दुधाची तहान ताकावर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 July 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर
‘दुधाची तहान ताकावर भागवणे’ अशी एक फार जुनी म्हण आहे. त्या संदर्भात ज्यांना पूर्ण वेळाचा एमबीए अभ्यासक्रम करणे काही कारणाने शक्‍य होत नाही अशांसाठी अनेक चांगल्या संस्थांमध्ये दोन पद्धतींत प्रशिक्षण घेण्याची सोय उपलब्ध असते. पहिल्या पद्धतीला एक्‍झिक्‍युटिव्ह एमबीए, तर दुसरीला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट 
(पीजीडीबीएम) असे म्हणतात. 

सुमारे पाच ते सात वर्षे उत्तम नोकरीचा अनुभव घेऊन झाल्यावर कंपनीतर्फे पाठवलेला उमेदवार वा स्वखर्चाने गेलेली एखादी व्यक्ती नामवंत संस्थेच्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास तिला एकाच वर्षात एक्‍झिक्‍युटिव्ह एमबीए ही पदवी घेता येते. अगदी आयआयएमपासून ते छोट्या संस्थांपर्यंत हा प्रकार उपलब्ध असतो. मात्र प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे हे अनिवार्यच असते. कामाचा अनुभव आहे त्यामुळे विविध विषयांचे सॅंडविच कोर्सेस करत हा कोर्स एका वर्षात संपतो. अर्थातच, एमबीएचे स्वप्न तर पूर्ण होतेच शिवाय प्रगतीला सुरवात नक्की होत जाते. 

पीजीडीबीएम या प्रकारात किमान दोन वर्षांचा नोकरीचा अनुभव गरजेचा असतो. कामाच्या अनुषंगाने सायंकालीन, शनिवारी-रविवारी प्रत्यक्ष लेक्चर्स व त्यातून सबमिशन्स, परीक्षा वगैरे देत हा अभ्यासक्रम पूर्ण होतो. अर्थात, दोन वर्षांचा अभ्यासक्रम तीन वर्षांत पूर्ण होतो. अशांना एमबीए पदवीसुद्धा मिळू शकते. अन्यथा, अनेक जण एक वर्षात पीजीडीबीएम पूर्ण करतात.

सध्याच्या पद्धतीत ऑनलाइन लेक्चर्स, व्हर्च्युअल क्‍लासरुम, ग्रुप डिस्कशन्स हे सारे शक्‍य होते. छोट्या-मोठ्या अनेक विषयांत हे अभ्यासक्रम आज अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत. उदा. ः सप्लायचेन मॅनेजमेंट, बॅंकिंग अँड फायनान्स, इन्शुरन्स, लॉजिस्टिक्‍स, मटेरिअल्स, मॅनेजमेंट, रिटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, शेअर्स, म्युच्युअल फंड्‍स, टुरिझम अशा प्रकारात तुम्हाला नेमकेपणाने प्रशिक्षण मिळते. 

अर्थातच या सर्व प्रकारानंतर कॅम्पस व पॅकेज हा प्रकार जवळपास नसतो, तर चालू नोकरीमध्ये प्रगती होणे हा घटक महत्त्वाचा ठरत जातो हे नक्की 
लक्षात ठेवावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Dr Shriram Git edu supplement sakal pune today