कुक कुक कुकरी (गिरिजा ओक)

गिरिजा ओक
बुधवार, 13 मार्च 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

सेलिब्रिटी व्ह्यू 

एकदा आमच्या "कुकरी शो'मध्ये एक बाई आल्या. त्या एकतर खूप चिंताग्रस्त झाल्या होत्या किंवा त्या मुळातच तशाच होत्या. त्या हसतच नव्हत्या! अत्यंत गंभीर चेहऱ्याने त्या रेसिपी सांगत होत्या.

माझा डिरेक्‍टर मला 2-3 वेळा येऊन सांगून गेला "एपिसोड खूप बोअरिंग होतोय. बॅकग्राऊंड म्युझिकनेही भरता येणार नाही. तू त्यांना जरा प्रश्‍न विचार, बोलतं कर.' मी आपलं त्यांना तुम्ही स्वयंपाक कुणाकडून शिकलातपासून बाकी काय करतापर्यंत सगळं विचारून झालं होतं. प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर त्या तोंडावरची माशी न हलू देता देत होत्या. शेवटी मी त्यांना माझ्या चेहऱ्यावर आणि आवाजात होता नव्हता तो सगळा उत्साह दाटून विचारलं "तुमचा आवडता पदार्थ कोणता???' (माझा उत्साह बघा). त्यावर त्या तितक्‍याच मख्खपणे म्हणाल्या, "मुगाची खिचडी'. व्हॉट????? या जगात मटण रोघन जोश, बटर चिकन, सावजी, तांबडा पांढरा इत्यादी आणि तुम्ही शाकाहारी असाल तर वांग्याचं भरीत, फणसाची भाजी, आळूची पातळ भाजी, पुरण पोळी, उकडीचे मोदक आदी पदार्थ असताना आवडता पदार्थ "खिचडी?' असो... असते एकेकाची आवड.

मला विचारलं तर मी एक असा पदार्थ सांगूच शकणार नाही. मी प्रचंड फूडी आहे. मला खूप वेगवेगळ्या तऱ्हेच, चवीच जेवण ट्राय करायला आवडतं! माझ्यासारख्या मुलीसाठी माझा कुकरी शो म्हणजे खरंच एक मेजवानी होती! आमच्याकडे अनेक सुगरणी येऊन कमाल पदार्थ करून दाखवायच्या. काही सेलिब्रिटी सुगरणीही यायच्या. लालन सारंग, सविता मालपेकर, उमा सरदेशमुख यांच्या पैकी कोणीतरी येणार कळलं की आमच्या सेटवर कोणी शूटिंगच जेवण जेवायचंच नाही. ही झाली खाण्यापिण्याची आणि हमखास वजन वाढवून घेण्याची सोय. स्वयंपाक करायला शिकण्याचं काय? मुळात त्यासाठी असतात ना कुकरी शोज!

मला विचारलंत ना सगळ्यात जास्त कोणाकडून स्वयंपाकबद्दल शिकलीस? उत्तर आहे उमा अमृते. तुम्हाला पाककृतीच्या पुस्तकांची आवड असल्यास हे नाव नक्की माहीत असेल. गेली अनेक वर्षे ठाण्यात कुकिंग क्‍लासेस घेणाऱ्या आणि अनेक पाककृतींची पुस्तकं लिहिणाऱ्या अत्यंत मृदू स्वभावाच्या मात्र शिकवताना सगळं अगदी व्यवस्थित आलं पाहिजे, याचा आग्रह धरणाऱ्या उमाताई. त्यांचा माझ्यावर फार जीव. आम्ही दोघींनी एक "बेसिक कुकिंग' नावाची सीरिज केली होती. त्यात दही लावण्यापासून ते साध्या आमट्या-भाज्या, बेसिक ग्रेव्ही, इडलीच्या पिठापर्यंत अनेक बेसिक पदार्थ शिकवले होते. हॉस्टेलवर राहणाऱ्या, नुकतंच लग्न झालेल्या अनेकांनी, म्हणजे मुलींनी आणि मुलांनीसुद्धा, आम्हाला पत्र लिहिली होती. बेसिक कुकिंग सीरिज उत्तम झाली म्हणून. आता हे बेसिक मग पुढे ऍडव्हान्स लेव्हलचं शिक्षण मी प्राप्त केलं होतं, त्याचं मी पुढे काय केलं हे तुम्ही ऐकलंच पाहिजे. काहीही नाही! 

काय आहे, आमच्या घरात माझ्या आजे सासूबाई आहेत. त्या कमालीचा स्वयंपाक करतात. आता-आतापर्यंत त्या सगळं करायच्या. हल्लीच त्यांना माझ्या सासूने आराम करायची सक्त ताकीद देऊन त्यांना किचनमधून रिटायर केलंय. आता सासू स्वयंपाक करतात आणि त्याही सुगरण आहेत! माझ्या आजे सासूकडून किचनची सूत्र माझ्या सासूकडे नुकतीच आली आहेत, माझा नंबर यायला अजून कैक वर्षे आहेत. शिवाय माझ्या दोन्ही सासवांना लोकांना प्रेमाने जेवायला घालायची आवड आहे आणि मला प्रेमाने खायला! 

थोडक्‍यात, करेक्‍ट चाललंय सगळं! येस. यू आर ऍब्स्युलेटली राइट! खूप लकी आहे! नुसतं खाण्यापिण्याच्या बाबतीतच नव्हे तर इतरही अनेक बाबतींत. नेमक्‍या माझ्या दोन्ही सासवा माझे कसे लाड करतात ते मी तुम्हाला पुढच्या लेखात सांगते. तोपर्यंत खाते और खिलाते रहो! 

Web Title: Article by Girija Oak in Maitrin supplement of Sakal Pune Today