क्रेझ कुल्फीची (नेहा मुळे)

क्रेझ कुल्फीची (नेहा मुळे)

वीकएंड हॉटेल
उन्हाची काहिली राज्यभर पसरली असून, तापमानाचा पारा वाढल्यानं घराबाहेर पडायला नको वाटतं! अशा वातावरणाला थंडगार करू शकते ती फक्त कुल्फी. थंड पेय, आइस्क्रीम हे पर्याय आहेतच. यातल्या कुल्फीबाबत आज बोलू. बर्फाचा गोळा असो किंवा कुल्फी, त्याला ‘नॉस्टेल्जिया’ फॅक्‍टर आहेच. कुल्फी म्हटल्यावर लहानपण आठवतं. महिनाअखेरीला रिक्षावाल्या काकांची कुल्फी पार्टी ठरलेली असायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजी-आजोबांकडं हट्ट व्हायचा तो कुल्फीचाच! 

सायकलवरचा कुल्फीवाला ते कुल्फीचं स्वतंत्र आउटलेट, असा हा कुल्फीचा प्रवास झालेला दिसतो. अलीकडं स्वतंत्र आउटलेट सुरू करण्याइतकी कुल्फीची ओळख तयार होते आहे. कुल्फीची लोकप्रियता वाढली ती तिच्या साधेपणामुळं. अलीकडच्या काळात मलई, गुलकंद हे नेहमीचे फ्लेवर्स आहेतच. त्यासह आता पसंती दिसते ती सॉलटेड कॅरॅमल, लिची, मसाला पान, रेड वेलवेट अशा फ्लेव्हर्सना. पुण्यात कुल्फीची लज्जत चाखता येतील अशी अनेक ठिकाणं आहेत. त्यातील काही निवडक ठिकाणं जाणून घेऊयात ः

शिव कैलाश (पुणे स्टेशन) : शिव कैलाशची वेगळी ओळख नको. वर्षानु वर्षे पुणे स्टेशनवरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना यांच्या कुल्फी, बासुंदी आणि लस्सीची चव हवीहवीशी वाटते. केवळ प्रवासीच नव्हे, तर शहरातल्या इतर भागातूनही लोक इथं येतात, ते या चवीसाठीच. इथली कुल्फी क्रिमी असते. बासुंदी कुल्फी ही इथली खासियत आहे. 

मोहन कुल्फी (जंगली महाराज रोड) : जंगली महाराज रोडवरच्या एखाद्या हॉटेलमध्ये खाणं झालं, की ‘मोहन’च्या कुल्फीवर ताव मारायलाच हवा. कितीही पोट भरलेलं असलं तरी मोहनची मलई आणि गुलकंद कुल्फी पुनःपुन्हा खावीशी वाटते. 

वृंदावन कुल्फी (झेड ब्रिज) : ‘वृंदावन’ची कुल्फी किंवा कुल्फी स्लाईस बहुतेकांना परिचित असेल. झेड ब्रिजच्या सुरवातीला असलेली वृदांवन कुल्फीची गाडी आहे. जिथं मिळणारी कुल्फी अनेक वर्षांपासून लोकांच्या आवडीची. इथं ७ ते ८ फ्लेवर्समध्ये कुल्फी मिळते. विशेष म्हणजे, सर्व फ्लेवर एकत्रही मिळतात. अशी एकत्र कुल्फी खाणं हा त्याक्षणी सर्वोत्तम आनंद वाटतो. तिथंच उभा राहून खाणार असल्यास काचेच्या बशीत आणि पार्सल असल्यास कुल्फी पानांमध्ये बांधून दिली जाते. 

लाडाची कुल्फी (अनेक शाखा) : अलीकडे पुण्यातील अनेक मुख्य रस्त्यांवर ’लाडाची कुल्फी’च्या आकर्षक गाड्या (फूड ट्रक) दिसतात. अगदी किफायतशीर दरात, दर्जेदार कुल्फी मिळत असल्यामुळं पुणेकर या गाड्यांवर गर्दी करतात. लाडाची कुल्फीचे ‘कुल्फीघर’ हे नवीन कुल्फी स्पेशल हॉटेल ना. सी. फडके चौकात सुरू झालं आहे. रेड पेरू, गुलकंद, मॅंगो हे सध्याचे हीट फ्लेवर्स. सोबतच येत्या हंगामात चिक्कू आणि सीताफळ हे कुल्फीचे फ्लेवर्सही इथं मिळणार आहेत. 

पूना कोल्ड्रिंक हाउस (टिळक रोड) : खास पुणेरी ब्रॅंडची ओळख पूना कोल्ड्रिंक हाउसला मिळाली आहे. कुल्फी, रबडी, फालुदा यातलं काय आवडतं? यातलं काही किंवा सगळंच आवडत असलं, तरी पूना कोल्ड्रिंक हाउसला भेट द्यायलाच हवी. कारण इथं हे सगळे पदार्थ वेगवेगळे किंवा एकत्रही मिळतात. कुल्फी रबडी फालुद्याची चव घेतल्यावर तुम्ही नक्कीच तृप्त व्हाल! 

शाही दरबार (अनेक शाखा) : मूळची मुंबईची असलेली ही कुल्फी चेन आता पुण्यामध्येही अनेक ठिकणी दिसते. कुल्फीचे पंधराहून अधिक फ्लेवर्स मिळणं हे इथलं वेगळेपण. स्टीक कुल्फी, स्लाइस कुल्फी, कुल्फी फालुदा आणि त्यांचे स्पेशल कुल्फी संडेज अशी कुल्फीतली विविधता इथं चाखता येते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com