हाडे जुळून न येण्यातील अडथळे

डॉ. नरेंद्र वैद्य
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!

शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ
फ्रॅक्‍चरवरील उपचारानंतर स्थिरता नसेल आणि पुरेसा रक्तपुरवठा होऊ शकला नाही तर हाडे जुळून न येण्याची शक्‍यता अधिक असते. त्याचबरोबर - 
१.    धूम्रपान अथवा तंबाखूच्या सेवनामुळे ‘निकोटीन’ या घटकामुळे हाडे जुळून येण्यास अडथळा येऊ शकतो. 
२.    उतारवय 
३.    गंभीर रक्तक्षय : यामध्ये रक्तातील ऑक्‍सिजनचा पुरेसा पुरवठा नसल्याने हाडे भरून येण्यास अडथळा होतो. 
४.    मधुमेह, थॉयरॉईड संप्रेरकाचे कमी प्रमाण, ‘ड'' जीवनसत्त्वाचा अभाव यामुळेही अडथळा निर्माण होतो. तसेच कुपोषित लोकांमध्ये हाडे जुळून न आल्याचे आढळते. ॲस्प्रीन, ब्रुफेन यांसारख्या औषधांच्या परिणामामुळेही हाडे जुळून येत नाहीत. काहीवेळा जंतुसंसर्ग हेही कारण हाडे न जुळण्यास कारणीभूत ठरते. 
५.    मांडीचे हाड वरच्या भागात तुटते (फिमोरल हेड/नेक फॅक्‍चर). याबरोबर मनगटातील स्कॅफॉईडला मुळातच मर्यादित रक्तपुरवठा असतो. त्यामुळे ही तुटलेली हाडे जुळणे अवघड होते. नडगीचे हाड तुटल्यास जुळण्यास काही वेळा अडचण येत असल्याचे दिसते. 
६.    क्ष किरण तपासणी, सीटी स्कॅन व एमआरआयच्या साहाय्याने तसेच नियमित परीक्षणाद्वारे डॉक्‍टर या समस्येचे निदान करतात. काही वेळा ‘बोन स्टिम्युलेटर’सारखे उपाय वापरून हाडे भरून येण्याच्या प्रक्रियेस मदत करण्याचा उपचार अवलंबला जातो. परंतु बऱ्याच वेळा पुन्हा एकदा शस्त्रक्रियेचा मार्ग अवलंबला जातो. 

बोनग्राफ्टिंग
या प्रक्रियेत शरीरात तुटलेली हाडे जुळवण्यासाठी हाडांच्या तुटलेल्या भागाच्या ठिकाणी असलेल्या गॅपमध्ये शरीराच्या दुसऱ्या भागातील हाडांचा भाग बसवून हाडे जुळवण्यासाठी प्रक्रिया केली जाते. काही वेळा ॲऍलोग्राफ्ट (कॅडॅव्हरीक बोन ग्राफ्ट) व ऑस्टिओबायो लॉजिक्‍सचा वापर करुनही तुटलेली हाडे जुळत नसल्यास शस्त्रक्रिया करतात. त्याचबरोबर फ्रॅक्‍चरच्या ठिकाणी स्थिरता यावी म्हणून इंटर्नल फिक्‍सेटर अथवा एक्स्टर्नल फिक्‍सेटर वापरून शस्त्रक्रिया केली जाते. 

सद्यःस्थितीत हाडे न जुळवून येण्याच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. हाडे जुळून येण्यासाठी आवश्‍यक असणारे वाढीचे रासायनिक घटक तसेच तुटलेली हाडे जुळण्यासाठी बाधा असणाऱ्या घटकांवर सकारात्मक परिणाम करणारे रासायनिक घटक शोधून ते इंजेक्‍शनद्वारे देण्याचा प्रयत्न ही प्रयोगावस्थेत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr narendra vaidya all is well sakal pune today