सर्वांगीण विकासाकडे लक्ष

हेरंब कुलकर्णी
गुरुवार, 18 एप्रिल 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

जावे त्यांच्या देशा
गेले काही आठवडे आपण विविध देशातील शिक्षणपद्धती आणि शिक्षणव्यवस्थांविषयी या लेखमालेतून माहिती घेत आहोत. फिनलंड या देशाविषयी चर्चा केल्यानंतर जपान या देशातील शिक्षणपद्धतीविषयी काही बलस्थानांचा आपण विचार केला. जपानच्या शिक्षणपद्धतीचा धावता आढावा आज घेऊयात. जपानच्या शिक्षणपद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आपण पहिले ते म्हणजे मुलाच्या दहा वर्षांच्या वयापर्यंत परीक्षा नसणे. दहा वर्षांचा होईपर्यंत मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष ठेवले जाते आणि नीतिमत्ता आणि मूल्ये यांचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना या वर्षांच्या काळात सकारात्मक विचार, उत्साही राहणे, स्वयंशिस्त, शुभेच्छा पद्धती, सहनशीलता या गोष्टीही शिकवल्या जातात. या देशातील रीती, चांगल्या सवयी, संस्कार, नीतिमूल्ये यांची माहिती प्राधान्याने दिली जाते. जपानच्या शाळांमधील स्वच्छता आणि त्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांचा पुढाकार हे सुद्धा एक महत्त्वाचे वैशिष्ट्य याचीही माहिती आपण घेतली.

लहानपणापासूनच स्वावलंबनाचे धडे गिरवल्यामुळे कोणत्याही छोट्यातल्या छोट्या कामातील आवश्‍यक कसबाचा अंदाज आल्यामुळे कोणालाच अमुक काम लहान मोठे असे म्हणून कोणीही कोणाला हिणवत नाही. आपोआपच मुले स्वतःच्या कामाचा आणि सहकाऱ्याचाही आदर करायला शिकतात.

जपानच्या शाळांमध्येच पोषक आहार विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रच घेतात. यामुळे शिक्षक विद्यार्थी यांचे नाते वृद्धिंगत होते. ‘समानस्तु भोजनं’ हाच मंत्र जणू काही जपानने शाळांमध्ये लागू केलेला दिसतो. जपानच्या शाळांमध्ये दिले जाणारे सांस्कृतिक शिक्षणही तितकेच रंजक. जपानमध्ये हायकू हा काव्यप्रकार तसेच, जपानी वळणदार हस्ताक्षर पद्धती ‘शोडो’ ही सुद्धा शिकवली जाते. विद्यार्थ्यांना छोट्याछोट्या खेळातून विषयज्ञान घडवून आणायचे काम जपानमध्ये शिक्षक करतात. जपानच्या मुलांची वर्गातील उपस्थिती ९९.९९ टक्के इतकी असते. हे जपानच्या शिक्षणव्यवस्थेचे श्रेय होय. जपानमधील गणवेशाबद्दलचा विचार, साधारण शाळांचे वेळापत्रक इत्यादी सर्व वैशिष्ट्यांचे निरीक्षण आपण या पूर्वी या लेखमालेत केले आहे. पुढच्या लेखांपासून सिंगापूर या देशातील शिक्षणपद्धतीचा विचार करूयात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Hermab Kulkarni edu supplement sakal pune today