उघड दार देवा आता...

Dr-Balaji-Tambe
Dr-Balaji-Tambe

‘कोरोना’ने माणसाच्या मनात भीती, संशय व संभ्रम निर्माण केला आहे. त्याजागी सकारात्मकता वाढवावी लागेल, तरच त्याची प्रतिकारशक्ती वाढेल. त्यासाठी मंदिरांचे दरवाजे उघडायला हवेत. माणसाची श्रद्धाच त्याला कणखर बनवेल.

कोरोनाच्या भीतीमुळे जगाचे सर्व व्यवहार ठप्प झाले. काही देशांनी पुन्हा व्यवहार सुरू केले, पण तेथे पुन्हा रोग होणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे ते देश पुन्हा संकटात सापडलेले दिसत आहेत. जगाचे सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे नवे मोठे आर्थिक संकट उभे राहिले. ज्यांचे पोट हातावर अवलंबून आहे त्यांना तर पुढे काय करावे हे सुचेनासे झाले. अशा प्रकारे भीतीच्या व प्रत्यक्ष अडचणींच्या चक्रव्यूहात माणूस अडकला आहे. अशा वेळी माणसाला शांत राहणे आवश्‍यक आहे. या सर्वांवर जर काही उत्तर असेल तर ते उत्तर आहे विश्वास, श्रद्धा. मी बरा होईन, कोणीतरी मला बरे करेल ही श्रद्धा हवी.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

करोनाच्या भीतीवर उपाय काय? तर एका पाठोपाठ एक असे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा लॉकडाउन, त्यात पुन्हा कंटेंटमेंट झोन, रेड झोन, ऑरेंज झोन, ग्रीन झोन हे सगळे चालले असले, तरी त्यातून आपण कुठेतरी योग्य ठिकाणी पोहोचतो आहोत, असे वाटत नाही. समुद्रात पडलेला एखादा मनुष्य पोहून किनाऱ्यावर येण्याची खूप धडपड करत असला, त्याने कितीही हातपाय हलवले तरी तो जगणार आहे की नाही, हे कळत नाही. अशा वेळी माणसे काय करतात? तर अशा वेळी माणसे देवावर विश्वास ठेवतात. मोठे अधिकारी, मोठे वैज्ञानिक, देशाचे पुढारी, ‘नोबेल’ मिळालेल्या व्यक्ती यांच्यावर समाजाचा विश्वास असतोच; परंतु कोणत्याही मनुष्यावर १०० टक्के विश्वास ठेवता येत नाही. म्हणून माणूस देवावर विश्वास ठेवतो. देव हा समोर नसल्यामुळे आणि देवाची स्वीकृती श्रद्धेने घेतलेली असल्यामुळे देव आहे, ही लोकांची श्रद्धा असते. अशी श्रद्धा प्रगत देशांमध्येही आढळून येते. मी तर म्हणेन, की ज्या देशांनी देवावर जास्त श्रद्धा ठेवली तेच देश प्रगत आहेत.

आत्तापर्यत माझा वैयक्तिक अनुभव असा आहे, की माणसाचा देवावरचा विश्वास व श्रद्धा वाढविण्यासाठी, जी काही स्तोत्रे, मंत्र लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने ‘यूट्यूब’सारख्या सोशल मीडियावर टाकले तर त्यांना जास्तीत जास्त प्रतिसाद मिळालेला आहे.

संकटाच्या वेळी श्रद्धा वाढवणे आवश्‍यक असते आणि श्रद्धा वाढविण्यासाठी दर्शनासाठी देव समोर असावा लागतो. देवाच्या उपासनेसाठी काही पूजा-अर्चा बांधलेली असते. अशा दैनंदिन प्रार्थना मनुष्याला करू न देणे यात कुठला फायदा होणार आहे, हे लक्षात येत नाही. दारू वाईट आहे असे नव्हे; पण दारूची दुकाने उघडू शकतात, दारूची घरपोच डिलिव्हरी होऊ शकते, तर मनुष्याला देवदर्शनापासून वंचित ठेवण्यात काय उद्देश असावा? अन्नधान्य, भाजीपाला वगैरे सर्व मिळते आहे; पण मनुष्याची भीती संपली आहे का? आम्ही कुठेही, कसेही बाहेर जाऊ असे वागण्याची मनुष्याची ताकद आहे का? प्रत्येकजण काळजी घेतोच. अविचारी किंवा काही अन्य हेतू असणारे रस्त्यांवर मुद्दाम गर्दी करत असतील; परंतु सर्वसामान्य मनुष्याला रोगाची भीती आहे व तो सावधानपूर्वकच वागतो.

