मनस्वी कलाकार - अन्वर हुसेन

धर्मवीर पाटील
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

पुणे येथील पंडित सातवळेकर प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार येथील सुप्रसिद्ध चित्रकार अन्वर हुसेन याना जाहीर झाला आहे. पंडित सातवळेकर हे जुन्या पिढीतील प्रख्यात चित्रकार होते. त्यांना जे जे स्कुल ऑफ आर्ट मध्ये शिकत असताना दोन वेळा मानाचं मेयो मेडल मिळालं होतं. ते संस्कृत भाषेचे अभ्यासक होते. त्यांच्या स्मरणार्थ दर वर्षी चित्रकला आणि संस्कृत भाषा या क्षेत्रात काम करणाऱ्यांना गेली १८ वर्षे दोन व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातात. सदानंद गोविंद फडके यांच्याहस्ते आज (ता. २४) सायंकाळी साडेपाच वाजता दर्पण कलादालन, सेनापती बापट मार्ग पुणे येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने...

अपघाताने चित्रकलेकडे वळलेल्या अन्वर हुसेन (इस्लामपूर) यांचे आयुष्य आता चित्र हेच बनले आहे. जगण्यातली मजा चित्रांत आहे आणि सरळधोपट मार्ग सोडून या कलाविश्वात वेगळे काहीतरी चितारण्याचा त्यांचा ध्यास आहे. फॅशन आणि तात्कालिक मजा देणाऱ्या चित्रांच्या पलीकडे जाऊन सामाजिक संदेशाचा आणि सर्वसामान्य जीवन चित्रात आणण्याचा हुसेन यांचा ध्यास त्यांची कलेप्रति असणारी निष्ठा व्यक्त करतो...

सांगलीच्या कलाविश्व महाविद्यालयात जीडी आर्टचे शिक्षण. अभियांत्रिकीच्या क्षेत्रात करिअर करायचं म्हणून ज्युनिअर कॉलेजला टेक्निकलला प्रवेश घेतलेला. पण विज्ञान आणि गणिताशी सूर न जुळल्याने पर्यायाचा शोध घेताना चित्रकला गवसली. एका सिनेमाच्या पोस्टरच्या चित्राने आतून बरेच काही कागदावर उतरले आणि त्यातून चित्रकलेची वाट धरली. कलाविश्व कॉलेजला जडणघडण सुरु असताना पुण्यातील काही कलाकारांशी संपर्क आला. तिथल्या काही ग्रुप शो मधून चित्रे चर्चेत आली.

दरम्यान, शिराळा येथील एका कॉलेजवर चित्रकला शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली. पण विशिष्ट बंधन आणि मर्यादा न पाळण्याच्या स्वभावामुळे त्यात मन रमले नाही. चारच महिन्यात ती सोडली. आणि पूर्ण वेळ चित्रकलेचा निर्णय घेऊन पुण्याच्या इंडिया आर्ट गॅलरीत लक्ष केंद्रित केले. करिअरसाठी लोक मुंबई-पुण्याला जातात. अन्वर यांनी मुंबईला जावे हा कुटुंबीयांचा आग्रह त्यांनी नाकारला आणि इस्लामपूरसारख्या निमशहरी भागातच ही कला जोपासली. त्यांची पुण्यातील 'गोवन रॅप्सोडी', 'नॉस्टॅल्जीया', 'बायोग्राफी ऑफ सिटी', 'क्लासिकल मास्टर्स' आणि 'पावसाची चित्रे' ही प्रदर्शने गाजली. दरम्यान, मुंबईची जहाँगिर आर्ट गॅलरी खुणावत होती. 'मनातली आणि भोवतालची कपाटं' या २००८ च्या शोने जी गती आली ती आजतागायत वेगात सुरु आहे. माणसाच्या मनातील मूर्त-अमूर्त कल्पनांना या प्रदर्शनाने उजाळा दिला. २०१३ सालची 'मुंबई डायरी' आणि नुकत्याच पार पडलेल्या 'रोड स्टोरीज'ने कलारसिकांच्या काळजात घर केले आहे. दरम्यान २०१० ला नेहरू सेंटरमधील 'व्हीस्परिंग सायलेन्स' शोनेही हुसेन चर्चेत आले.

