राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष - सीईटी परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 August 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
महाराष्ट्र विनाअनुदानित, खासगी, व्यावसायिक शैक्षणिक संस्थांचे प्रवेश व फीचे नियमन अधिनियम २०१५च्या कलम १०मधील तरतुदीनुसार राज्य शासनाने प्रवेश नियामक प्राधिकरणांतर्गत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष-सीईटी सेलची स्थापना केली आहे. 

स्थापनेपूर्वी वैद्यकीय, तांत्रिक, कृषी, उच्च शिक्षण, ललित कला यांसह अनेक क्षेत्रांतील प्रवेशासाठी सीईटी परीक्षा व प्रवेश प्रक्रिया प्रत्येक विभागामार्फत स्वतंत्रपणे राबवली जात होती. सीईटी सेलमुळे अनेक परीक्षा एकाच छत्राखाली पारदर्शी व कार्यक्षम पद्धतीने सर्व विभागांमध्ये समन्वय साधून घेतल्या जात आहेत. 

सीईटी सेलच्या www.mahacet.org या संकेतस्थळास भेट दिल्यानंतर येणाऱ्या मुख्य पेजवर वेगवेगळ्या शाखांच्या प्रवेश प्रक्रियेबाबतची लिंक उपलब्ध होते. याच पेजवर सीईटी एक्झाम पोर्टल लिंक उपलब्ध असून, त्या पेजवर जाताच पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या सर्व सीईटीबाबतची माहिती उपलब्ध होते. 

पदवी अभ्यासक्रम परीक्षा
       एमएचटीसीईटी - राज्यातील शासकीय, स्वायत्त तसेच खासगी अभियांत्रिकी व फार्मसी महाविद्यालयातील प्रवेशाबरोबरच राज्यातील कृषी शाखेतील सर्व प्रवेश तसेच मत्स्यविज्ञान पदवी व दुग्धतंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी ‘एमएचटीसीईटी’ घेतली जाते. परीक्षेतील संबंधित ‘पीसीबी’ अथवा ‘पीसीएम’ ग्रुपमधील गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातात. एकत्रित परीक्षा सीईटी सेलतर्फे अनेक शाखांतील प्रवेशासाठी घेतली जात असली तरी प्रवेश प्रक्रिया मात्र प्रत्येक शाखेसाठी कक्षातर्फे स्वतंत्रपणे राबवली जाते. 

       एमएएचबीएचएमसीटी - राज्यातील शासकीय व खासगी महाविद्यालयांतील ‘बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी’ या चार वर्षे कालावधीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी ही सीईटी घेतली जाते. 

       एमएएच-एएसी-सीईटी - कला संचालनालय मुंबईअंतर्गत असणाऱ्या राज्यातील शासकीय व खासगी महाविद्यालयातील ‘बॅचलर ऑफ फाईन आर्ट’ या चार वर्षे कालावधीच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. 

       उच्च शिक्षण विभागाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमईएच-एलएलबी (पाच वर्षे इंटिग्रेटेड म्हणजेच एकात्मिक अभ्यासक्रम), एमईएच एलएलबी (तीन वर्षे), एमईएच बीपीएड -  बॅचलर ऑफ फिजीकल एज्युकेशन, एमईएच-बीएड -बॅचलर ऑफ एज्युकेशन, एमईएच- बीएबीएड, बीएस्सीबीएड इंटीग्रेटेड अभ्यासक्रम या सीईटी घेतल्या जातात.

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी
       तांत्रिक शिक्षण विभागांतर्गत ‘एमईएच-‘एमबीए’, ‘एमएमएस’ - मास्टर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, मास्टर इन मॅनेजमेंट स्टडीज, ‘एमईएच-एमसीए - मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लीकेशन, एमईएच-एमआर्च - मास्टर इन आर्किटेक्चर, एमईएच-एमएचएमसीटी - मास्टर इन हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी या परीक्षा घेतल्या जातात.

       उच्च शिक्षणांतर्गत मास्टर इन एज्युकेशन, मास्टर इन फिजीकल एज्युकेशन, बीएड-एमएड (एकात्मिक अभ्यासक्रम) या परीक्षा घेतल्या जातात.

       वैद्यकीयसाठी पीजीपी - फिजीओथेरपी, पीजीओ - अॅक्युपेशनल थेरपी, पीजीएएएसएलपी - मास्टर इन ऑडिओलॉजी अॅण्ड स्पीच अॅण्ड लॅंग्वेज पॅथॉलॉजी, एमएस्सी पीअॅण्ड ओ - मास्टर ऑफ सायन्स इन प्रोस्थेटिक अॅण्ड ऑर्थोटिक्स या अभ्यासक्रमासाठी सीईटी घेतली जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Hemchandra Shinde edu supplement sakal pune today