Father's Day : कारण तो आता 'बाबा' आहे!

सोमनाथ गिते
Sunday, 16 June 2019

कारण तो आता 'बाबा' आहे. त्याचं बाबा होणं त्याला बदलवत आहे. तो खूप जबाबदार होतोय. तो आता प्रत्येक गोष्टीचा नव्या प्रकारे विचार करतोय. त्याच्या जीवनात असं कुणीतरी आलंय ज्याच्या अस्तित्वापुढे तो स्वतःला विसरून गेला आहे.

तो आता खूप बदलला आहे. तो आता पूर्वीसारखा राहिला नाहीये.  तो इतका का बदलला?

कारण तो आता 'बाबा' आहे. त्याचं बाबा होणं त्याला बदलवत आहे. तो खूप जबाबदार होतोय. तो आता प्रत्येक गोष्टीचा नव्या प्रकारे विचार करतोय. त्याच्या जीवनात असं कुणीतरी आलंय ज्याच्या अस्तित्वापुढे तो स्वतःला विसरून गेला आहे.

बाबा फक्त मुलांचा विचार करतो आणि त्यांच्यासाठी जगतो. त्याचं जीवन, त्याची स्वप्नं, त्याचं काम, त्याचे विचार या सगळ्या गोष्टींचा परिघ खूप वाढतो आणि मुलांनी व्यापून जातो. आई स्वतःचं शरीर वापरून मुलांना जन्म देते आणि बाबा स्वतःचं शरीर झिजवून मुलांना वाढवतो.

बाबाचं प्रेम म्हणजे मुलांचा जगण्याचा आधार असतं. बाबा मुलाला खांद्यावर घेऊन जग दाखवतो.

आई व बाळ यांच्यात नाळ जोडली असली तरी जेव्हा आपलं बाळ पहिल्यांदा एखादा बाबा हातात घेतो तेव्हा त्या बाळात आणि त्याच्या बाबांमध्ये एक अदृश्य नाळ जोडली जाते, हे सगळं मला आता जाणवत आहे.

तो आपलं बोट धरून पाऊल टाकायला शिकतो आणि नेहमी जगातल्या प्रत्येक वाटेवर यशस्वीपणे चालायला शिकवतो.

मुलं नेहमी बाबाच्या नजरेनं जग बघण्याचा प्रयत्न करतात आणि बाबा मुलांच्या दृष्टीने विचार करून त्यांना मार्ग दाखवतात. तो खंबीरपणे आपल्या बरोबर उभा राहतो प्रत्येकवेळी.

आई आपल्याला जीवन देते आणि बाबा जगणं शिकवतो. चांगलं जीवन जगता येणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. बाबा नेहमी मार्गदर्शन करतो. त्याची जागा कुणीही घेऊ शकत नाही. तो एकमेव व्यक्ती असा असतो, ज्याला आपण त्याच्यापेक्षा खूप जास्त यशस्वी व्हावं असं मनापासून वाटतं आणि असं झाल्यावर तो स्वतःच्या जीवनाचं सार्थक समजतो.

बाबाचं जीवन मुलांच्या अवतीभवती फिरत असतं. त्याची स्वप्नं मुलांसाठी असतात. मुलांचं आजचं जीवन आणि भविष्य सगळ्याचा विचार त्यांच्या डोक्यात असतो. जे त्याला मिळालं नाही ते मुलांना उपलब्ध करून देणं बाबांना खूप महत्वाचं वाटतं.

मुलांना शिस्त लावणारा बाबा, मुलांना योग्य मार्ग दाखवणारा बाबा, मुलांबरोबर लहान होऊन खेळताना हरवून जाणारा बाबा, त्यांच्या जीवनाला आकार देऊन आदर्श व्यक्तीमत्व निर्माण करणारा बाबा, नेहमी आधारस्तंभ म्हणूनआपल्या बरोबर खंबीरपणे उभा राहणारा बाबा, आपल्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणारा बाबा, आपल्याला चांगलं जीवन देण्यासाठी स्वतःचं संपूर्ण जीवन घालवणारा बाबा. बाबाची इतकी रूपं, आपल्या जीवनातल्या त्याच्या इतक्या भूमिका हे सगळं बघितलं की तो किती अविभाज्य भाग असतो आपल्या जीवनाचा याची जाणीव होते.

मुलांचं जीवन बाबाच्या वागण्याचा आरसा असतो. मुलांचा पहिला आदर्श नेहमी त्यांचा बाबा असतो.

हे सगळं आज मला कळत आहे कारण मी आज बाबा आहे, त्याच ते ओरडणं त्यावेळी चुकीचं वातट होतं पण आज कळतं मी जो काही आहे तो त्यांच्यामुळेच... थँक्स बाबा...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article on Fathers day by Somnath Gite