पडद्यामागचं खरं खुरं (गिरिजा ओक)

गिरिजा ओक
सोमवार, 8 एप्रिल 2019

आपण पडद्यावर बघतो तो फक्त अभिनय... याच पडद्यामागे नक्की काय चालतं? सांगतेय अभिनेत्री गिरिजा ओक...

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

सेलिब्रिटी व्ह्यू 

बऱ्याचदा माझ्यासारख्या कलाकारांच्या (माझ्यासारख्या म्हणजे विवाहीत स्त्री कलाकार) मुलाखती घेतल्या जातात तेव्हा आम्हाला हमखास दोन प्रश्‍न विचारतात - 
- हे क्षेत्र मुलींसाठी किती सुरक्षित आहे का? 
- अहो, तुम्ही ते रोमॅंटिक सीन्स कसे हो करता (अर्थातच परपुरुषांबरोबर)? 

एका विवाहीत अभिनेत्रीला हे दोन प्रश्‍न विचारण्यामागचं कारण असं की, लग्न झाल्यावर आणि मुख्यतः मूल झाल्यावर अचानक तुम्हाला खूप गंभीरपणे घेतलं जातं. मला तर सुरवातीला गंमतच वाटायची. मॅच्युरिटीचं काही वय असतं का? ती वयाच्या 15व्या वर्षी पण येऊ शकते आणि वयाच्या 70व्या वर्षांपर्यंत आलीच नाही असंही होऊ शकतं! असो, मॅच्युरिटीबद्दल खूप लांब चर्चा पुढच्या एखाद्या लेखात मांडेन.

तूर्तास एखाद्याला त्याच्या मॅरेटल स्टेटसमुळे मॅच्युअर समजलं जातं आणि गंभीरपणे घेतलं जातं याकडे आपण वळूयात. तर विवाहीत आणि त्यात पोरं-बाळंवाली म्हणजे डबल क्वालिफाईड! तेव्हा मुलींसाठी हे क्षेत्र कितपत सुरक्षित आहे, याबद्दल मी जबाबदारीनं बोलेन याची लोकांना अगदी खात्री वाटते. मला हा प्रश्‍न फक्त आमच्या क्षेत्राबद्दल का विचारतात, हे कळत नाही. सध्या परिस्थिती अशी आहे की, साधारणपणे हे जगच स्त्रियांसाठी कितपत सुरक्षित आहे, असं विचारायला हवं. "फिल्म इंडस्ट्री'मध्ये जणू दारातच स्त्री लंपट पुरुष बसलेले असतात आणि आत शिरल्या शिरल्या बायकांना त्रास देतात, अशी समजूत असते बऱ्याच जणांची. तर ते तसं अजिबातच नसतं. सगळीकडे चांगली-वाईट लोकं भेटतात. परिस्थिती पडताळून त्याप्रमाणे हुशारीने स्वतःची सुरक्षितता, मग ती फक्त शारीरिकच नव्हे, तर मानसिक पण, सांभाळून वागणं हे प्रत्येक क्षेत्रात आवश्‍यक आहे. 

आता दुसऱ्या प्रश्‍नाकडे वळूयात - 
तर, ऑनस्क्रीन रोमान्ससारखं कंटाळवाणं प्रकरण जगात नाही बरं का. रोमान्स कसा एकांतात करायचा असतो की नाही? बॉलिवूडमधल्या अनेक गाण्यांमध्ये पण हिरो-हिरॉइन ग्रुप डान्स करता-करता अचानक सगळी गर्दी गायब होते आणि प्रेमाचं एक कडव ते गळ्यात गळे घालून डान्स करत एकांतात गातात. पण तेही शूट करताना तिथे 200 माणसं असतात. इतक्‍या माणसांसमोर कसा आणि काय रोमान्स करायचा? दिग्दर्शक सतत टक लावून आपल्या प्रत्येक हालचालींकडे बघत असतो. रोमॅंटिक संवाद मनातून येत नसून स्क्रिप्टमधून येत असल्यामुळे स्क्रिप्ट सुपरवायझर मानगुटीवर बसलेला असतो. साधारणपणे सेटवर खूप जास्त लाईट्‌स वापरले जातात, त्यामुळे खूप उकडतं आणि मग डोळ्यात डोळे घालून प्राण एकवटून रोमॅंटिक ओळी म्हणताना कुठून-कुठून घामाच्या धारा वाहत असतात विचारू नका.

बऱ्याचदा "माझं तुझ्यावर प्रेम आहे' सारख्या तत्सम ओळी क्‍लोज-अपमध्ये शूट केल्या जातात, तेव्हा, तो प्रियकर समोर नसतोच मुळी! समोर असतो कॅमेरा आणि समोर असलेल्या कुठल्या तरी एका ठिकाणी प्रियकर असल्यासारखी कल्पना करावी लागते. एक पॉइंट फिक्‍स करून घ्यावा लागतो, जिथं बघितलं की कॅमेरात आपण प्रियकराकडे बघतोय असं वाटतं. हा एक पॉइंट म्हणजे कॅमेरामॅनचा खांदा, कटर स्टॅंडची खुंटी (लाइट कट करण्यासाठीचं काळं कापड ज्याच्या वर टांगतात तो कटर स्टॅंड), समोरच्या भिंतीवरचा एखादा डाग इत्यादी काहीही असू शकतो. या अत्यंत नॉन रोमॅंटिक पॉईंटकडे बघून "आय लव्ह यू' म्हणताना काय मज्जा येत असेल नाही, आम्हाला!!! तर असा असतो स्क्रीनवरचा रोमान्स. त्यातून स्क्रीनवरचे हिरो-हिरॉइन खऱ्या आयुष्यात प्रेमात पडत असतील तर ते नक्कीच शूटिंग सुरू नसताना रोमान्स करत असतील! 

Web Title: Article by Girija Oak in Maitrin supplement of Sakal Pune Today