आज सर्व प्रकारचे कारखाने बंद झालेले आहेत. जगातून पैसा नष्ट होतो आहे, असे दिसते आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. भूकंप, चक्रीवादळे, आगी लागणे वगैरे पाहिले तर निसर्गाचा कहर होताना दिसतो आहे. या परिस्थितीत आज मनुष्याला आधाराची मोठी गरज आहे. ‘मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्याबरोबर आहे’, हा देवाचा हात मनुष्याला का मिळू नये? सर्व मंदिरे बंद ठेवायचे काय कारण आहे? मंदिरांमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून ५-५ लोकांना दर्शन घेता येणार नाही का? आपण लोकांना रांगेत उभे करू शकतो, शिस्त मोडणाऱ्यांवर कारवाई करू शकतो. पोलिसांच्या पहाऱ्याखाली दर्शन घेण्यात लोकांना काही अडचण असायचे कारण नाही. रोज सगळी मंदिरे उघडली तरी काही बिघडू नये; पण हवे तर श्रीरामांचे मंदिर रविवारी किंवा मंगळवारी, श्रीमहादेवांचे सोमवारी, श्रीकृष्णांचे बुधवारी, श्रीदत्तात्रेयांचे गुरुवारी, श्रीलक्ष्मीचे शुक्रवारी, श्रीहनुमंतांचे व श्री शनिदेवांचे शनिवारी उघडता येणार नाही का? देवाचे दर्शन झाले तर लोकांचे मन स्थिर व्हायला मदत होईल.

पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो माणसे अनेक मैल पायी चालत जातात, पांडुरंग आमच्या पाठीशी आहे अशी धारण दृढ होते. या पांडुरंगाला कोंडून ठेवण्याने काय मिळणार आहे? घरात छोटी पूजा करायची असली, तर सोशल डिस्टन्सिंग पाळून गुरुजी पूजा सांगू शकतील. कुठेही सत्संग करायचा नाही, असे सगळे नियम करण्याची काय गरज आहे? लोकांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी असलेल्या सर्वच गोष्टींवर बंदी आणली तर कसे चालेल? लोकांच्या मनावरील ओझे कमी होईल तेव्हा त्यांची आत्मशक्ती वाढेल आणि त्यातून कोरोनारूपी युद्ध जिंकण्यासाठी आत्मविश्वास वाढेल.

कोरोनासारखी एक मोठी महामारी, ज्याला आपण जागतिक रोग म्हणू, कसा प्रकट झाला? बघता बघता हा रोग सर्व जगभर पसरला. त्यातून उत्पन्न झाली भीती. जागतिक आरोग्य संस्था ही सर्वांत मोठी संस्था आहे, तसेच प्रत्येक देशात संशोधन करणाऱ्या मोठ्या-मोठ्या प्रयोगशाळा आहेत. तेथे अनेक सक्षम वैज्ञानिक आहेत, हे वैज्ञानिक खूप वर्षांपासून काम करत आहेत. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून आल्यावर आज पाच महिन्यांनंतरही हा रोग काय आहे, तो पसरतो कसा, त्याला आटोक्‍यात कसा आणायचा याचा अंदाज कोणालाही आलेला नाही. रोग्यावर दिसणाऱ्या लक्षणांवरच उपचार केले जातात असे दिसते. लस शोधण्यासाठी, औषधे शोधण्यासाठी आज सगळीकडे धडपड चालू आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या व अजूनपर्यंत व्यवहारात असलेल्या भारतातील आयुर्वेदाचा मात्र समावेश झालेला दिसत नाही. ज्याची प्रतिकारशक्ती कमी असते ती व्यक्ती सांसर्गिक रोगाला बळी पडण्याची शक्‍यता अधिक असते.

