ऐकू आनंदे : कमाल श्रवणानंद

मंदार कुलकर्णी
Friday, 11 September 2020

आकाशवाणी ऐकणं हा अगदी आनंदाचा भाग असतो, यात काही वादच नाही. कधी अनवट गाणी, कधी छानसं नभोनाट्य, कधी चर्चेचा कार्यक्रम, तर कधी एखादा विशेष मुलाखत. बढिया! तुम्हाला समृद्ध करणारा हा श्रवणानंद. ज्या पिढीकडे आजच्यासारखी सदोदित हाती नसणारी गॅजेट्स नव्हती, त्यांनी आकाशवाणीच्या माध्यमातून किती तरी सर्जनशील कलाकृती ऐकल्या आहेत.

आकाशवाणी ऐकणं हा अगदी आनंदाचा भाग असतो, यात काही वादच नाही. कधी अनवट गाणी, कधी छानसं नभोनाट्य, कधी चर्चेचा कार्यक्रम, तर कधी एखादा विशेष मुलाखत. बढिया! तुम्हाला समृद्ध करणारा हा श्रवणानंद. ज्या पिढीकडे आजच्यासारखी सदोदित हाती नसणारी गॅजेट्स नव्हती, त्यांनी आकाशवाणीच्या माध्यमातून किती तरी सर्जनशील कलाकृती ऐकल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजही आकाशवाणीच्या माध्यमातून कित्येक श्रवणीय गोष्टी सगळ्या वयोगटांतल्या श्रोत्यांपर्यंत पोचत आहेतच. मात्र, अलीकडे आकाशवाणी ऐकण्याची इच्छा असूनही ती ऐकता येत नाही. एकीकडे रेडिओ नावाचं उपकरण घरातून गायब होत चाललं आहे आणि दुसरीकडे मोबाईलवर एफएम रेडिओ आला, तरी एमडब्ल्यू रेडिओ येऊ शकलेला नाही अशी अडचण आहेच. दुसरं म्हणजे ठिकठिकाणची प्रादेशिक आकाशवाणी केंद्रं स्वतःचा असा खास ‘फ्लेवर’ राखून आहेत. म्हणजे मुंबई आकाशवाणीची कार्यक्रम सादर करण्याची पद्धत, सांगली आकाशवाणीवरच्या जाहिराती, पुणे आकाशवाणीवरच्या कार्यक्रमांली आशयसंपन्नता अशा गोष्टी. मात्र, तुम्ही सांगली सोडली तर सांगली आकाशवाणी केंद्र ऐकता येणार नाही, साताऱ्यात मुंबई आकाशवाणी ऐकता येत नाही, किंवा नगरमध्ये गेलात तर कोल्हापूर आकाशवाणी ऐकता येत नाही. अशा असंख्या अडचणींमुळे कानसेनांची कुचंबणाच होत होती. 

...पण या सगळ्या अडचणींवर एक अतिशय विशेष असा उतारा मिळाला आहे. खुद्द आकाशवाणीनंच या सगळ्या अडचणी एका तंत्रज्ञानानं दूर केल्या आहेत. कानसेनांनासाठी ही पर्वणी म्हणजे आकाशवाणीचं ‘न्यूज ऑन एअर’ ॲप. प्लेस्टोअरवर Newsonair असं टाइप केलं, की हे ॲप येतं. हे ॲप म्हणजे एक जादूच आहे. त्यात भारतभरातली आकाशवाणी केंद्र लाइव्ह ऐकता येतात. तुम्ही कुठल्याही शहरात असलात, तरी तुम्हाला पाहिजे ते आकाशवाणी केंद्र ऐकता येईल. ते आकाशवाणी केंद्र एफएम असो किंवा मीडियम वेव्हवरून प्रसारित होत असो- या ॲपवर ते ऐकता येणारच. म्हणजे मोबाईलवर सगळा श्रवणानंदच.

म्ही सांगलीत असलात, तरी मुंबईचं आकाशवाणी केंद्र ऐकता येईल; पुण्यात असलात, तरी अगदी भुवनेश्वरचंसुद्धा आकाशवाणी केंद्र ऐकता येईल. म्हणजे आकाशवाणी ऐकण्यातले जे काही अडथळे होते ते सगळे एका क्षणात तंत्रज्ञानानं दूर केले आहेत. सृजनशीलतेला तंत्रज्ञानाचं कोंदण मिळालं, की काय होऊ शकतं याचं हे अगदी जबरदस्त उदाहरण आहे. ठिकठिकाणच्या स्थानिक आकाशवाणी केंद्रांवर खूप चांगले कार्यक्रम तयार होत असतात; पण ते फ्रिक्वेन्सी मीडियम म्हणजे एफएमवरून प्रसारित होत असल्यानं फक्त त्याच भागात मर्यादित राहतात. या ॲपनं मात्र या सगळ्या सीमांना पार सुरूंगच लावला आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या केंद्रांवरचा हा सगळा खजिना कानसेनांपर्यंत पोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आकाशवाणीवर किती भाषांमध्ये कार्यक्रम प्रसारित होतात, किती अफाट प्रयोग होतात हे बघून-खरं तर ऐकून थक्क व्हायला होतं. फक्त एवढंच नाही, तर दूरदर्शनच्या वाहिन्याही इथं लाइव्ह बघायला मिळतात, ताज्या आणि त्या त्या भाषांतल्या बातम्या वाचायला मिळतात आणि आकाशवाणीवर झालेल्या काही विशेष कार्यक्रमही ऐकायला मिळतात. शोधत गेलंत तर खजिन्यातलं कुठलं रत्न, कुठलं माणिक कधी हाती लागेल ते सांगता येत नाही. तर मंडळी, तंत्रज्ञानाला करा सलाम आणि जगणं समृद्ध करणाऱ्या श्रवणानंदासाठी व्हा सज्ज.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article mandar kulkarni