#MokaleVha जोडीदार निवडताना

spouse
spouse

‘नाकी डोळी नीटस आहे ना, मग लग्न करायला काय हरकत आहे?’ विवाहोत्सुक तरुण-तरुणींना नेहमी केला जाणारा हा प्रश्न वाटतो तितका सोपा नसतो. एखाद्या व्यक्तीबरोबर जन्मभर राहायचे, असे ठरवल्यावर दोघांनी शरीराने एकमेकांना पसंत करणे हे अत्यंत गरजेचे ठरते. दोघांनी एकमेकांना शारीरिकदृष्ट्या अनुकूल असणे, हे जन्मोजन्मीचे लग्न टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. पण या महत्त्वाच्या गोष्टीकडे लग्न ठरवताना प्राधान्याने बघितलेच जात नाही.

ईशा आणि विशालच्या बाबतीत हीच चूक घडली. दोघेही शारीरिकदृष्ट्या अत्यंत सक्षम होते. दोघांनाही कुठलाही मोठा आजार अथवा ऑपरेशन झालेले नव्हते.

दिसायलादेखील दोघे एकमेकांना अनुरूप होते. लग्न जमवताना या सगळ्या बाबी दोघांनीही जाणून घेतल्या होत्या. धूमधडाक्यात लग्न लागल्यावर पहिल्या रात्रीच विशाल व ईशाचे जोरदार भांडण झाले. ईशा लहान असताना, गरम पाणी पडल्याने तिच्या उजव्या बाजूच्या छातीला भाजले होते. तो भाजल्याचा व्रण कालांतराने थोडा पांढरा पडला होता. लहानपणी झालेला हा अपघात ईशा विसरूनदेखील गेली होती. परंतु सर्व पांढरे डाग हे त्वचा रोगाचे (अर्थात कोडाचे) लक्षण असतात, असा विशालचा गैरसमज होता. ईशाने व तिच्या घरच्यांनी आपल्याला फसवले व लग्न अगोदर हा त्वचारोग लपवला याचा विशालला अत्यंत राग आला. आपल्याला मूल झाले तर त्यालाही हा त्वचारोग होणार; आता आपले सर्व आयुष्य उद्ध्वस्त झाले, ही भावना विशालच्या मनात रुजून बसली. 

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ईशाला तिच्या माहेरी पाठवून देण्यात आले. हे व असे अनेक गैरसमज आजही आपल्या समाजामध्ये रुजलेले आहेत. म्हणूनच लग्नाअगोदर एकमेकांच्या शरीराची सर्वंकष माहिती एकमेकांना देणे अनिवार्य आहे. मग लग्नाअगोदर एकमेकांच्या शरीराबद्दल नक्की काय जाणून घ्यायचे बरे?

लग्न जमवताना शारीरिक अनुकूलता बघणे अनिवार्य आहे. नाहीतर ईशा व विशालसारखे गैरसमज नात्यांमध्ये निर्माण होतात. लग्न ठरवताना आपल्याला जोडीदार कसा पाहिजे, याची प्रतिमा आपल्या मनामध्ये आपण ठरवली पाहिजे. आपल्याला अनुरूप व आपल्याला साजेसा असा जोडीदार आपण निवडायला प्राधान्य द्यायला पाहिजे. तसेच कुठले शारीरिक बदल आपल्याला मान्य आहेत हे अगोदर जाणून घ्यायला पाहिजे. या बदलांमुळे आपल्याला किंवा आपल्या भावी पिढीला काही त्रास होऊ शकेल का, हे माहिती करून घ्यायला पाहिजे. संभ्रमाच्या वेळी डॉक्टरांकडून, स्त्रीरोगतज्ज्ञांकडून किंवा इतर ज्येष्ठ तज्ज्ञांकडून त्याचे स्पष्टीकरण मागून घ्यावे. 
आपल्या भावी जोडीदारात असलेले शारीरिक बदल आपण स्वीकारत आहोत हे एकमेकांस विवाहापूर्वीच सांगावे. बदलांची माहिती लपवून न ठेवता योग्य प्रकारे व योग्यतज्ज्ञांद्वारे आपल्या भावी जोडीदाराला दिली पाहिजे. विवाहपूर्व समुपदेशनामधून या बदलांचा स्वीकार कसा करावा व त्यातून उद्‍भवणाऱ्या पेच प्रसंगांना तोंड कसे द्यावे, याबद्दल जाणून घेतल्यास आपले भावी आयुष्य अत्यंत आनंददायी व सुखाचे ठरते.

