रंगसंवाद : एकांतवासातला निसर्गानुभव

Ramdas-Khare
Ramdas-Khare

कोरोना नावाचा छुपा शत्रू घराच्या उंबरठ्याबाहेर दबा धरून बसलेला. या महाशत्रूचा पराभव करायचा असल्यास घरात बसूनच प्रत्येकालाच त्याच्याशी लढायचे होते. आयुष्यभर पोटासाठी वणवण भटकणारे, घरापासून कायम दूर राहिलेले सारेच घरात बंदिस्त झाले. ठाण्यात वास्तव्याला असणारे चित्रकार रामदास खरे यांच्याही वाट्याला हेच आले; पण हा लॉकडाउन काळ त्यांना छंद जोपासण्यासाठी मिळालेली संधी वाटला आणि त्याचे सोने करत चित्रनिर्मिती केली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रामदास खरे यांचे आयुष्य बॅंकेच्या नोकरीत गेले. त्या वातावरणातही या मनस्वी कलावंताने त्यांच्यातील कलोपासना जोपासली होती; पण स्वच्छंदपणे त्यात रमता आले नव्हते. अलीकडेच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि लेखन-वाचनासह चित्रकलेत रमले. निसर्ग त्यांचा आवडीचा विषय. भटकंती करून निसर्गानंद घेणे आणि तो आनंद चित्रात मांडणे हा त्यांचा छंद. लॉकडाउनमुळे त्यांची भटकंती थांबली. मात्र आजवर केलेल्या भटकंतीचे संचित त्यांना चित्रनिर्मितीसाठी खुणावू लागले आणि त्यांनी निसर्गानुभव चित्रबद्ध केले.

खरे लेखन पेंटिंग, संगीत या माध्यमांतून व्यक्त होते. त्यातून साकार झालेल्या चित्रांचे जून २०१८ मध्ये प्रदर्शनही भरवले. त्यातील कलाकृतींचे रसिकांनी कौतुकही केले. ती त्यांच्या कलानिर्मितीला मिळालेली प्रेरणा होती. गेल्या काही वर्षांतील भटकंतीत त्यांनी डेहराडून, मसुरी, काश्‍मीर, गंगटोक, दार्जिलिंगची यात्रा केली होती. ही हिमशिखरे त्यांना चित्रनिर्मितीसाठी खुणावू लागली. या चित्रनिर्मितीसाठी काही छायाचित्रकार मित्रमंडळींची छायाचित्रेही महत्त्वाची ठरली. त्यांचे फेसबुक मित्र मिलिंद ढेरे उत्तम फोटोग्राफर. त्यांनी काढलेले हिमाचल प्रदेशातील ‘स्पिती व्हॅली’चे छायाचित्र त्यांना प्रचंड आवडले. त्या छायाचित्राच्या आधारे त्यांनी मोठे पेंटिंग साकारले. प्रसिद्ध गिर्यारोहक, लेखक वसंत लिमये यांच्या ‘साद हिमालयाची’ या पुस्तकातला निसर्ग भावला. त्यातील एक फोटोही या चित्रमालिकेत साकारण्यासाठी खुणावणारा ठरला. वाईल्ड लाइफ फोटोग्राफर युवराज गुर्जर काही वर्षांपूर्वी आफ्रिकेतल्या मसाई मारा येथे गेले असता तिथे त्यांनी काढलेल्या छायाचित्राचेही पेंटिंग याच कालावधीत बनवले. अशा ‘लॉकडाउनमधल्या रंगरेषां’च्या पेंटिंगचे छोटेसे प्रदर्शन भरवण्याचा खरे यांचा मानस आहे. 

खरे चित्रकलेसोबतच लेखक, कवी आणि साहित्याचे अभ्यासकही आहेत. ‘लॉकडाउनच्या काळातली खिडकीबाहेरची अस्वस्थता घालवायची असेल आणि सकारात्मक जगायचे असल्यास एखाद्या छंदात रममाण होणे, बेधुंद होणे यांसारखा दुसरा आनंद नाही,’ असे ते मानतात. त्यासाठी त्या सतत कुठेतरी स्वतःला गुंतवून घेतात. चित्रात रमतात. मित्रांसोबत निसर्ग पर्यटन करतात. त्यातून कलानिर्मिती करत असतात. त्या कलासंचितातून रसिकांशी संवाद साधत असतात. स्वेच्छानिवृत्तीनंतरची ही ऊर्जा प्रत्येकालाच प्रेरणा देणारी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com