अभियांत्रिकी - पहिल्या फेरीसाठी विकल्प नोंदविताना

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 June 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

वाटा करिअरच्या
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबईतर्फे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष फार्मसी, आर्किटेक्‍चर, हॉटेल मॅनेजमेंट शाखेतील प्रवेशासाठीचे एकत्रित माहितीपत्रक www.mahacet.org संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वरील शाखेतील प्रवेशासाठीचे नियम समान असून, प्रत्येक शाखेतील प्रवेशासाठीचे नोटिफिकेशन मात्र स्वतंत्रपणे जाहीर केले जाते.

प्रत्येक शाखेतील प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी, मेरिट लिस्ट जाहीर करणे, उपलब्ध जागांची माहिती जाहीर करणे, ऑनलाइन पसंतीक्रम भरणे व कन्फर्म करणे, पहिल्या फेरीसाठीचे प्रवेश जाहीर करणे, प्रवेशासाठीचे रिपोर्टिंग करणे या प्रमाणे पुन्हा दुसरी फेरी असे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्यांच्या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत.

पहिल्या फेरीसाठी विकल्प नोंदवताना...
  अंतिम गुणवत्ता यादीत ज्या विद्यार्थ्यांची नावे आहेत, असे सर्वजण ऑनलाइन विकल्प भरून पहिल्या फेरीत भाग घेण्यास पात्र असतील. स्वतःच्या लॉगइनमधून विकल्प भरून त्यास पुष्टी देणे आवश्‍यक आहे.

  आपला पसंतीक्रम नोंदवताना पहिला क्रमांक म्हणजे आपली सर्वोच्च आवड व त्यानंतरचे सर्व विकल्प उतरत्या क्रमाने भरावेत.

  स्वतःच्या मेरिट क्रमांकानुसार मला काय मिळेल, असा विचार करून तो विकल्प प्रथम टाकायचा नसून, उच्च विकल्पापासून सुरवात करणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर मला पहिल्या फेरीत कोठेतरी प्रवेश मिळालाच पाहिजे, हे लक्षात घेऊन भरपूर विकल्प देणे आवश्‍यक आहे.

  समजा मी ४० विकल्प नोंदवले, तर त्या सर्वांची मांडणी प्रथम क्रमांकापासून उतरत्या क्रमाने पसंतीक्रमानुसार करणे आवश्‍यक आहे. मला २० वा विकल्प प्राप्त झाला, तर आपल्याला त्या खालचे २१ पासूनच्या विकल्पाचे वाटप होत नाही. त्यामुळे माझी मांडणी अशी असावी की, २० पेक्षा १९वा, त्यापेक्षा १८वा, असे वरील सर्व विकल्प उच्च असावेत. परंतु, २० पेक्षा खालचे सर्व विकल्प उतरत्या क्रमाने कमी आवडीचे आहेत, याची खात्री असावी.

लक्षात ठेवा, एखाद्याचा मेरिट क्रमांक ४ हजार, ८ हजार, १० हजार आहे, अशा सर्वांनी मला अमुकच पाहिजे, असा हट्ट धरून त्याशिवाय मी दुसरे काही स्वीकारणारच नाही, म्हणून फक्त ३ ते ४ विकल्प नोंदविणे अत्यंत चुकीचे आहे. एक मेरिट क्रमांकानुसार संगणकाकडून वाटप सुरू होते व शेवटी ज्यांनी नोंदणी केली, त्यांच्या शेवटच्या मेरिट क्रमांकापर्यंत (समजा यावर्षी दीड लाख विद्यार्थ्यांची नोंदणी असेल) संगणक वाटप करतो. अशावेळी चांगला मेरिट क्रमांक असूनही कमी विकल्प नोंदवले आणि जर वाटपामध्ये चॉईस नॉट अव्हेलेबल आले, तर तो विद्यार्थी कमनशिबी आहे असे समजावे, कारण आपला चांगला मेरिट क्रमांक असूनही आपणास काहीच मिळाले नाही, परंतु आपल्यापेक्षा खूप कमी मेरिट क्रमांक असणाऱ्यांना त्यांनी मागणी केल्यामुळे त्यांना त्या जागेचे वाटप होते. याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

चांगला मेरिट क्रमांक असूनही चॉईस नॉट अव्हेलेबल आले, याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या स्वतःच्या मेरिट क्रमांकाकडे न पाहता आपण फक्त अतिउच्च विकल्प नोंदवले, साहजिकच आपण व नोंदवलेले, परंतु आपल्यापेक्षा खालील मेरिट विद्यार्थ्यांनी संबंधित विकल्पाची मागणी केल्यामुळे त्यांना त्याचे वाटप होते. म्हणूनच प्रथम फेरीतच आपल्याला काहीतरी मिळालेच पाहिजे, याची नोंद घेऊन जास्तीत जास्त विकल्प नोंदवणे गरजेचे आहे, पुढील फेरीत बेटरमेंटची सोय असते. 

थोडक्‍यात, भरपूर विकल्प नोंदविणे, पहिल्या फेरीतील प्रवेश स्वीकारणे, पुढील फेरीत भाग घेऊन बेटरमेंटची अपेक्षा ठेवणे हाच उत्तम मार्ग आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Hemchandra Shinde edu supplement sakal pune today