आतातरी करा व्यायामाला सुरवात

डॉ. राजीव शारंगपाणी
मंगळवार, 16 एप्रिल 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली! 
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

हेल्थ वर्क
एखाद्या आडव्या बांबूला लोंबकळून आपल्याला चार-पाच वेळा शरीर उचलता येते का? तीन-चार डिप्स काढता येतात का? गाडी बंद पडली तर ढकलता येते का? पाचसहा किलोचे डम्बेल सरळ डोक्‍यावर किती वेळा उचलता येते? आपली ताकद किती कमी झाली आहे, हे त्यावरून कळेल.

तुमचा दमश्‍वास किती कमी झाला आहे, हे देखील पाहता येते. अर्धा-एक तास सायकल चालवल्यावर पायात गोळे येतात का? पर्वती चढताना किती वेळा बसता? पोहायला लागल्यावर पन्नास मीटर तरी सलग जाता येते का? पाच मिनिटे सतत धावता येते का? या गोष्टींवरून आपल्या शरीराचा दमश्‍वास किती कमी झाला आहे, ते कळते. 

अशाप्रकारे शरीराचा ऱ्हास झाला असताना त्यात इतर गोष्टी केल्या जातात. त्यामुळे शरीराच्या या ऱ्हासाला हातभार लागतो. त्या म्हणजे तंबाखू खाणे, सिगारेट ओढणे, दारू पिणे, अत्यंत दूषित हवेत राहणे, दूषित पाणी पिणे, अस्वच्छ अन्न खाणे, गोंगाटात राहणे, अतिरिक्त काम करणे, सतत मानसिक ताणाखाली वावरणे, अतिशय खाणे... एकंदरीत आरोग्यविषयी बेभान असे आयुष्य जगणे. तुमच्या लक्षात येईल की, आपल्या शरीराचा वरीलपैकी कोणत्या प्रकारचा ऱ्हास जास्त झालेला आहे. समजा लवचिकपणा फार कमी झाला असल्यास साहजिक तो वाढविण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यामानाने ताकद आणि दमश्‍वासाच्या व्यायामास कमी महत्त्व दिले पाहिजे. फार मानसिक ताण असल्यास त्यासाठी मनाच्या व्यायामाबरोबरच काही मनोरंजक खेळ खेळायला पाहिजेत. शिवाय गुडघेदुखी, पाठदुखी, मानदुखी, लठ्ठपणा, अपचन, बद्धकोष्ठता अशा गोष्टी योग्य व्यायाम आणि आहाराने बऱ्या करून मगच रीतसर व्यायाम करायला पाहिजे. 

सध्या ‘मजा’ येणे अगर करणे, याच्या समजुती पार बदलल्या आहेत. त्यामुळे काही जणांना नक्कीच वाटेल, हे ‘असले’ प्रकार करत बसायचे तर मग आयुष्यात काय मजा आहे? आपल्याला हे कळत नाही हीच तर खरी मजा आहे. तंदुरुस्त शरीर आणि मन हे साध्यातल्या साध्या गोष्टीत प्रचंड आनंद देऊ शकते. नुसते स्वस्थ बसले असतादेखील शरीरात मजेचे तरंग उठत असतात. त्यासाठी कोणत्याही बाह्य उत्तेजनाची आवश्‍यकता नसते. या उलट कोणत्याही कारणाने शरीराची व मनाची स्वस्थता गेल्यास सिगारेट, तंबाखू, दारू, व्हिडिओ इत्यादी गोष्टींतून समाधान मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. तो आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article rajeev sharangpani all is well sakal pune today