कांजिण्या - विषाणूजन्य त्वचारोग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!

शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

आरोग्यमंत्र - डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ
कांजिण्या व नागीण हे आजार एकाच प्रकारच्या विषाणूंपासून होतात. कांजिण्या सर्वसाधारणपणे शाळेतील मुलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. विशिष्ट ऋतूमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो. या आजारात त्वचेवर पुरळ येण्याआधी अंगदुखी, ताप, अशक्‍तपणा येणे, अशी लक्षणे आढळतात. पुरळाचे प्रमाण पोट, पाठ व चेहऱ्यावर अधिक आढळते. हात व पायाला कमी प्रमाणात पुरळ येतात. काही वेळा घशात व डोक्‍यात फोड येतात. पुरळ येण्याआधी दोन-तीन दिवस व खपल्या धरेपर्यंत या रुग्णांपासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो. श्‍वसनातून व त्वचेतील फोडांमधील पाण्यापासून आजाराचा संसर्ग होतो. बऱ्याच वेळा खपल्या पडायला वेळ लागतो व अशा मुलांना शिक्षक शाळेत येऊ देत नाहीत. परंतु एकदा खपली धरली, की याचे जंतू दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाहीत, त्यामुळे सर्वसाधारणपणे ६ ते ७ दिवसानंतर मुलांना शाळेत पाठवता येऊ शकते. लहान मुलांमधील कांजिण्या आपोआप बऱ्या होतात. त्याची तीव्रता व कालावधी कमी करण्यासाठी पोटातून अँटिव्हायरल औषधे घेता येतात.

त्यामुळे योग्य वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार जरूर घ्यावेत. कांजिण्या गरोदर स्त्रियांमध्ये किंवा वयस्कर व्यक्तींमध्ये झाल्यास ते गुंतागुंतीचे ठरू शकते. त्यांच्यामध्ये हा आजार त्वचेपुरता मर्यादित न राहता शरीरातील इतर अवयवांना त्रास होऊन न्यूमोनिया, यकृताला सूज येणे असे त्रास होऊ शकतात. गरोदर स्त्रियांना हा आजार झाल्यास पोटातील बाळाच्या प्रकृतीला इजा होऊ शकते. त्यामुळे कांजिण्यांची लक्षणे आढळल्यास घरगुती उपचार करून वेळ वाया घालवण्यापेक्षा ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा. आताच्या पिढीला कांजिण्यांपासून प्रतिबंध करणारी लस उपलब्ध आहे. तिचे डोस योग्य प्रमाणात व वेळेवर घेतल्यास या आजाराचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. काही वर्षानंतर पुन्हा बूस्टर इंजेक्‍शन घेणे गरजेचे असते. 

लहानपणी कांजिण्या होऊन गेलेल्या असतात, अशा व्यक्तींच्या पाठीच्या मणक्‍यांतील मज्जारज्जूंमध्ये हे विषाणू सुप्त अवस्थेत टिकून राहतात. पुढील आयुष्यात काही कारणांनी प्रतिकारशक्ती कमी झाली, तर हे विषाणू परत जागृत होतात व नसांना सूज येते. या प्रकाराला नागीण म्हणतात. त्याबद्दल पुढील भागात पाहू.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Dhanashri Bhide all is well sakal pune today