रंगसंवाद : लॉकडाउनमधले 'फॅमिली दर्शन!'

महेंद्र सुके
शुक्रवार, 22 मे 2020

एखादा विषाणू येईल आणि सारे काही बंद होईल, हे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते. विज्ञानाने प्रगती केल्यानंतर हे इवलेसे जीव माणसाला असे रोखून धरतील, हे कुणी सांगितले असते तरी विश्‍वास बसला नसता. पण अख्खे जग विळख्यात घेणाऱ्या या कोरोना विषाणूने भारतातही प्रवेश केला. संसर्ग वाढू नये म्हणून ‘लॉकडाउन’ घोषित झाला. अचानक जे लोक जिथे होते तिथेच ‘लॉक’ झाले.

एखादा विषाणू येईल आणि सारे काही बंद होईल, हे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते. विज्ञानाने प्रगती केल्यानंतर हे इवलेसे जीव माणसाला असे रोखून धरतील, हे कुणी सांगितले असते तरी विश्‍वास बसला नसता. पण अख्खे जग विळख्यात घेणाऱ्या या कोरोना विषाणूने भारतातही प्रवेश केला. संसर्ग वाढू नये म्हणून ‘लॉकडाउन’ घोषित झाला. अचानक जे लोक जिथे होते तिथेच ‘लॉक’ झाले. कोणी घरी, कोणी ऑफिसमध्ये, कोणी परगावी, परराज्यांत तर कोणी परदेशात! जो जिथे होता तिथेच अस्वस्थ होऊ लागला. बेचैन होऊ लागला; परंतु अशा वातावरणातही मनाला धीर देऊन, शांत राहून परिस्थितीशी लढायचे आहे व मनात इच्छा नसतानाही, कशाशी तरी जोडून ठेवणे खूप गरजेचे आहे. यातूनच प्रत्येकाला काही ना काही करावेसे वाटले. घरात बसून वेळ जावा म्हणून अनेकांनी गेल्या दोन महिन्यांत वेगवेगळे प्रयोग केले. तसाच प्रयोग करणारे ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये राहणारे चित्रकार धम्मपाल जानराव किर्दक.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या लॉकडाउनच्या काळात स्वत:सह अवतीभवतीच्या लोकांनाही प्रसन्न कसे ठेवता येईल, या विचाराने किर्दक यांना घेरले. त्याचा विचार ते करू लागले आणि बाहेर भयावह परिस्थिती असताना त्यांनी घरात पेंटिंग करणे सुरू केले. पेन व पेपर माध्यम घेऊन ते चित्र काढू लागले. लॉकडाउनच्या काळात त्यांनी ‘फॅमिली’वर लक्ष केंद्रीत केले. ती फॅमिली ते चित्रात मांडत गेले. ती फॅमिली होती प्राण्यांची. माणसांनी आपल्या कुटुंबीयांसह राहावे, हा संदेश देणारी त्यांची चित्रे आकार घेऊ लागली. घरात कुटुंबीयांसोबत आनंद मिळतो, हे त्यांनी त्यांच्या चित्रांतून अधोरेखित केले आणि ‘बाहेर पडू नका’ हेच अप्रत्यक्षपणे आपल्या चित्रातून अधोरेखित केले. काढलेली चित्रे त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केली. चित्र बघणाऱ्यांना ती आवडली आणि त्या चित्रांचे कौतुक झाले. लॉकडाउनच्या काळात स्वत: प्रसन्न राहणे आणि इतरांनाही आनंद देण्याचे कार्य सिद्धीस गेल्याचे किर्दक यांना समाधान वाटले. सर्वांनी केलेले कौतुक व दिलेल्या प्रतिक्रियांनी मनाच्या काळोखावर फुंकर मारल्यासारखे वाटले. सगळीकडे लॉकडाउनचा काळाकुट्ट अंधार असतानाही कलेच्या किरणांनी ‘मन’ उजळून गेल्याचे समाधान त्यांना या कलाकृतींनी दिले आहे.

धम्मपाल किर्दक यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले नसले, तरी त्यांचा चित्रकारितेचा प्रवास मोठा आहे. २००८ पासून त्यांची चित्रे वैयक्तिक सात प्रदर्शनांसह वेगवेगळ्या समूह आणि कलामहोत्सवात झळकली आहेत. या प्रदर्शनात कलारसिकांनी त्यांच्या चित्रांचे कौतुक केले आहे. कलारसिकांशी थेट संवाद साधणाऱ्या या चित्रकाराच्या कलाकृती देश-विदेशातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी संग्रहित करून ठेवल्या आहेत. अशा कलावंताने लॉकडाउनच्या काळात रेखाटलेले ‘फॅमिली’चे चित्र रसिकांशी साधलेला महत्त्वाचा संवाद ठरला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article mahendra suke