अनेक विषयांवरची चित्रं तर तयार होती आणि आर्ट गॅलरीत काही सर्वच रसिक येऊन चित्रे पाहतात, असे होत नाही. मग, अन्वर हुसेन यांनी २०१५ साली सोशल मीडियावर एक अनोखा प्रयोग केला. फेसबुकवर 'हायवेपलीकडच्या गावात' या नावाने एक डिजिटल चित्रप्रदर्शन भरवले. सलग आठ दिवस रोज नवनवी चित्रे शेकडो लोकांनी अनुभवली. आर्ट गलरीपेक्षा जास्त लोकांपर्यंत चित्रे पोचली आणि त्यातून तत्काळ मिळणाऱ्या प्रतिक्रियांनी त्यांना आणखी बळ मिळाले.

इंडिया आर्ट गॅलरी, आर्ट फ्ल्यूटसारख्या अनेक वेबसाईटवर त्यांची चित्रे पाहायला मिळतात. बहिणाबाईंच्या कवितांचा इंग्रजीत अनुवाद असलेल्या 'फ्रॅगरन्स ऑफ द अर्थ' पुस्तकाचे मुखपृष्ठ त्यांनी बनवले आहे, ज्याचे प्रकाशन अमेरिकेत झाले. शिवाय नागनालंदा प्रकाशन आणि 'लस्ट फॉर लालबाग', 'जू' या गाजलेल्या पुस्तकांनाही त्यांची मुखपृष्ठ आहेत. मार्केटिंग'च्या गदारोळात न अडकता मनासारखी चित्रं काढता यावीत, कोणत्याही बंधन-चौकटीत न अडकता काम करता यावं याच हेतूने आणि खऱ्या अर्थाने चित्रकला जगणारे अन्वर हुसेन म्हणजे 'कला हेच जीवन' या संदेशाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.

खरा कलावंत आणि खरा माणूस तोच, ज्याला समाजातल्या विसंगती, दुःख, दाहकता या गोष्टी दिसतात. अन्वर हुसेन यांच्यामध्ये ही सगळी वैशिष्ट्ये आहेत आणि ती त्याच्या चित्रांत उमटलेली दिसतात. हुसेन यांच्या चित्रांमध्ये रोजच्या जगण्यातली सहजता, रोमॅण्टीसिझम.. चित्र विषयात असलेली समकालीनता, गतस्मृतींमध्ये रमण्याची असोशी, रेखाटनांतली वास्तवता आणि काव्यमयता.. आणि या साऱ्या विरोधाभासाला समांतर असणारा अनाग्रही साधेपणा आणि हळुवारपणा यांचा प्रत्यय येतो. सकाळच्या कोवळ्या उन्हात न्हाणारी टेबलावरची शुभ्र किटली आणि ताज्या पेपरची घडी, खिडकीखालची आरामखुर्ची, अ‍ॅण्टीक पितळी कर्णा असलेला ग्रामोफोन, घरातल्या भिंती शेल्फमधल्या पुस्तकांच्या रांगांनी भरलेल्या, स्टुडिओतल्या टेबलावर रचलेली पुस्तकं, चहाच्या सरंजामाशेजारी विसावलेली पुस्तकं, नजरेला खोल खोल घेऊन जाणाऱ्या गूढ कमानी, त्याशेजारी कुणीतरी व्यक्ती आयुष्याचं सार शोधणारी जी हातात एखादं वाद्य घेऊन त्या आनंदात पार बुडालेली आहे ... यासारख्या विषयांनी त्यांची चित्रं बहरली आहेत.

Web Title: article on Painter Anvar Husain