जपूया आरोग्य वृक्षवल्लींचे

Tree
Tree
Updated on

शुद्ध हवेचा व अन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या वनस्पती निरोगी राहण्यासाठी सर्वच पातळ्यांवर जागरूकता वाढायला हवी. ‘आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्षा’च्या निमित्ताने....

संयुक्त राष्ट्रसंघाने २०२० हे ‘आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. ‘वनस्पतींचे रक्षण, जीवनाचे रक्षण’ या शीर्षकाखाली हे वर्ष साजरे होणार आहे. वनस्पती या शुद्ध हवेचा व अन्नाचा प्रमुख स्रोत आहेत. आपल्या अन्नाच्या गरजेपैकी ८० टक्के गरज व ९८ टक्के ऑक्‍सिजनची निर्मिती वनस्पतीद्वारे होते. असे असूनही आपण वनस्पतींना निरोगी ठेवण्याबाबत फारसा विचार करीत नाही. त्यांची नासधूस होते. वनस्पतीवरील रोग व किडी यामुळे दरवर्षी ४० टक्के पिकांची नासाडी होते.

त्यामुळे शेतमालाच्या व्यापाराचे २२० अब्ज डॉलरचे नुकसान होते. तसेच अब्जावधी लोकांना पुरेशा अन्नाच्या गरजेपासून वंचित राहावे लागते. यातून २०५० पर्यंत जागतिक धान्यउत्पादनात १० ते २५ टक्के घट होण्याची शक्‍यता `जागतिक अन्न व कृषी संघटने’ने व्यक्त केली आहे. 

पिकांच्या आरोग्यावर आघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. हवामानबदल व मानवाचा निसर्गातील वाढता हस्तक्षेप, यामुळे पर्यावरणाचे असंतुलन, जैवविविधतेचा ऱ्हास यामुळे किडींचे प्रमाण वाढत आहे.  विविध भागांतील पावसाच्या वेळेतील तफावत व तापमानातील बदल, यामुळे किडी व रोगांच्या संख्येत वाढ होत आहे. वनस्पतींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन उत्पादनक्षमता व गुणवत्ता कमी होते. वाढते तापमान व पाण्याची कमतरता, यामुळे किडी, वनस्पती व रोगजंतू यामधील संबंध बदलत जातात. तसेच, या बदलामुळे एखाद्या ठिकाणी कधीही न आलेल्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव आढळून येण्याचे प्रमाण वाढत आहे. भारताचा विचार केला असता कडधान्ये, तृणधान्ये, फळ व भाजीपाला पिकांचा एकूण उत्पादनात मोठा वाटा आहे.

आंबा, द्राक्ष, डाळिंब, पेरू, सफरचंद, केळी, संत्रावर्गीय फळपिकांवर विविध ऋतूंत किडी व रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनावर परिणाम होतो. गेल्या महिन्यात पाकिस्तानातून आलेल्या टोळधाडीमुळे गुजरातमधील मोहरी, बडीशेप, एरंड, जिरे, जेट्रोफा, कापूस, बटाटा व चारापिकांचे अमाप नुकसान झाले. अशा अचानक येणाऱ्या संकटाने शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासून डाळिंब बागेतील तेल्या रोगावर नियंत्रण येऊ न शकल्याने रासायनिक पीक संरक्षण उपाय योजावे लागत आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाल्याचे आढळले. अशा जैविक व अजैविक ताणांवर उपाययोजना करण्यासाठी वेळीच प्रयत्न करावे लागतील. 

रासायनिक अंशांचा धोका
विशिष्ट वातावरणात पिकांवरील किडी व रोगांनी जम बसविल्यास त्यांचे पूर्ण नियंत्रण हे अशक्‍य, वेळखाऊ आणि महागडे होते. किडी, तणे व रोगनियंत्रणासाठी पीक संरक्षण रसायनांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामुळे उत्पादन वाढत असले, तरी अशा रसायनांचा वापर कमाल अंश मर्यादेपेक्षा जास्त झालेले अन्नपदार्थ आहारात आल्यास आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अन्न विषरहित होण्याचे प्रयत्न आवश्‍यक आहेत. या वर्षात संरक्षण व प्रतिबंध उपाय करण्यावर भर देण्यात येत असून, यात सर्वांचा सहभाग आवश्‍यक आहे. उदा. प्रवाशांनी त्यांच्याबरोबर वनस्पती व वनस्पतिजन्य पदार्थ घेणे टाळावे. जहाज, विमान, मालगाड्या व रेल्वे यामधून वनस्पतीद्वारे किडी व रोगांचा प्रसार एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात वा देशात होणार नाही, याची खात्री करणे गरजेचे आहे.

सरकारने कीड व्यवस्थापनाकरिता वापरल्या जाणाऱ्या घातक रसायनांचा वापर टाळून पर्यावरणाचे संवर्धन करावे.यामुळे परागीभवन करणारे कीटक, किडींचे नैसर्गिक शत्रू, उपयोगी जीवजंतू आणि वनस्पतीवर अवलंबून असणारी माणसे व प्राणी यांचे रक्षण होण्यास मदत होते. जैविक व भौतिक ताणांशी प्रतिकारक व जुळवून घेणाऱ्या वाणांचे संशोधन होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी प्रमाणित कीडविरहित बियाण्यांचा व रोपांचा वापर करून तसेच पिकांवरील किडींचा प्रादुर्भाव, याबाबत नियमितपणे आढावा घेऊन नियंत्रणाचे उपाय करावेत. याबाबत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनीही समन्वय साधून प्रयत्न करणे गरजेचे आहे. जीवसृष्टीचा अविभाज्य घटक असलेल्या वनस्पतींचे रक्षण करण्यासाठी व सुरक्षित अन्न उत्पादनावर भर देण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न व्हावेत, हीच अपेक्षा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com