सहज पडताळता येऊ शकणारी माहिती
वय : मुलाचे व मुलीचे वय नेहमीच विचारले जाते. काही वेळेला खोटे वय सांगितल्यामुळे पुढे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यासाठी लग्नाअगोदरच वयाचा दाखला बघणे अनिवार्य ठरते.

चेहऱ्याची व शरीराची ठेवण : आपण लग्न करणार ती व्यक्ती हीच आहे ना याची खातरजमा करावी. त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधनांमुळे, कपड्यांमुळे किंवा इतर मेकअपमुळे चेहऱ्याच्या व शरीराच्या ठेवणीमध्ये खोटा बदल दिसून येत नाही ना हे बघावे. लग्न जमवताना पाठवलेल्या छायाचित्रामधील व्यक्ती व प्रत्यक्ष दिसणारी व्यक्ती यामधील तफावत जाणून घ्यावी. आजकाल संगणकाद्वारे छायाचित्रांमध्ये आमूलाग्र बदल करता येऊ शकतो.

वर्ण व वजन : जोडीदाराचे वर्ण व वजन हे आपल्याला अनुरूप व शोभेल असे असावे. याबाबतीत अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत.

शारीरिक क्षमता : प्रत्येक व्यक्तीची शारीरिक त्रास सहन करण्याची क्षमता ही वेगळी असते. अनेकांना व्यायाम व आहाराद्वारे आपले शरीर जोपासण्याची इच्छा तीव्र असते. व्यायाम व आहाराबाबत अशा व्यक्ती अत्यंत काटेकोर असतात. आपला जोडीदार याबाबतीत आपणास अनुकूल आहे का हे जाणून घ्यावे.

उंची : सामाजिक मतप्रवाहानुसार नवऱ्याची उंची बायकोपेक्षा जास्त असावी हा समज आहे. शारीरिक उंचीऐवजी परस्परांमधील समन्वय कसा आहे, याला जास्त महत्त्व द्यावे.

दृष्टी व श्रवणक्षमता :  माझी बायको मृगनयनी असावी; यापेक्षा तिला काही दृष्टिदोष नाही ना हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. कॉन्टॅक्ट लेन्स लावल्यामुळे अनेक वेळेस चष्मा असल्याची बाब नजरेस पडत नाही. तसेच श्रवण संस्थेतील दोष दडपले जातात. आपल्या होणाऱ्या जोडीदाराला त्याच्या डोळ्यांबद्दल व ऐकण्याच्या क्षमतेबद्दल स्पष्टपणे विचारले गेले पाहिजे. काही व्यंग असल्यास ते कितपत आहे हे जाणून घेतले पाहिजे. 

बाहेरून अधोरेखित होणारे शारीरिक व्यंग : अनेक व्यक्तींना जन्मतः किंवा अपघातामुळे नंतर काही शारीरिक व्यंग निर्माण होतात. जसे हाता-पायाची उंची कमी असणे, पाठीच्या कण्यामध्ये दोष असणे वगैरे. तसेच हे दोष आनुवंशिक आहेत का, हेही विचारावे. गरज पडल्यास योग्य वैद्यकीय तज्ज्ञांकडे जाऊन या दोषांबद्दल संपूर्ण माहिती करून घ्यावी. लग्नाअगोदर संपूर्ण चौकशी केल्यामुळे नंतर उद्‍भवणारे वादाचे मुद्दे संपुष्टात येऊ शकतील.

बाहेरून न दिसणाऱ्या शारीरिक बाबी :
शारीरिक आजार :
आपल्या होणाऱ्या जोडीदाराला, आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये झालेल्या सर्व शारीरिक व्याधींबद्दल सविस्तर माहिती दिली पाहिजे. जसे क्षयरोग, थायरॉइडचे विकार, हृदयरोग, एपिलेप्सी वगैरे. सध्या चालू असलेले काही आजार असल्यास तेही सांगितले गेले पाहिजेत, तसेच आपण काही औषधोपचार घेत असल्यास जोडीदाराला अंधारात ठेवू नये. 

शारीरिक शस्त्रक्रिया : काही कारणास्तव आपल्यावर शस्त्रक्रिया केली गेली असेल तर ती कशासाठी व त्याचे पुढील परिणाम काय याबद्दल जोडीदाराला विश्वासात घेऊन सांगावे. 

मासिक पाळी : अनेक महिला मासिक पाळीतील त्रास व त्यासाठी त्या घेत असलेल्या उपचारांबद्दल वाच्यता करीत नाहीत. आपण घेत असलेल्या उपचारांबद्दल स्त्रीरोगतज्ज्ञांकडून गैरसमज दूर करून घ्यावेत. तसेच या तक्रारींमुळे लग्नानंतर मूल होण्यास काही बाधा येऊ शकते का, याबद्दल चर्चा करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com