Gall-bladder
Gall-bladder

पित्ताशयातील खडे

आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी-धडफळे, यकृततज्ज्ञ
पित्ताशयातील खडे म्हणजे पित्तातील घटक पदार्थ एकत्रित येऊन तयार झालेला दगडासारखा कठीण पदार्थ. काही वेळेस ते एखाद्या दगडाप्रमाणे गोलाकार तर काही वेळा छोटे असतात. काही रुग्णांमध्ये ते रेतीप्रमाणे असतात. पित्ताशय आणि पित्तनलिका (ती यकृत पित्ताशय, आतड्याला जोडते) दोन्हींमध्ये याचा प्रादुर्भाव आढळतो. ही अतिशय नेहमी आढळणारी समस्या आहे. समाजातील ५ ते २५ टक्के लोकांमध्ये पित्ताशयातील दगड आढळतात. ‘फॅट, फर्टाईल, फिमेल ऑफ फोर्टी’ तसेच स्थूल प्रौढांमध्ये पित्ताशयातील खड्यांचे प्रमाण अधिक आढळते.
 
पित्ताशयातील खड्यांचे प्रकार 
१)     कोलेस्टेरॉल स्टोन्स : ८६ टक्के
२)     मिश्र प्रकारचे खडे : यामध्ये कोलेस्टेरॉल आणि bilmubin piament चे प्रमाण ४ टक्के आढळते. 
३)     Pigment stones (Billirubin) : या प्रकारचे खडे कमी प्रमाणात आढळतात आणि ते खूप कठीण असतात. 
पित्ताशयातील खड्यांची लक्षणे  
१)     पोटात कळ येऊन दुखणे : पोटाच्या उजव्या बाजूस कळ येऊन तीव्र वेदना होते. तसेच ही वेदना पाठीकडेही जाऊ शकते. 
२)     थंडी वाजून ताप येणे. 
३)     तीव्र स्वरूपात मळमळ किंवा उलट्या होणे. 
४)     कावीळ होणे - या काविळीत अंगाला खाज येऊ शकते तसेच शौचाचा रंग पांढरट/मातकट होऊ शकतो. 
५)     गडद पिवळ्या रंगाचे मूत्रविसर्जन होणे. 
६)     काही वेळेस जड, मेदयुक्त अन्नपदार्थ न पचणे, पोट फुगणे, वायू जाणे अशा प्रकारची लक्षणे आढळतात. बहुतेक वेळेस पित्ताशयातील खड्यांचा काहीही त्रास होत नाही आणि त्यांची लक्षणे दिसून येत नाहीत. फक्त दोन-चार टक्के लोकांमध्ये लक्षणे आढळतात. त्यातील ०.३ ते ०.४ टक्का रुग्णांमध्ये पित्ताशयाला सूज येते. ०.०४ - १.५ टक्का रुग्णांमध्ये स्वादुपिंडाला सूज येते. पित्ताशयाला सूज येऊन ते फुटणे, पित्ताशयाला गॅंगरीन होणे, पित्ताशयाचा कर्करोग इ. गंभीर आजारही या खड्यांमुळे होऊ शकतात. 

हे खडे का होतात? 
१) आनुवंशिकता
२) जीवनशैली
३) स्थूलपणा
४) आहारामधील घटक
५) वय
६) सिऱ्हॉसिस     
७) लिंग आणि ऑस्ट्रोजेन संप्रेरकांमुळे
८) संसर्ग    
९) मधुमेह
१०) पित्ताशयास वारंवार जंतुसंसर्ग झाल्यास 

पित्ताशयाच्या खड्यांवरील उपचार 
खड्यांमुळे लक्षणे दिसू लागल्यावर पित्ताशय काढून टाकावे लागते. ही शस्त्रक्रिया दुर्बिणीतून किंवा ओपन पद्धतीने करता येते. काही प्रसंगी हे खडे पित्तनलिकेत अडकतात आणि ईआरसीपी या एंडोस्कोपी पद्धतीने ते काढून टाकता येतात. त्यानंतर पित्ताशय काढावे लागते. पित्ताशयातील खड्यांमुळेच लक्षणे असल्याची खातरजमा वैद्यकीय तज्ज्ञांकडून करणे आवश्‍यक असते. तसेच काहीवेळेस गोळ्या औषधांनी हे खडे विरघळविता येतात. परंतु ही औषधे खूप वर्षे घेणे आवश्‍यक असते तसेच औषधे घेणे थांबविल्यास त्याचा प्रादुर्भाव परत होऊ शकतो. 

पित्ताशयातील खड्यांचे निदान - पित्ताशयातील खड्यांचे निदान रक्त चाचण्या, सोनोग्राफी तसेच सीटी स्कॅन इ. चाचण्यांमार्फत होऊ शकते. 
पित्ताशय काढून टाकल्यास शरीरावर काय परिणाम होतो? - पित्ताशय काढल्यामुळे तसा विपरीत परिणाम काही होत नाही. परंतु पोटात वायू होणे किंवा काही प्रमाणात मेदयुक्त पदार्थांचे अपचन होणे अशी लक्षणे दिसू शकतात. शरीरात कुठलेही व्यंग होत नाही. कालांतराने ही लक्षणे कमी किंवा नाहीशी होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com