प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) वाढवणे आवश्‍यक आहे हे नक्की. पण सध्या सर्वत्र संभ्रमावस्था व संशय असताना माणसाची प्रतिकारशक्ती कशी वाढेल? प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी सकस अन्नाची गरज आहे, तसेच बरोबरीने त्याला मानसिक थेरपीचीही गरज असते. योग, ध्यान, मंत्रपठण हे मानसिक उपचार आहेत आणि ते परंपरेने डोक्‍यागत बसलेले आहेत. हे उपचार वैज्ञानिक आहेत की नाही हा मुद्दा नसून हे उपचार माणसाने स्वीकारलेले आहेत. यात कोणी कुणाला फसवत असले तर त्याला पकडता येते. परंतु हे सर्व करण्यापासून मनुष्याला वंचित ठेवण्याचे काय प्रयोजन आहे? असे करून समाजाला जास्त भीतीच्या मार्गाकडे वळविण्याचे काय कारण आहे? भीतीचे पर्यवसान शेवटी प्रतिकारशक्ती कमी होण्यात होते.

काही सामाजिक अडचणी असतील, काही प्रशासनिक अडचणी असतील, पण सर्व अडचणींवर मात करता येते. जसे दुकानासमोर रांग लावताना एक एक मीटर अंतरावर माणसांनी उभे राहण्याची व्यवस्था करता येते, बसच्या क्षमतेच्या अर्धी माणसे भरून बस नेता येते, विमानातून येणाऱ्यांना क्वारंटाईन करता येते, तर मंदिरात जाऊन लोकांना देवाचे दर्शन घ्यायचे असले, घरात काही पूजा वगैरे करायची असेल, ज्यामुळे त्यांची मनःशक्ती वाढेल, तर तसे करू द्यायला अडचण नसावी.

क्वांटम सायन्सच्या उदयानंतर तरंगशक्तीचे महत्त्व हे भौतिक शक्तीच्या पलीकडचे व महत्त्वाचे असते हे मान्य झालेले आहे. वातावरणात असलेल्या एकूण तरंगशक्तीचा म्हणजे फिल्ड इफेक्‍टचा माणसावर परिणाम होतो, तसेच संस्काराने माणसाची सावधानता वाढून मनुष्य सर्वांना सामावून घेणारा, प्रेमळ व श्रद्धावान होत असतो. आयुर्वेदात गोळ्या, काढे, चूर्ण यांच्याबरोबरीने सुगंध, धूप, मंत्रोच्चार, संगीतसुद्धा उपचार म्हणूनच सुचविलेले असतात. अशा उपचारांची पण आज खरी गरज आहे. भौतिक विज्ञानाच्या पलीकडे असलेली वातावरणाची शक्ती, वातावरणात असलेल्या तरंगांचा परिणाम, विश्वात असणाऱ्या प्रत्येक अणूरेणूंचा, नद्यांचा, झाडांचा, पर्वतांचा परिणाम सर्व वातावरणात असतो. या परिणामांमुळे अनेक गोष्टी घडत असतात, हे सध्या सिद्ध झालेले आहे.

यावर आधुनिक विज्ञानही संशोधन करते आहे. अशा वेळी एक सकारात्मक शक्ती, जी शक्ती किड्या-मुंगीपासून मनुष्यापर्यंत सर्वांना जिवंतपणा देते, ती प्राणशक्ती कुठून तरी येत असणारच हे आज मान्य झालेले आहे. मंदिरात सकारात्मकता असल्याचा अनुभव लोकांनी घेतलेला असतो. मंदिरात जाऊन देवासमोर डोके टेकल्यावर मनुष्य समजतो की आता माझ्यावर देवाची कृपा होईल. या श्रद्धेने वारकरी पंढरपूरला जाऊन देवासमोर डोके ठेवतात. काही माणसे वर्षातून एकदा वारीला जातात, तसेच तेथे वर्षभर जाणारेही भक्त असंख्य आहेत. विश्वासाची शक्ती घेऊन ते परत येतात. अशा प्रकारे मंदिरांचा मोठा उपयोग आहे. त्यांचा फायदा घेण्याची आजची ही वेळ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com