मम्मी आणि आई (गिरिजा ओक)

मम्मी आणि आई (गिरिजा ओक)

सेलिब्रिटी व्ह्यू
लग्नाआधी एकदा मी गोडबोल्यांकडं जेवायला गेले होते. त्या दिवशी मला दोन गोष्टींचा उलगडा झाला. 
१. मी पहिला घास पानातल्या काकडीच्या कोशिंबिरीचा खाल्ला आणि माझ्या लक्षात आलं, की आपला या घरात येण्याचा निर्णय योग्य आहे. सेम आमच्या घरी लागते तशीच म्हणजे अगदी तश्‍शीच चव. आधीच लग्न करून दुसऱ्या घरी जाणं म्हणजे अनेक गोष्टी बदलतात. त्यात जेवणाची चव आणि खाण्या-पिण्याच्या पद्धती सेम राहिल्या, तर केवढं सोपं होतं!

२. मला दोन सासवा आहेत. एक नवऱ्याची आई, म्हणजे माझी डायरेक्‍ट सासू आणि तिची सासू म्हणजे बॉसची बॉस. त्या दिवशी मी पहिल्यांदा त्या दोघींना एकत्र भेटले. आई (नवऱ्याची आज्जी. त्यांना सगळे आई म्हणतात. अहो आई) मम्मीचं (नवऱ्याची आई म्हणजे मम्मी. अगं मम्मी) कौतुक करीत होत्या. त्या सांगत होत्या, की ती किती कर्तृत्ववान आणि कष्टाळू आहे. यावर मम्मीनं त्यांचे गालगुच्चे घेतले!!! मी बघतच बसले! सासू-सुनेचं, मुख्यतः त्या वयातलं, असं घट्ट नातं मी कधीच पहिलं नव्हतं.

मी पण माझ्या सासूचे गाल सर्रास ओढते. आजे सासूचे गाल हातातच येत नाहीत म्हणून... मुळात माझी सासू अठराव्या वर्षी लग्न करून गोडबोल्यांकडं आली. ती या घरातच लहानाची मोठी झाली, असं म्हणायला हरकत नाही. मी पण वयाच्या साडेबाविसाव्या वर्षी आले. आता ही सगळी माणसं मला माहेरचीच वाटतात. उलट माझी आईच जरा शिस्तप्रिय असल्यामुळं मला लवकर उठवते आणि सासू सकाळी दहा वाजताही पडदे बंद करून, पांघरुण नीट करून, डोक्‍यावर हात फिरवून झोपवते!! आमच्या घरात मीडिया इंडस्ट्री आणि त्याच्याशी जोडलेल्या वेळा-अवेळा, कामाचा ताण, शारीरिक आणि मानसिक गरजा या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या जातात. किंबहुना, त्या आता इतक्‍या अंगवळणी पडल्या आहेत, की वेगळ्या समजून घ्यायचीही गरज भासत नाही. माझ्या ८७ वर्षांच्या (आम्हा सगळ्यांपेक्षा जास्त फिट अँड फाइन) आजे सासूबाई पण मला म्हणतात, ‘‘तू बिनधास्त जा कामाला, घरचं आम्ही बघू.’’ हे फक्त बोलण्यापुरतं नाही बरं का! माझी सासू कॉस्च्युम डिझायनर आणि मेकअप आर्टिस्ट आहे. अनेक चित्रपट, मालिका, सध्या गाजणारी ‘इडियटस्‌’ आणि ‘सोयरे सकल’ या नाटकांची वेषभूषा तिनं केली आहे. आजे सासूबाई उत्तम कुक आहेत. त्यांनी कूकबुक्‍स लिहिली आहेत. त्या खाद्य पदार्थांचा व्यवसायही करायच्या. सासू उत्तम नॉनव्हेज बनवते. तिच्या हातचं दाल गोश्‍त, बटर चिकन, तंदुरी चिकन, सगळ्या प्रकारचे मासे आणि शाकाहारीमध्ये मुद्दा भाजी, दही बुत्ती, उकडीचे मोदक, दह्यातलं भरीत, बेक्‍ड अलास्का नावाचं एक भारी डेझर्ट कमाल असतं. खरं सांगायचं, तर मी याबद्दल कितीही बोलू शकते, पण आता इथंच थांबते. कारण, तुमच्या आणि माझ्याही तोंडाला पाणी सुटंल. पुढच्या लेख कशाबद्दल असावा? तुमच्याकडे काही सूचना असतील, तर नक्की कळवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com