‘व्यवस्थापना’चे व्यवस्थापन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 July 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर
एमबीएबद्दल बरीचशी प्राथमिक माहिती आपण गेले काही दिवस घेत आहोत. त्या संदर्भातील आजचा हा शेवटचाच लेख समजाना. मुख्यतः एमबीए नावाचा बागुलबुवा जाणकार, सामान्य व शिक्षणाशी काहीही संबंध नसलेल्या प्रत्येकाच्या मनातून काढून टाकणे एवढा आजचा विषय आहे. 

मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन हे तर सर्वत्रच लागते ना? घरचे चार सदस्य सोडून चार पाहुणे यायचे म्हटले, तरी गृहिणी करते ते व्यवस्थापनच असते. नेहमीचा स्वयंपाक सोडून काय करायचे; त्याचा पुरवठा कसा होईल, त्याची खरेदी करायची का, घरातील वस्तू त्यासाठी पुरेशा आहेत याची तयारी म्हणजे एकप्रकारे व्यवस्थापनाची सुरवातच असते. 

मुलांच्या शिक्षणासाठीची तरतूद, घरासाठीची खरेदी व त्याची तरतूद, नवीन घर घ्यायचे तर त्याची तरतूद, निवृत्तीनंतरची गरज ओळखून त्याची तरतूद यशस्वीपणे करणारेसुद्धा एमबीए न करताही चांगले व्यवस्थापकच असतात. 
नोकरीमध्ये कामाचे नियोजन सहकाऱ्यांकडून सहकार्याने काम करवून घेणे, हाताखालच्या लोकांच्या गरजा ओळखून त्यांची पूर्तता करणे हाही एक मॅनेजमेंटचाच भाग असतो. फक्त या साऱ्याला आपण तसे नाव देत नाही, समजत नाही. अशा या विविध गोष्टी करताना त्यातून येणाऱ्या अडचणीवर मात करणे हाही एक धडाच असतो. मोठ्या अडचणींना घाबरून न जाता तोंड देण्याचे एकप्रकारे ट्रेनिंगच आपण घेत असतो ना? 

आता साऱ्या वाचकांनी फक्त एकच गोष्ट करायची आहे. ती अगदी साधीशीच आहे. प्राथमिक आहे. मात्र, ते करणारे पालक, वाचक सध्या अभावाने सापडतात. हा एक काळाचा महिमा समजा. आपल्या इयत्ता नववी ते पदवी दरम्यानच्या मुलाला/मुलीला वर लिहिलेल्या प्रत्येक बाबतीत सहभागी करून घ्यायचे. मग ती खरेदी असो, पाहुण्यांचे आगरतस्वागत असो, घरातील कामाला येणाऱ्या मदतनीस, सोसायटीतील अन्य कामगार यांचेबरोबरची वर्तणूक, बोलणे त्यांची कामे समजून घेणे अशा साध्याशा गोष्टीतून तुमची मुले खूप-खूप व्यवस्थापनातील धडेच शिकणार आहेत. जेव्हा पदवी घेऊन ते एमबीएच्या अभ्यासाला लागतील तेव्हा त्यांना कळेल की, जे केले त्याला पुस्तकी नाव असे असे दिले आहे. मुंबईच्या डबेवाल्यांचे व्यवस्थापन हार्वर्ड मॅनेजमेंट स्कूलमध्ये केसस्टडी म्हणून अभ्यासले गेले त्याचेच हे एक छोटेसे प्राथमिक रुपडे आहे, हे नक्की! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Dr Shriram Git edu supplement sakal pune today