इजा कशा टाळाव्यात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 November 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोग तज्ज्ञ
उत्साहामुळे एखादा नवीन खेळ, व्यायाम करायला सुरुवात केल्यावर अधिक शारीरिक श्रम होतील, अशा क्रिया अथवा व्यायाम प्रकार केल्यास स्नायूंना इजा होण्याची शक्‍यता असते. अशा वेळी व्यायामाची गती फिटनेससाठी कशी उत्तम राखायची हे समजावून घेणे आवश्‍यक असते. व्यायाम प्रकारात किंवा अति शारीरिक स्नायू, सांध्यामध्ये इजा, टेण्डॉन व हाडावरील अधिक ताणामुळे होणारे स्ट्रेस फ्रॅक्‍चर, टेण्डानायाटीस यांसारख्या इजा होतात. त्या होण्याची सामान्यतः 

कारणे खालीलप्रमाणे -
१. प्रशिक्षणातील चुका/त्रुटी - आपण चांगले खेळाडू घडावे, चांगला फिटनेस व्हावा म्हणून काही वेळा आपण शारीरिक क्रिया वाढवतो, खूप वेगाने करतो, बराच काळ थकलो तरी करत राहतो. शारीरिक क्षमतेचा विचारही करत नाही. एखादी सहज घडणारी होणारी क्रियासुद्धा बराच काळपर्यंत  
करत राहिलो तर साहजिकच त्याचा ताण स्नायूंवर पडत असतो व त्यामुळे इजा घडतात. 

२. प्रशिक्षणातील काही तांत्रिक (टेक्‍निकबाबत) चुका ः बऱ्याच वेळा एखादी क्रिया करताना ती सुलभ व्हावी, सहज व्हावी याचे शास्त्रशुद्ध तंत्रपद्धती असते. तशा क्रिया केल्यास त्याचा शारीरिक लाभ होतो. पण आपण ते तंत्र लक्षात न घेता व्यायाम प्रकार, क्रिया करू लागल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. थ्रोबॉलसाठी बॉल फेकताना घ्यावयाची स्थिती, त्याला वेग प्राप्त करण्याच्या हालचाली यासंबंधी विशिष्ट तंत्र असते ते तज्ज्ञाकडून अवगत करून त्यात प्रावीण्य व कौशल्य प्राप्त करावे लागते. त्यासाठी तुमची शारीरिक स्थिती ही वैद्यकीयदृष्ट्या सक्षम व निरोगी असावी लागते. तरच या गोष्टी शक्‍य असतात. हाच नियम सर्व प्रकारच्या खेळांसाठी व व्यायाम प्रकारांसाठी असतो. 

या इजा टाळण्यासाठी खालील घटकांचा विचार करावा लागतो. अशा इजा होण्याचा धोका हा कोणालाही असू शकतो. तरीही आपली शारीरिक स्थिती वैद्यकीयदृष्ट्या कशी आहे, वाढत्या वयामुळे हालचालीत कोणत्या मर्यादा आहेत, आपण करत असलेल्या क्रियांचा शरीरावर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करून आवश्‍यक ते बदल करायला हवेत. यासाठी स्पोर्ट्स मेडिसिन तज्ज्ञांचा अथवा तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घेऊन आपल्याला योग्य असतील असेच व्यायाम प्रकार करणे हितावह ठरते. 

अशा प्रकारच्या इजा टाळण्यासाठी प्रामुख्याने -
१. अचूक तंत्र : नवीन हालचाल, क्रिया, व्यायाम, खेळ सुरू करण्यासाठी त्यातील अचूक तंत्र समजावून घेणे आवश्‍यक असते. हे तंत्र समजावून घेतल्यानंतर त्यासाठी आवश्‍यक असणारे प्रशिक्षण आणि सराव करणे हे ही गरजेचे असते. खेळण्यासाठी आवश्‍यक तो ड्रेस, बूट योग्य प्रकारचे असावेत. नियमित खेळणाऱ्या खेळाडूंनी आपले बूट वर्षातून दोनदा तरी बदलायला हवे. 

२. नियमितता व सातत्य - आवड म्हणून शनिवार, रविवार खेळण्याचा फिटनेसच्या दृष्टीने फारसा परिणाम होत नाही. उलट अशामुळे दुखापत होण्याचीच शक्‍यता अधिक असते. त्याऐवजी दररोज किमान ३० मिनिटे नियमित व्यायाम केल्यास हितावह ठरतो. तसेच व्यायाम करण्यापूर्वी वॉर्मअप करणेही आवश्‍यक असते. 

३. हळूहळू व्यायामात वाढ करणे - एकाच व्यायाम प्रकारावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी विविध पूरक व्यायामांचा समावेश करायला हवा. सुरुवातीला ‘लो इम्पॅक्ट’ क्रिया चालणे, पोहणे, पाण्यात चालणे अशा क्रिया व नंतर हातापायांच्या स्नायूतील ताकद वाढवण्याचे व्यायाम करणे हितावह असते. तसेच समजा वजन उचलण्याचा व्यायाम असेल तर आठवड्याला केवळ १० टक्के एवढेच वजन वाढवून हळूहळू अंशतः वाढ करणे लाभदायक ठरते. 

अशा प्रकारच्या इजा झाल्यास व्यायाम सोडून देण्याचा विचार करणे अथवा बंद करणे याऐवजी तज्ज्ञ डॉक्‍टरांचा योग्य सल्ला घेतल्यास आपणास जलद रिकव्हरी होऊन परत व्यायाम करता येऊ शकतो. त्यासाठी अशा प्रकारच्या इजांचे मूळ कारण, त्याची सद्यःस्थिती याचा सारासार विचार करावा लागतो. तंत्र, व्यायामाची तीव्र, काळ, प्रकार हे सर्व लक्षात घेऊन इजा बरी होण्यासाठी आवश्‍यक ती खबरदारी घ्यावी लागते. काळी काळासाठी या क्रियाही थांबवाव्या लागतात व शारीरिक स्थिती लक्षात घेऊन पुन्हा व्यायामक्रिया सुरू करताना शारीरिक क्षमता, स्थिती, क्रिया, लवचिकता व समतोल याची तपासणी करून योग्य तंत्राच्या पद्धतीचा अवलंब करावा लागतो. शास्त्राच्या प्रगतीमुळे, संशोधनामुळे, तंत्रज्ञानामुळे अशा इजावर मात करत खेळाडूंना आपले करिअर नक्की उज्ज्वल घडवात येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr narendra vaidya all is well sakal pune today