अहमदाबाद, सुरत पतंगाच्या बाजारात विक्रेत्यांना अपेक्षित गर्दी दिसून येत नाही. 

अहमदाबादच्या जमालपूर, रायपूर, दिल्ली दरवाजा येथे पतंगाचा बाजार भरला आहे. मात्र यंदा अपेक्षेप्रमाणे पतंगाच्या किमतीत वाढ झालेली नाही. विक्रेत्यांनी २५ टक्के सवलत देऊनही ग्राहक पतंग खरेदीसाठी फारसे उत्साही नसल्याचे चित्र आहे.

गुजरातचा पतंग उद्योग मोठा रोजगार देणारा असल्याने दरवर्षी उत्तर प्रदेशातून तीन हजार कलाकार गुजरातमध्ये पतंगनिर्मितीसाठी येतात. यावेळी मात्र संख्या रोडावली असून ५०० कलाकारांचे आगमन गुजरातमध्ये झाले आहे. या व्यतिरिक्त मुंबई, बंगळूर आणि कोलकता येथूनही कलाकार येत असतात. बाजाराची सध्याची स्थिती पाहता पन्नास टक्केच व्यवसाय होण्याची भीती काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पूर्वी ग्राहक एक ते दोन हजारांपर्यंतचे पतंग उडवण्यासाठी तयारी करायचे. यावेळी शंभर रुपयांचा पतंग विकण्यासाठी बराच काळ लागत आहे. काही ठिकाणी पतंगाच्या किमतीत वाढ असल्याचेही आढळून येत आहे. पतंग व्यवसायातील उत्साह कमी होण्यामागे जीएसटीचेही कारण सांगितले जात आहे. परिणामी उत्पन्न घटल्याने कर्मचाऱ्यांना वेतन कमी दिले जात आहे. त्यामुळे कर्मचारी व्यवसाय सोडून जात असल्याचे व्यापाऱ्यांचे आणि उद्योजकांचे म्हणणे आहे.

यादरम्यान मकरसंक्रांतीचा सण जवळ आला तरी त्याची तयारी मात्र सप्टेंबर महिन्यापासूनच सुरू होते. पण गेल्या वर्षी सप्टेंबर उलटून गेला तरी उद्योगाला सुरवात झाली नाही. या कारणामुळे व्यापाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. नवीन कामगारांनादेखील कमी वेतन मिळत असल्याने ते स्वत:च्या रिक्षा चालवण्यासारख्या व्यवसायाकडे वळत आहेत. त्यांना या व्यवसायातून दररोज पाचशे रुपये मिळतात.

तुलनेने अधिक पैसे मिळत असल्याने त्यांना पतंग व्यवसायात येण्यास रस राहिला नाही. एका व्यापाऱ्याच्या मते, जीएसटीमुळे पतंगाचा व्यवसाय ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी झाला आहे. आम्ही जीएसटी भरतो, परंतु व्यापारी बिल घेत नाहीत. ते म्हणतात, आम्हाला काहीही मिळत नाही आणि जीएसटीची गरज नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. व्यवसाय कोणताही असला तरी चढउतार असतोच. यास पतंग उद्योगही अपवाद राहिला नाही.

आपल्याकडे मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडवला जातो. ही परंपरा वर्षानुवर्षे जोपासली जात आहे. पूर्वी घरोघरी पतंग उडवले जायचे, आता महोत्सवाचे आयोजन करावे लागते. पतंगाचे स्वरूप, आकार, किंमत बदलली असली तरी एक गोष्ट कायम आहे, ती म्हणजे पतंग उडवण्याचा उत्साह. हा उत्साह जोपर्यंत कायम आहे, तोपर्यंत पतंग आकाशात भरारी घेत राहील.

पतंग व्यवसाय गुजरातचा
२०१९ ची उलाढाल ६२५ कोटी रुपये
पतंग उद्योगातील कर्मचारी संख्या ५० हजार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article arvind renapurkar on kite