esakal | Father's Day : ती माझी मुलगी नाही तर माझा श्वास!
sakal

बोलून बातमी शोधा

kangude

तिकडे माझी मुलगी जन्माला आली होती आणि इथे माझ्यामध्ये एका मुलीच्या बापाचा जन्म होत होता.

Father's Day : ती माझी मुलगी नाही तर माझा श्वास!

sakal_logo
By
योगेश कानगुडे

फादर्स डे : घरात मुलं असली की, गोकुळ नांदतं, असे पूर्वी समजलं जात असे. मुलांचा जन्म, त्यांचे बालपण, त्यांच्यावरील संस्कार, तारूण्यात होणारे बदल याचा आई-वडील आनंद घेत असतात. त्यातच मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हा समज बाजूला ठेवीत एकाच मुलीला वाढविण्याचा आनंद वेगळाच असतो.

विवाह झाल्यानंतर आपल्याला अपत्याची अपेक्षा असते. तेव्हा आपल्या मुलगा होईल की, मुलगी हे आपल्याला हे माहीत नसते. मला ही रुहीचा जन्म होईपर्यंत कुठे माहित होते? मी व माझ्या बायकोसह माझ्या आईला मुलगी व्हावी अशी अपेक्षा होती. घरातील बाकी सर्वांना मात्र मुलाची अपेक्षा होती. आम्हा तिघे एकीकडे आणि इतर दुसरीकडे अशी अवस्था होती. मला मुलगी झाली आणि जिंकलो असल्याची भावना मनात दाटून आली. माझ्या अंतर्मनाला वाटत होते की, मला मुलगी व्हावी. ते स्वप्न सत्यात उतरले होते.

माझी मुलगी जन्माला आली. तिला बघून नंतर घरी जाण्यासाठी हॉस्पिटलमधून बाहेर पडलो. रस्त्यावर समोरून तीन-चार मुली येत होत्या. माझ्यात काय सळसळत गेलं मला कळलंच नाही. त्या मुलींकडे बघणारी माझी नजर नेहमीप्रमाणे त्यांची मापं मोजणारी नव्हती. तर माझी नजर त्यांच्यामधली ऊर्जा, त्यांचा अवखळपणा शोधत होती. या मुलींच्या घरी त्यांची काळजी करणारा एक बाप असेल आणि तो काळजीने त्यांची वाट बघत असेल, असं काहीतरी मनात तरळून गेलं आणि मी एकदम हललो.. असा काहीतरी विचार मी पहिल्यांदाच करत होतो. तिकडे माझी मुलगी जन्माला आली होती आणि इथे माझ्यामध्ये एका मुलीच्या बापाचा जन्म होत होता.

खरं तर रुहीचा जन्मापासूनच आतापर्यंतचा प्रवास तिच्याबरोबर मी आणि माझी बायको स्वाती आमच्यासाठी खूपच संघर्षाचा होता. आता कुठे हळू हळू आम्ही स्थिरावत आहोत. जेव्हा स्वाती प्रेग्नेंट आहे असं कळल्यानंतर आनंद गगनात मावेनसा झाला. परंतु, हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण दुसऱ्या क्षणाला डॉक्टरांनी सांगितले की बाळाची वाढ होण्यासाठी जी गादीसारखी जागा लागते ती कुमवत आहे. त्यामुळे पुढील काही महिने बाळाची कुठलीही शाश्वती मी देऊ शकत नाही. बाळ वाढवायचं की नाही हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. हे वाक्य ऐकताच आम्हाला मोठा धक्का बसला. घरी आल्यानंतर आम्ही दोघांनी खूप विचार केला आणि प्रेगन्सी पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यावर माझ्या बायकोला सक्तीची विश्रांती घेण्याचं सांगितलं होतं. पाच महिन्यानंतर पुन्हा सोनोग्राफीचा रिपोर्ट आल्यानंतर मात्र आमच्या जीवात जीव आला. रिपोर्टमध्ये बाळाची वाढ हे समाधानकारक असल्याचं समोर आलं. नंतर रुहीच्या जन्मापर्यंत सर्व काही व्यवस्थित होत गेले. आता  दीड वर्षाची झाली आहे. एवढ्या काळात आम्ही रुहीला मात्र तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपत आलो आहे. दररोजच्या तिच्या ऍक्टिव्हिटी पाहून थक्क व्हायला होतं.

मूल जेव्हा बोलयला लागतं तेव्हाची परिस्थिती मात्र मोठी गंमतीशीर असते. बोलत असताना ऑ.. करतं तेव्हा आपल्या वाटतं की आईचे नाव घेत आहे. रुही जेव्हा जोरात हाक मारते तेव्हा त्यात मोठं थ्रिल असतं. मुलांच्या होणाऱ्या वाढीवर कोणी स्क्रीनप्ले लिहू शकत नाही. बाळ चालण्यापासून ते बोलण्यापर्यंतचा अनुभव मात्र मोठा आनंद देणारा असतो. या सगळ्यांचा आनंद मी रोज घेत असतो. ती जेव्हा मला डॅडा म्हणून हाक मारते तेव्हा मला वेगळीच ऊर्जा मिळते. काही दिवसांपूर्वी रुही तिच्या आजी-आजोबांकडे पंधरा दिवसांसाठी गेली होती तेव्हा मात्र एकट्याला घर खायला उठल्यासारखे वाटत होते. मनात एक विचार आला की आज ना उद्या ती मोठी झाल्यांनतर तिचं लग्न होईल या विचारानेच मन सुन्न होत. एक वडील म्हणून तो कसोटीचा काळ असतो. ती वेळ फेस करण्याची ताकद मी आतापासून एकत्र करत आहे. ती गावाला गेल्यांनतर एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली म्हणजे ती माझी मुलगी नाही तर श्वास आहे माझा.

loading image